पाकमधून आयातीचा परिणाम साखर दरावर होणार नाही

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर /पुणे : देशात पाकिस्तानामधून सुमारे ६० लाख टन साखर आयात केली असल्याच्या बातम्या पसरल्या असल्या तरी प्रत्यक्षात केवळ तीन हजार टन इतकीच साखर आयात झालेली आहे. देशात यंदाच्या हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन आणि गेल्या वर्षीचा शिल्लक साठा लक्षात घेता यंदा ३६० लाख टन साखरेची उपलब्धता राहणार आहे. त्या तुलनेत पाकिस्तानातून आयात झालेल्या साखरेचे प्रमाण किरकोळ असून, साखरेच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

गॅट करार स्विकारल्यानंतर आंतराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली. यानुसार कोणताही देश कोणत्याही देशाला माल आयात-निर्यात करु शकतो. या बाबी करताना दोन्ही देशातील व्यापारी, संस्था आयात-निर्यात परवडत असेल तरच करतात. यामध्ये देशाच्या राजकीय संबंधाचा फारसा विचार केला जात नाही. हा व्यवहार व्यापारी तत्वावरच होतो. निर्यात वाढविण्यासाठी काही नियम या करारात आहेत. जर एखाद्या देशाला तुम्ही तुमचे उत्पादन निर्यात करणार असाल तर त्या देशाकडूनचा कच्चा माल तुम्ही आयात शुल्क न आकारता आणू शकता, अशी तरतूद आहे. 

केंद्र सरकारने साखरेवर शंभर टक्के आयातशुल्क लागू केले असल्याने पाकिस्तानातून साखर आयात व्यवहार्य ठरत नाही, असे सूत्रांनी सांगितले. ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात इतर वस्तू विनाशुल्क आयात करण्याचे सरकारी धोरण आहे. त्याचा फायदा उठवत एका खासगी कंपनीने चॉकलेट निर्यात करण्याच्या बदल्यात त्या चॉकलेटमधील साखरेच्या प्रमाणाइतकी साखर आयात केली आहे. या आयातीवर शुल्क लागू होत नाही. हे प्रमाण किरकोळ असून, मोठ्या प्रमाणावर साखर आयात होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

देशात साखरेचे साठे पडून असताना केंद्र सरकारने पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर साखर आयात केली, हा प्रचार चुकीचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानने साखर निर्यातीसाठी अनुदान दिलेले असले तरी भारताने लागू केलेले शंभर टक्के आयात शुल्क आणि चलन विनिमयाचा दर लक्षात घेतला तर पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर साखर आयात होणे व्यवहार्य नाही, असे सूत्रांनी सांगितले. हंगामाच्या सुरवातीला केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविण्याच्या आधी पाकिस्तानमधून काही प्रमाणात साखरेची आयात झाली होती. परंतु यंदाच्या हंगामात सगळी मिळून पाकिस्तानमधून साखर आयातीचा आकडा १० हजार टनांपेक्षा अधिक राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा)नुसार यंदा देशात विक्रमी ३२० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात १०५ लाख टनांपेक्षा अधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशात गेल्या वर्षीचा साखरेचा शिल्लक साठा ४० लाख टन आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सुमारे ३६० लाख टन साखरेची उपलब्धता राहणार आहे. साखरेचे दर गडगडल्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कारखान्यांना सप्टेंबरअखेरीस ६.२ लाख टन तर देशातील कारखान्यांना एकूण २० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ८ ते १० हजार टन साखर निर्यात झालेली आहे.   

दरम्यान, दि बॉम्बे शुगर मर्चन्ट्स असोसिएशनने आपल्या सदस्यांना पाकिस्तानमधून साखर आयात करू नये तसेच विक्री करू नये, असे निर्देश देणारे पत्र जारी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com