ग्रामविकासाला मिळाली दिशा
ग्रामविकासाला मिळाली दिशा

महापरिषदेतून कृषिकेंद्रीत ग्रामविकासाला मिळाली दिशा : सरपंच

‘ॲग्रोवन’च्या वतीने आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेसाठी राज्यभरातून सरपंच दाखल झाले आहेत. महापरिषदेतील मार्गदर्शनामुळे ग्रामविकासातील विविध अडचणी आणि त्यावरील उपाय आम्हाला समजले. शासनाच्या योजनांची माहितीही मिळाली. खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला दिशा देणारी ही महापरिषद आहे. येथे मिळालेल्या माहितीचा उपयोग आम्ही ग्रामविकासात निश्चितच करून घेऊ, अशा भावना सरपंचांनी व्यक्त केल्या.

ग्रामविकासाची प्रक्रिया समजून घेण्याचे व्यासपीठ मी पहिल्यांदाच सरपंच झाले. महिलांना गावांत काम करण्यासाठी सरकारी नियम व अन्य बाबींमुळे अडचणी येतात. मात्र ‘अॅग्रोवन’ने महापरिषदेच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाची प्रक्रिया समजून घेण्याचे हे महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे. राज्यातील अनेक होतकरु महिलांसाठी संवाद साधता आला. - वैशाली देवदास गुरव, सरपंच,​ हरपवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

ग्रामविकासाला दिशा देणारा उपक्रम लोकांमधून सरपंच झाल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या सरंपचावर येत आहेत. त्यामुळे नेमके काय कामे करावीत याबाबत सरपंचांमध्ये गोंधळ निर्माण होतो. मात्र सरपंच महापरिषदेतून अडचणींवर मात कशी करायची याची माहिती मिळत आहे. हा उपक्रम म्हणजे ग्रामविकासाला, लोकसहभागाला दिशा देणारा तर आहेच. पण सरकारी योजना समजून घेताना त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही महत्वाचा आहे. - रामहरी राऊत , सरपंच,​ तोंगलाबाद, ता. दर्यापूर, जि. अमरावती.

नवी दृष्टी मिळाली सरपंच महापरिषद हा स्तुत्य उपक्रम असून, त्यातून ग्रामविकासाची दिशा व विविध मुद्दे समोर आले. या महापरिषदेला आल्याने फायदाच झाला. कारण विविध योजनांची माहिती मिळाली, नवी दृष्टी मिळाली. हा उपक्रम आणखी व्यापक व्हावा, असे वाटते. जेवढा अधिक सहभाग तेवढा अधिक चांगला परिणाम दिसेल. प्रत्येक जिल्ह्यात अशी महापरिषद व्हायला हवी. - रामदास उरसळ, सरपंच,​ सिंगापूर, ता. पुरंदर, जि. पुणे.

विचारांची देवाणघेवाण झाली राज्यातून ठिकाणचे सरपंच या महापरिषदेला आले. ते भेटले. विचारांची देवाणघेवाण करण्याची चांगली संधी या माध्यमातून मिळाली. शासनाने या महापरिषदेसंबंधी सहभाग वाढवायला हवा. तसा सहभाग वाढला तर ग्रामविकासाची माहिती अधिक लोकांपर्यंत पोचेल. ग्रामविकासात जेवढा अधिक ग्रामस्थांचा सहभाग असतो. तेवढा चांगला परिणाम दिसतो. - कृष्णा रामराव गावंडे, सरपंच,​ शेलगाव-जानेफळ, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.

गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी मिळाली ऊर्जा महिला सरपंचांचा गावाच्या विकासातील सहभाग किती महत्त्वाचा असतो, त्याचे गांभार्य लक्षात आले. जे वक्ते मार्गदर्शनासाठी आले, त्यांनी मोलाची माहिती दिली. यामुळे महापरिषदेतील सहभाग अतिशय लाभदायी असाच आहे. पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ या भागांतील महिलांची भेट घेता आली. यामुळे गावातील जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासंबंधी नवी ऊर्जा मिळाली. - हेमलता तुळनकर, सरपंच,​ बर्फा, ता. समुद्रपूर, जि. वर्धा.

