जळगाव जिल्हा संघाने गायीचा दूध दर केला कमी

जळगाव जिल्हा संघाने गायीचा दूध दर केला कमी
जळगाव जिल्हा संघाने गायीचा दूध दर केला कमी

जळगाव  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाचे दर कमी केला असून, या दुधाचा दर प्रतिलिटर २१ रुपये पर्यंत केले आहेत. दूध उत्पादकांना याचा मोठा फटका बसू लागला असून, दूध संघाने आपल्या दुधाचे विक्री दर कमी करून वितरण व्यवस्था मजबूत करावी, परजिल्ह्यातील दुधाला अधिक प्राधान्य देऊ नये, अशी मागणी दूध उत्पादक, व्यावसायिकांनी केली आहे. गायीच्या दुधाचे दर २७ रुपये प्रतिलिटरपर्यंत होते. ते कमी करीत करीत आजघडीला ३.५ च्या फॅटसाठी २१ रुपये प्रतिलिटर आणि ५.५ च्या फॅटसाठी २४ रुपये ५० पैसे एवढे दूध संघाने केले असून, दूध उत्पादकांकडून १ मे २०१८ म्हणजेच आजपासून हे या दरात दूध खरेदी होईल. मागील आठ-नऊ महिन्यांमध्ये गायीच्या दुधाचे खरेदी दर दूध संघाने सुमारे सहा रुपये प्रतिलिटरने कमी केले आहेत. अशातच सध्या दुधाची मागणी अधिक आहे. दूध दर वाढणेच सर्व उत्पादकांना अपेक्षित असते, परंतु दर कमी केल्याने उत्पादक व सहकारी दूध सोसायट्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. चारा दर वधारले मक्‍याचा चारा यंदा शेकडा २०० रुपयांनी वधारून १४०० रुपये झाला. दादरचा चारा शेकडा ३०० रुपयांनी वधारून सुमारे ४००० रुपये प्रतिशेकडा आहे. त्यातच चाराटंचाई आहे. कारण दादरचा कडबा फक्‍त मुक्ताईनगर, पाचोरा, जळगाव, चोपडा, शिंदखेडा, शिरपूरातील तापीकाठालगतच उपलब्ध असतो. त्याची टंचाई असून, अगदी चाळीसगाव, कन्नड (जि. औरंगाबाद), धुळे भागांतील दूध उत्पादक दादरच्या कडब्यासाठी वणवण फिरत आहेत. दूध संघाने गायीच्या दुधाचे खरेदीदर कमी केले, पण विक्री दर कमी केले नाहीत. कमी मार्जीनवर दुधाची विक्री संघाने आपल्या विपणन व्यवस्थेतील साखळीला केली पाहिजे. दूध संघाचे बूथ किंवा विक्री केंद्र ग्रामीण भागात अधिक संख्येने नाहीत. तर बुलडाणा जिल्ह्यातही दूध खरेदी केली जाते. जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादकांना संधी अधिक देऊन खासगी डेअरीचे वर्चस्व कसे कमी होईल, यावर संघ काम करीत नसल्याने गायीच्या दूधाचे दर वारंवार कमी केले जात असल्याची नाराजी उत्पादकांनी व्यक्त केली आहे. गायीच्या दुधाचे संकलन प्रतिदिन एक लाख लिटरने वाढले आहे. रोज दोन लाख ६० हजार लिटर दूध संकलन होत आहे. मागणी कमी आहे. अतिरिक्त दुधाचे काय करायचे यामुळे गायीच्या दुधाचे दर कमी केल्याचे सूत्रांनी सांगितले.  

दूध संघाने परजिल्ह्यातील दुधाला प्राधान्य कमी द्यावे. मोताळा व बुलडाण्यातील इतर भागात दूध संकलनाची गरज काय? जिल्ह्यात दूध मुबलक आहे. अनेक शेतकरी देशी व इतर गायींचे संगोपन अधिक करतात. पशुखाद्य, चारा याचे दर कमी होत असताना दर कमी केल्याने कोट्यवधींचा फटका दूध उत्पादकांना होत आहे. दुधाचे खरेदी दर संघ कमी करतो, पण विक्री दर कमी करीत नाही. - जितेंद्र पाटील, दूध विषयाचे अभ्यासक

दुधाची मागणी उष्णतेत अधिक असते, तरी गायीच्या दुधाचे खरेदी दर दूध संघाने कसे कमी केले, हाच प्रश्‍न आहे. दूध उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. उत्पादक अडचणीत आले असून, यासंदर्भात संबंधितांनी दखल घ्यावी. - गीता चौधरी, अध्यक्ष, कामधेनू महिला सहकारी दूध संस्था, खिरोदा (ता. रावेर, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com