शासन कधी दखल घेतंय याची वाट बघतोय

चार हजार रुपयाचं मका बियाणं पेरलं. पाऊस नसल्यानं पीक वाळून गेलं. यंदा हालत बेकार आहे. दावणीला चार गाई आहेत, एक गाय विकली तरी देणं भागणार नाही. - परशुराम सौदी , मिरवाड, ता. जत
कुंडलिक संकपाळ यांनी यंदा अर्ध्या गुंठ्यात मूग घेतला. त्यांना पीक काढणीनंतर केवळ ६५ ग्रॅम उत्पादन मिळाले. तर बाजरी पिकावर सुरेश लोखंडे यांनी कुळव घातला.
कुंडलिक संकपाळ यांनी यंदा अर्ध्या गुंठ्यात मूग घेतला. त्यांना पीक काढणीनंतर केवळ ६५ ग्रॅम उत्पादन मिळाले. तर बाजरी पिकावर सुरेश लोखंडे यांनी कुळव घातला.

करपलेला खरिप : भाग १६

जिल्हा : सांगली

खरीप पिकाच्या पेरणीला भला मोठा खर्च केला; पण आता खर्च वसूल होणं मुश्‍कील झालं. पाऊस नसल्यानं शेतात केवळ पिकांचे सांगाडेच दिसतात. शासन आमची दखल कधी घेतंय याची वाट बघतोय, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आणि तासगाव तालुक्‍यांत जिकडे बघावे तिकडे शेतशिवारे ओस पडली होती. यामुळे शेतकऱ्यांनी शहरांकडे स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे.

दोन पावसांवर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. पेरणीनंतर काहीच दिवस, महिन्यातील ५ ते ६ दिवस पाऊस झाला. यामुळं मूग, काळा हुलगा, उडीद पिकं सुरवताच्या काळात हिरवीगार दिसत होती. नंतर पावसानं दडी मारली आणि होत्याचं नव्हत झालं. दुष्काळी पट्ट्यातील खरीप हंगामातील पिकांची स्थिती बिकट झाली आहे.

सांगली जिल्ह्यात सुरवातीपासून कमी अधिक पाऊस झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात हवामान खात्यानं यंदा पाऊस जास्त आहे, असे वारंवार सांगितलं होतं. पण हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणं पाऊसच झाला नाही. त्यामुळे हवामान खात्यावर कसा विश्‍वास ठेवायचा असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागेल आहेत.

तासगाव, खानापूर या दोन तालुक्‍यांत पिकांची वाढच झाली नाही. दोन पैसं येतील आणि जनावरांना चारा मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी शेतात पिकं ठेवली आहेत. मात्र, त्यातून काहीच उत्पादन मिळणार नाही. अशी स्थिती या दोन तालुक्‍यांत आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून खरीप पिकावर कुळव मारायला सुरवात केली आहे. पिकावर कुळव मारण्यासाठी शेतकऱ्यांचे धाडसही होत नाही. पण करणार काय? पिकच आलं नाही, फूलकळीच लागली नाही, बाजरी पिकाला बिनदाण्याची कणसंच आली. पिकं वाया गेल्यानं पैसा कसा उभा करायचा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

जनावरं विकायची वेळ आली आहे. पण जनावरं विक्री केली तर पुन्हा खरेदी करता येणार नाहीत. करायचं काय? इकडं आड तिकडं विहीर अशी स्थिती निर्माण झाली आली. 

पिकं गेल्यावर सरकार जागं झालं जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता वाढली होती. यामुळे शासनानं जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाणी गेल्या महिन्याच्या मध्यांवर सोडण्यात आलं. पण हा निर्णय घेण्यासाठी शासन उशिरा जागं झालं. अगोदर पाणी सोडलं असतं तर पिकांना जीवनदान मिळलं असतं.

खरीप पिकासाठी शासनाने तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज देण्याचा आदेश दिला होता. कर्ज मिळेल या आशेने बॅंकेत शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. शेतकऱ्यांनी सावकार, सोने तारण ठेवून पिकासाठी पैसा उभा केला होता. मात्र, दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांना कर्जच मिळाले नाही. तर इतर तालुक्‍यांत जिल्ह्यात पुरेसे कर्ज मिळाले नाही. यामुळे शासनाने आदेश काढून मदत मिळत नाही असा नाराजीचा सूर शेतकऱ्यांमधून आला. सावकार, सोने तारण ठेवून कर्ज काढले खरे; आता ते फेडायचे अवघड झाले आहे असे शेतकरी सांगत होते.

