पोल्ट्री उद्योजक करणार शेतकऱ्यांकडून थेट मका खरेदी

मका
मका

औरंगाबाद : राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उत्पादित मालाची विक्री करण्याची संधी चालून आली आहे. पोल्ट्री व्यवसायासाठी लागणाऱ्या खाद्यात सर्वाधिक वापर मक्याचा केला जात असल्याने या मक्याची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची तयारी पोल्ट्री असोसिएशनच्या माध्यमातून पोल्ट्री मालकांनी केली आहे.

 राज्य पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना या संदर्भात माहिती दिली. औरंगाबादेत मंगळवारी (ता. १९) महाराष्ट्र पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीला संजय नळरीगकर यांच्यासह असोसिएशनच्या राज्यभरातील जवळपास ७० प्रतिनिधींची उपस्थिती होती.

या बैठकीत राज्य व देशातील पोल्ट्री व्यवसायाची स्थिती, चिकन प्रक्रिया, थेट विक्री, त्याची पद्धत, न्यूट्रिशनल जागरूकता याविषयी असोसिएशनच्या माध्यमातून काय करता येईल, याविषयी मंथन करण्यात आले.

श्री. शेट्टी म्हणाले, विक्रीदरातील वर्षभरातील काही काळात येणारा चढ-उतार पाहता पोल्ट्री असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घेऊन राज्यातील पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून ग्राहकांना एका निर्धारित दरावर फ्रेश चिकनची विक्री करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी मार्केट निर्मितीकरिता शासनाकडून या शहरांमध्ये जागा मागण्यासाठी लवकरच प्रस्ताव दिला जाईल.

२००० साली पोल्ट्री ब्रीडर असोशिएशनचे काम सुरू झाले. परंतु प्रत्यक्षात या कामाला २००६ नंतरच गती आली. त्या वेळी राज्यभरातून दोन कोटी पक्षी महिन्याला राज्याभरातील ग्राहकांना लागत असल्याचे आकडे समोर आले होते. आता ही मागणी तीन कोटी पक्ष्यांपर्यंत गेली आहे. वर्षाकाठी जवळपास ३६ कोटी पक्ष्यांना खाद्यासाठी सर्वाधिक मका लागतो.

याआधी पोल्ट्रीच्या खाद्यासाठी मका कॅनडासारख्या देशातून आयात करावा लागायचा. आता मात्र चित्र बदलत आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.  असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या सदस्यांना कोणत्या भागातील शेतकरी गटाच्या, सोसायटीच्या माध्यमातून मक्याची थेट विक्री करण्यास इच्छुक आहेत याची यादी दिली जाते.

त्यामुळे शेतकऱ्यांची मका हमी वा आमच्या खरेदीदाराच्या गरजेनुसार चढ्या दराने खरेदीचे काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान बैठकीच्या निमित्ताने नाशिकचे कृष्णा गांगुर्डे, अलिबागचे दिलीप पाखरे, तर पोल्ट्री व्यवसायात ४० वर्षांपासून काम करणारे असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी यांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मका उत्पादकांना थेट लाभ इंदापूरसारख्या भागातून मका उत्पादक पोल्ट्री असोसिएशनच्या माध्यमातून मक्याची विक्री करू लागले आहेत. राज्यात महिन्याला अंदाजे तीन कोटी व वर्षाला ३६ कोटी पक्षी (ब्रॉयलर) लागतात. एका पक्ष्यांच्या खाद्यासाठी किमान दीड किलो मका लागतो. त्या तुलनेत लागणाऱ्या मक्याची विक्री करण्याची संधी उत्पादकांना निर्माण झाली आहे. तसेच मधली दलाली संपून त्याचा थेट लाभ मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com