सरपंचांशी झाली सकारात्मक चर्चा सरपंच हा गावाचा कारभार पाहतो, तेव्हा त्याला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते, या अडचणी, समस्या कशा सोडवायच्या याचा मंत्र या महापरिषदेतून मिळाला. अनेक मुद्दे होते, जे ग्रामविकासाला दिशा देतात. मी अनेक तरुण सरपंचांना भेटलो, त्यांच्याशी जी चर्चा झाली ती सकारात्मक अशी होती. आपले लक्ष्य ग्रामविकास व शेतीशी संबंधित आहे, हे लक्ष्य कसे साध्य करायचे, त्याचे मुद्दे ठळकपणे मला मिळाले. - कृष्णा शाहूराव जगधने, सरपंच,​ धानापूर, ता. शेवगाव, जि. नगर.

गावात कामे करण्याबाबत मार्गदर्शन मिळाले विदर्भ पुण्यापासून दूर आहे. पण ग्रामविकासाचे नवे, सकारात्मक विचार घेण्यासाठी आले. आमचा जो हेतू होता, तो येथे येऊन साध्य झाला, असे वाटते. एकाच ठिकाणी शेती, शासनाच्या योजना, पाण्याचे विषय यावर सखोल चर्चा झाली. सुरवातीला आम्हाला वाटत होते, की शासनाचे मुद्दे अधिक असतील, परंतु तसे झाले नाही. गावात काम करताना जे मार्गदर्शन हवे असते, ते आम्हाला या महापरिषदेत मिळाले. - शालूताई डाबेराव, सरपंच,​ खापरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला.

तरुण सरपंचांना मिळते प्रोत्साहन दुष्काळी भागात काम करताना अनेक अडचणी येतात. या महापरिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासाची माहिती, गावात काम करण्यासाठी नव्या संकल्पना मिळाल्या. तरुण सरपंचांना या महापरिषदेमुळे प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे आमच्या गावाच्या विकासासाठी निश्चित लाभ होईल. - सुदाम काकडे, सरपंच,​ गोमळवाडा, ता. शिरूरकासार, जि. बीड.

सरपंचांशी केलेली चर्चा ठरेल फायदेशीर शासनाच्या विविध योजना राबविण्याबाबत, ग्रामविकासाविषयी माहिती मिळाली. राज्यभरातून आलेल्या सरपंचांशी चर्चा करता आली. विचारांची देवाणघेवाण झाल्याने प्रत्यक्ष काम करताना मदत होईल. प्रदर्शनातून सौर ऊर्जेच्या आधारे चालणाऱ्या वीज पंपांची माहिती मिळाली. गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी त्याचा वापर करण्याचा विचार करण्यात येईल. - बंडू खाटिकमारे, सरपंच,​ वारोळा, ता. माजलगाव, जि. बीड.

महिला सरपंचांसाठी व्यासपीठ सरपंच महापरिषदेमुळे नव्याने निवडून आलेल्या महिला सरपंचांना एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळाले अाहे. यामुळे विविध भागात महिला सरपंचानी राबविलेल्या उपक्रमांविषयी माहिती मिळत आहे. त्यातील शक्य ते उपक्रम आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात राबवून कार्यक्षमता वाढविता येईल. - मिनाक्षी वनशीव, सरपंच,​ नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे.

नवीन गोष्टी आत्मसात करता आल्या एकच वेळी राज्यभरातील सरपंच एकत्र आले अाहेत. त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाले. एकमेकांशी बोलून नवीन गोष्टी आत्मसात करता आल्याने प्रेरणा मिळाली. गाव लहान असल्यामुळे निधी कमी मिळतो. लोकसहभाग आणि इतर मार्गाने निधी कसा उभा करता यईल, याविषयी उपयुक्त माहिती मिळाली. - संदीप देशमुख, सरपंच,​ पिलापूर, ता. आष्टी, जि. वर्धा.

