नंदाताई दूधमोगरे यांचा शेतीत असाही करारीबाणा

 नंदाताई स्वतः ट्रॅक्टर चालवून बागेत फवारणी व इतर कामे करतात
नंदाताई स्वतः ट्रॅक्टर चालवून बागेत फवारणी व इतर कामे करतात

बुलडाणा : स्त्री ही समाजात त्याग, नम्रता, जाणतेपणाची मूर्ती समजली जातो. ती अाज कोणत्याच बाबतीत मागे नाही. पारंपरिकरीत्या पुरुषांची समजली जाणारी असंख्य क्षेत्रे महिलांनी काबीज केली. शेतीत क्षेत्रातदेखील असंख्य महिला कुटुंबाचा भार उचलत अाहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सरस्वती या गावची नंदा अनिल दूधमोगरे ही महिलासुद्धा अशीच करारी बाण्यासाठी अोळखली जाऊ लागली अाहे. 

वर्षानुवर्षे पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी ट्रॅक्टर चालवणे, फवारणी ही कामे नंदाताई सहजरीत्या करतात. अाज कुटुंबाच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सिंहाचा वाटा राहतो. महिलांची अोळख अाजवर चूल अाणि मूल अशी होती. पण हे अाता कालबाह्य झाले.

जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सरस्वती येथील नंदा दूधमोगरे ही महिला कुटुंबाची सर्व कामे करीत शेतीतील कामे सहजपणे पेलते. द्राक्ष, डाळिंबाच्या बागेत स्वतः ट्रॅक्टर चालवित फवारणी करणे असेल किंवा बीजोत्पादन करण्यासाठी लागणारी तांत्रिक कुशलता जोपासणे असेल, ही कामे नंदाताई करीत असतात. एक करारीबाण्याची महिला म्हणून त्या पुढे अाल्या अाहेत. 

पतीला पत्नीची सक्षम साथ

शेतीत पुरुषांना कुटुंबातील महिलेची योग्य साथ मिळाली तर त्या कुटुंबाची शेती अधिक समृद्ध होते, याची असंख्य उदाहरणे अाहेत. दूधमोगरे कुटुंबाच्या बाबतीत असेच म्हटले पाहिजे. देवराव दूधमोगरे हे शिक्षकी पेशात लोणार येथे कार्यरत असतानाच त्यांनी आपल्याकडे असलेल्या शेतीत प्रयोग सुरू केले. पारंपरिक पिकांपेक्षा इतर पिके अधिक फायदा देतात हे त्यांना वाचनातून, इतर शेतकऱ्यांच्या प्रयोगातून उमगले होते. दूधमोगरे यांना दोन मुले आहेत. त्यापैकी अनिल हा नंदाताई यांच्यासह संपूर्ण शेतीचे व्यवस्थापन करतो. तर दुसरा मुलगा अौरंगाबादला प्राध्यापक म्हणून कार्यरत अाहे. दूधमोगरे कुटुंब १८ एकर शेतीत द्राक्ष, डाळिंब, बीजोत्पादन, फुलशेती करते. अाज या कुटुंबाची शेती प्रामुख्याने नंदाताईंच्या पुढाकाराने नफ्याची बनली असे म्हटल्यास वावगे ठरत नाही. 

ट्रॅक्टर चालविणारी महिला शेतकरी गरजेमुळे अाता विदर्भातही शेतीत यांत्रिकिकरण वाढत अाहे. द्राक्ष, डाळिंब लागवडीबरोबरीने  कीडरोधकनेटमध्ये बीजोत्पादन दूधमोगरे कुटुंब करते. यासाठी वापरले जाणारे यंत्र, तांत्रिक कुशलता नंदाताईंनी जाणीवपूर्वक शिकून घेतले. अाज त्या यांत्रिकीकरणाच्या वापरात अव्वल झाल्या अाहेत. छोट्या ट्रॅक्टरने द्राक्ष, डाळिंब बागेत फवारणीचे काम त्या स्वतः करतात. एखाद्या दिवशी चालक न अाल्यास त्या स्वतः पुढाकार घेतात. पती कामानिमित्त बाहेर गावे गेल्यास कुटुंब प्रमुख या नात्याने नंदाताईच शेतीतील कामांचे नेतृत्व करतात.

कुटुंब वळले बीजोत्पादनाकडे फळबागांतून एकीकडे कुटुंबाचे उत्पन्न वाढले असताना दुसरीकडे नंदाताईंच्या पुढाकाराने दूधमोगरे कुटुंब अाता व्यावसायिक बीजोत्पादनाकडे वळाले अाहे. मिरची, टोमॅटो, कारले, खरबूज अशा विविध पिकांचे बीजोत्पादन त्यांच्या शेतात घेतले जाते. सध्या शेडनेट असून, त्यात बीजोत्पादन सुरू अाहे. वर्षभर यासाठी कुशल महिला कामगार हव्या असतात. नंदाताईच्या नेतृत्वात बीजोत्पादनासाठी करावयाचे तांत्रिक कामे कुशलतेने होतात. खर्चवजा जाता लाख ते सव्वा लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. डाळिंबाची वाॅटर शूट, द्राक्षाची फेलफूट काढणे ही कामेसुद्धा नंदाताई करतात. त्यांच्या अशा प्रकारच्या पुढाकारामुळे कुटुंबाचा बराचसा ताण कमी झाला अाहे.  

शेतातच नांदतेय कुटुंब दूधमोगरे कुटुंबाने शेतीलाच संपूर्णपणे वाहून घेतले अाहे. यासाठी जाणीवपूर्वक शेतातच घर बांधले. शेतात राहण्यामुळे पहाटेपासूनच कामे करता येतात. घरातील कामे अावरण्यास सासू मदत करीत असल्याने नंदाताई शेतीतील कामांकडे अधिक प्रमाणात लक्ष देतात. शेतीसंदर्भातील कुठलाही निर्णय घेताना सासरे, पती त्यांचा सल्ला व सहभाग अावर्जुन घेतात. नंदाताईंचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले अाहे. परंतु व्यवहार ज्ञान, शेतीतील प्रत्येक गोष्ट करण्याची जिद्द यामुळे अाज एक सक्षम स्त्री, कुशल व नेतृत्व करणारी महिला म्हणून त्यांची जडणघडण झाली. संपूर्ण जिल्ह्यात त्यांची तशी अोळख बनली आहे.

अाधुनिक शेतीकडे वाटचाल कृषी विभागाच्या सहकार्याने दूधमोगरे कुटुंबाने  शेतात पॅकिंग हाउस उभारले. शेतात ५० लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. या भागात वीज भारनियमनाचा प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करतो. यावर उपाय म्हणून शेततळ्यातील पाणी उपसण्यासाठी सौरऊर्जापंप बसवला अाहे. पाण्याचा बिकट प्रश्न असून, दूधमोगरे यांनी अाजवर २५ बोअर घेतल्या. मात्र पुरेशे पाणी मिळाले नाही. विहिरीने तर काही दिवसांपूर्वी तळ गाठला. अाता फळबागा, बीजोत्पादनाला शेततळ्याने मोठा अाधार दिला अाहे. नंदाताई दूधमोगरे, ९५७९६५३०२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com