नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला

नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला

नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात पहिल्यांदाच बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीत संचालक मंडळ निवडून देण्याचा अधिकार मिळाल्याने नव्या राजकीय समिकरणाला प्रारंभ झाला आहे. या संपूर्ण मोसम खोऱ्यात, शेतशिवारात राजकीय धुळवड अनुभवायला मिळत आहे. 

मोसम खोऱ्यातील सर्वच उमेदवारांनी पत्रके, डिजिटल बॅनर्स, ऑडियो, विडियो यांचा खुबीने वापर करून सोशल मीडियाच्या हायटेक प्रचाराला प्रथम पसंती दिली आहे. बाजार समितीच्या १३ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी नामपूर, ब्राम्हणपाडे, बिजोटे या तीन गणांतील उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना बिनाशर्त जाहीर पाठिंबा दिल्यामुळे सदर उमेदवारांच्या विजयाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. उर्वरित १० जागांसाठी सर्वच गणांमध्ये चुरशीच्या लढती होत आहे. "तरुण तुर्क म्हातारे अर्क"या उक्तीनुसार साठीच्या आसपास असणाऱ्या ज्येष्ठ उमेदवारांनी निवडणुकीची रंगत वाढविली आहे. 

मोसम खोऱ्यात  निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक फंडे वापरले जात आहेत. माघारीनंतर व्यापारी गटाच्या दोन, सोमपूर, अलियाबाद व साल्हेर अशा पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. नामपूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोसम खोऱ्यातील राजकीय रणसंग्राम सुरू झाला आहे. बाजार समितीच्या अठरा जागांसाठी १०४ जणांनी नामांकन दाखल केले होते. त्यानंतर छाननीत ११ अर्ज बाद झाले. माघारीच्या अंतिम दिनापर्यंत एकूण ५४ जणांनी माघारी घेतल्या. विद्यमान संचालक मंडळातील ९ संचालकांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यात पाच संचालकांनी माघारी घेतल्या. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या निकषानुसार होणारी राज्यातील पहिली निवडणूक म्हणून नामपूर बाजार समितीच्या निडणुकीकडे पाहिले जात आहे. 

नामपूर गणात सामाजिक एकोपा टिकून राहावा, यासाठी माजी सरपंच प्रमोद सावंत यांनी मुख्य प्रशासक अविनाश सावंत यांना बिनाशर्त पाठिंबा दिला आहे.  ब्राम्हणपाडे गणात शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पाटील यांच्या पुढाकाराने युवानेते अनिल बोरसे यांच्या पत्नी चारुशिला बोरसे यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. तसेच बिजोटे गणातील भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या जागेसाठी जनार्दन वाघ यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कांदळकर यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने तिन्ही गणांमध्ये निवडणूक निकालाची औपचारिकता शिल्लक आहे. 

रणरणत्या उन्हात इच्छुकांना शेतकऱ्यांकडे मतांचा जोगवा मागावा लागत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गांवपातळीवरचे राजकारण ढवळून निघाले आहे. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय राजकीय पक्षांचा प्रभाव नसला तरी नात्यागोत्याचा फॅक्टर मात्र प्रभावी ठरणार आहे.  यंदा प्रथमच सहकार विभागांच्या नवीन नियमावलीनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने आता उमेदवारांचा कस लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून नामपूर बाजार  समितीच्या निवडणुकीकडे पाहिले जात असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या गांवपुढाऱ्यांमध्ये दुरंगी व तिरंगी व चौरंगी सामना रंगला आहे.

नामपूर बाजार समितीच्या निवाडणुकीत द्याने येथील शेतकरी गणातील उत्राने ( ता. बागलाण ) येथील ज्येष्ठ उमेदवार कारभारी पगार- पाटील यांच्या उमेदवारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. उत्राने गावातीलच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान संचालक दीपक पगार, द्याने येथील माजी सरपंच रावसाहेव कापडनीस यांच्याशी त्यांची लढत होत आहे. 

यामुळे वाढली निवडणुकीतील चुरस

राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीत तरुण उमेदवारांची संख्या जास्त असली तरी ज्येष्ठ नागरिक, साठीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीची चुरस वाढविली आहे. त्यात उत्राने येथील माजी सरपंच कारभारी पगार (द्याने), पंडीत खैरनार (जायखेडा), गमनराव देवरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निवृत्त सेवक संचालक नंदू कोर (अंबासन), पिंगळवाडे येथील प्रगतशील द्राक्ष बगायतदार कृष्णा भामरे, अंतापूर येथील प्रगतशील शेतकरी नानाजी जाधव (करंजाड), महड येथील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी सीताराम सोनवणे (बिजोरसे), नामपूर सहकारी सोसायटीचे उपसभापती तथा माजी सरपंच जीभाऊ मोरे, निवृत्त केंद्रप्रमुख दत्तात्रेय कासारे, आनंदा मोरे (तळवाडे भामेर) मुरलीधर भदाणे (कोटबेल), दत्तू बोरसे (हमाल मापारी गण) यांसारख्या ज्येष्ठ मातब्बर मंडळीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com