नवनवीन संकल्पना समजल्या महापरिषदेतून ग्राम विकासाच्या नवनवीन संकल्पनांची माहिती मिळाली. त्यामुळे नवी दिशा मिळणार असून, इतर सदस्यांनाही ही माहिती देता येईल. विकास कामांचे प्राधान्यक्रमानुसार नियोजन करून गावाची वेगाने प्रगती करता येईल. - सुनंदा श्रीराम जवंजाळ, सरपंच,​ वाकी देवाची, ता. कन्नड, जि. आौरंगाबाद.

शेतीसह गावाच्या विकासाला होईल मदत शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागातून गावात विकास कामे कशी करता येतात याची माहिती मिळाली. तरुण सरपंचाना विविध भागातील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करता आली. शिवाय प्रदर्शनातूनही शेतीविषयक विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. यातून शेतीसह गावाच्या विकासाला मदत होईल. - गोविंद ग्यानोबा माकणे, सरपंच, अलगरवाडी, ता. चाकूर, जि. लातूर.

सरपंच महापरिषद चांगला उपक्रम सरपंचपदावर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर अनेक बाबींची माहिती हवी असते. सरपंच महापरिषदेमुळे अशी संधी सरपंचांना उपलब्ध होत आहे. ग्रामविकासाच्या वाटेवर असलेल्या महाराष्ट्रासाठी हा चांगला उपक्रम आहे. परिषदेच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या गावांत चांगले काम करणाऱ्या सरपंचाना भेटता येते. हा आनंद वेगळाच असतो. - संजय सुतार, सरपंच, मूर ता. राजापूर, जि. रत्नागिरी.

शासकीय योजनांची माहिती मिळाली ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून आम्हाला सरपंच महापरिषदेत सहभागी होता आले याचा खूप आनंद आहे. अनेक सरपंचांना पहिल्यांदाच संधी मिळतेय. त्यामुळे काम करताना माहिती अभावही असतो. मात्र या परिषदेतून सरकारी योजना, कामे कशी करायची याबाबतची माहिती, वेगवेगळे अनुभव पाहता येतात हे महत्त्वाचे आहेत. - राजाराम जाधव, नेर्ले, ता. वैभववाडी, जि. रत्नागिरी.

महापरिषद प्रत्येक सरपंचासाठी महत्त्वाची मला सरपंच पदाची संधी मिळाल्यावर अनेक कामे केली. गाव आदर्श झाले़, मात्र ‘अॅग्रोवन’ने ग्रामविकासासाठी सुरू केलेला हा महापरिषदेचा मेळा राज्याच्या प्रत्येक सरपंचासाठी महत्त्वाचा आहे. मला पहिल्यांदाच परिषदेत संधी मिळाली. त्यामुळे दोन दिवसांत ग्रामविकास, लोकसहभाग, अडचणीवर मात कशी करायची अशा अनेक बाबींची माहिती मिळेल. - स्वाती अनिल नरहे, सरपंच,​  वडनेर बुद्रुक, ता. पारनेर, जि. नगर.

महापरिषदेतील माहिती दिशादर्शक पहिल्यांदाच सरपंचपदावर संधी मिळाली. मात्र माहिती नसल्याने अडचणी येतात. सरपंच महापरिषदेमुळे मात्र अनेक बाबींचा उलगडा झाला. माहिती मिळली. ग्रामीण भागात, विशेषतः दुष्काळी भागात सरपंचावरच बरीच भिस्त आहे. त्यामुळे सरपंचांना महापरिषदेतून मिळणारी माहिती ही दिशादर्शक ठरणारी आहे. - ओमप्रकाश जोजारे, सरपंच,​ नांदेवली, ता. शिरूर कासार, जि. बीड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com