प्रकल्प तळाशीच जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्‍यांतील ४ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ २ टक्के पाणीसाठा आहे. तर जत, आटपाडी, तासगाव, मिरज, कडेगाव, आटपाडी, खानापूर या तालुक्‍यांतील लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. जत तालुक्‍यात २६, आटपाडी तालुक्‍यात १७, कवठेमहांकाळ तालुक्‍यात १०, खानापूर तालुक्‍यात ८, तासगाव तालुक्‍यात ४ तलाव कोरडे पडले आहेत. ७९ लघू प्रकल्पांत केवळ १४ टक्के पाणीसाठा आहे.

कर्जमाफीबाबत निराशाच दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावे कर्जमाफीच्या ऑनलाइन यादीमधून गायब झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असल्याने शेतकऱ्यांना कायम हेलपाटे मारावे लागत आहेत. कधी सर्व्हर बंद पडलेला असतो, तर कधी सर्व्हरची गती मंदावलेली असते, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने कर्जमाफीही निव्वळ शेतकऱ्यांची फसवणूकच केली आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

खरिपाची स्थिती

  • मूग आणि उडीद उत्पादनात ७० टक्के घटीची शक्यता
  • बाजरी उत्पादन ७० ते ८० टक्के घटणार
  • खरिपात सोयाबीनचा पेरा कमीच
  • खरीप ज्वारी उत्पादन ६० टक्के घटण्याची भीती
  • तूर उत्पादनात ५० ते ६० टक्के घट होण्याचा अंदाज
  • तालुकानिहाय ७ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये) तालुका---झालेला पाऊस---टक्के जत------------२१९.४--------५७.६ आटपाडी------२२९.७--------१०१.२ कवठे महांकाळ--२२२.८------६२.१ खानापूर-विटा---१७१.६--------४१.२ तासगाव----------९९.२---------३३.७ वाळवा-इस्लामपूर-२६७.२------५६.६ शिराळा-----------१२६२.३-------८९.६ पलूस--------------१४५.९--------३७.६ कडेगाव-----------२१०.२---------५७.० मिरज--------------१७३.७---------४३.९

    तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टर) जत---७६७८९ खानापूर---२८१६९ आटपाडी---१५४३३ कवठेमहांकाळ---१७६९४ तासगाव---२९६३७ वाळवा---३२८०३ शिराळा---२५६०९ पलूस---७५४९ कडेगाव---२१४९२ मिरज---१६९६६

    प्रतिक्रीया ----------- खरीप पिकाची स्थिती गंभीर आहे. १० दिवस जनावरांना पुरेल एवढाच चारा आहे. जनावरे सोडून द्यावी लागतील. पेरणीला घातलेला खर्चही निघणे अवघड झाले.                                                    - भिकाजी बापू पवार, तामखडी, ता. खानापूर

    पहिला पाऊस झाला. पेरणी करण्यासाठी तयारी केली; पण पुन्हा पावसाने दडी मारली त्यामुळे पेरणी केलीच नाही.                                                             - विठ्ठल घाडगे, गोमेवाडी, ता. आटपाडी

    मूग पिकाची पेरणी पहिल्यांदा केली. जरा पाऊस झाल्यानं पिकं बरी आली. पण पाणी कमी पडल्याने उत्पादन घटणार आहे. पुढं पैसा कसा उभा करायचा प्रश्‍न पडला आहे.                                                    - दादासाहेब शिंदे, नागज, ता. कवठेमहांकाळ

    अडीच एकरांवर बाजरी केली होती, पाऊस नसल्यानं कुठतरी उगवलं होतं. जे उगवल ते जनावरांना दिलं. आता कुळव घातलाय.                                                  - सुरेश लोखंडे, जांभुळवाडी, ता. कवठेमहांकाळ

    गेल्या वर्षी पीक चांगलं होतं. ५ एकरांत ५५ क्विंटल उत्पादन मिळालं. यंदा पाऊस नाही तर पीक हवेवर जगलं आहे. फुटवा नाही. ५ एकरांवर कुळव मारला आहे.                                                            - सुनीलकुमार तेली, डफळापूर, ता. जत

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com