काळम्मावाडी धरण रस्त्यावर दर्शनाची संधी !

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर ः रात्र जसजशी गडद होत जाईल, तसतसे गावालगतच्या झाडीझुडपांत लुकलुकणारे काजवे दृष्टीस पडत; पण ते आता खास काजवा महोत्सव भरवून दाखवण्याची वेळ आली आहे. निसर्गाची ओळख म्हणून काजवा महोत्सव ठीक आहे; पण गावागावात पोहोचलेला प्रकाश, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे प्रखर झोत; यांमुळे सहज दिसणारे काजवे दिसेनासे झाले आहेत. त्यांना पाहायचे झाले, तर दाट झाडी असलेल्या ठिकाणी, किट्ट अंधारात आपल्याला जायची वेळ आली आहे.

राधानगरीजवळ काळम्मावाडी धरणाच्या रस्त्यावर काजव्यांना पोषक वातावरण असल्याने तेथे काजवा दर्शनाची संधी मिळू शकणार आहे. इवलासा काजवा; पण अंधारात तो त्याची जादू दाखवतो. लुकलुकणारा प्रकाश देणाऱ्या या काजव्यांना निसर्गाने कसे घडवले असेल, हाच प्रश्‍न काजवा पाहताक्षणी बहुतेकांच्या मनात येतो. त्यामुळे काजवा हा नेहमीच आबालवृद्धांच्या कुतूहलाचा विषय असतो. काही वर्षांपूर्वी विजेचा फार मोठ्या प्रमाणात लखलखाट नव्हता. त्या वेळी गावापासून थोड्याशा अंतरावर काजव्यांचे लुकलुकणे पाहायला मिळायचे; पण आता विजेचा खूप लखलखाट झाला आहे.

क्षितिजाकडे बघितले तर पहाट झाली की काय, असे वाटण्यासारख्या प्रकाशाची एक मंद पट्टी नजरेला येते. शहरातल्या प्रकाशाचा तो परिणाम असतो. त्यामुळे अंधाराची तीव्रता कमी होते. अंधाराची तीव्रता कमी झाल्यानेच काजव्यांचे अस्तित्व पूर्ण क्षमतेने जाणवत नाही. दाट जंगल, डोंगर किंवा पुरेसा अंधार असलेल्या परिसरात त्यांचे अस्तित्व जाणवते. राधानगरी, काळम्मावाडी धरणाचा परिसर यासाठी अजूनही योग्य आहे. 

लुकलुकणारे काजवे हे वेगळेपण राधानगरी ते काळम्मावाडी रस्त्यावर अजूनही काळाकुट्ट म्हटला जाणारा अंधार असतो. अर्थात त्यामुळेच तेथे दूरवर लुकलुकणारा काजवा दिसतो. काजवे  थव्याने उडत येतात व एखाद्या झाडावर बसताच प्रकाश बाहेर सोडतात आणि ते अख्खे झाड उजळवून टाकतात. या झाडावरून त्या झाडावर उडणारे काजवे व त्यांचे समूहाने लुकलुकणे हेच निसर्गाचे वेगळेपण असते.

९ ते ३१  मेपर्यंत आयोजन राधानगरीत बायसन नेचर क्‍लबने १९ ते ३१ मे या कालावधीत रोज रात्री आठ ते दहा या वेळेत काळम्मावाडी रस्त्यावर काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. अक्षरशः पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, सातारा येथून पर्यटकांनी आपली नावे नोंदवली आहेत. काजवा दाखवण्याचा हा महोत्सव पूर्ण मोफत आहे. राज्यभरातील लोक यावेत हीच त्यांची अपेक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com