agriculture news in marathi agrowon on need of new agriculture market system due to corona crises | Agrowon

शेतमाल विक्रीची नवी व्यवस्था

विजय सुकळकर
बुधवार, 8 एप्रिल 2020

सध्याच्या आणि कोरोना संकट टळल्यानंतरच्या परिस्थितीत फळे-भाजीपाल्यासह एकंदरीतच शेतमालाच्या विक्रीची नवी व्यवस्था उभी करावी लागेल. यांत शेतमालाची कमीत कमी हाताळणी होऊन तो थेट ग्राहकांच्या हातात पडला पाहिजे.
 

देशात कोरोनाचे संकट वाढतच आहे. हे संकट दूर झाले तरी सध्याच्या लॉकडाऊनमुळे शेती, सेवा, उद्योग-व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल झालेला असेल, हे मात्र निश्चित आहे. मोठ्या शहरांपासून गावपातळीपर्यंत आठवडे बाजार बंद आहेत. लहान उपहारगृहे ते पंचतारांकीत हॉटेल्स बंद आहेत. गाव-शहरांत थेट भाजीपाला विक्री सुरु आहे. परंतू त्यांस खूपच मर्यादा आहेत. भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे, त्यास दरही कमी मिळतोय. त्यामुळे भाजीपाला उत्पादक प्रचंड आर्थिक तोट्याचा सामना करीत आहेत. नवीन भाजीपाला लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नवीन रोपांची मागणी ५० टक्केहून अधिक घटली आहे. आधीच अपुरे मनुष्यबळ, कोकोपीट, बियाण्यासह इतरही निविष्ठांच्या तुटवड्यामुळे अडचणीत असलेले रोपवाटिका व्यावसायिक रोपांची मागणी घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. दूध, फळे-भाजीपाला ही अत्यावश्यक उत्पादने असल्याने यांच्या वाहतुक-विक्रीला बंदी नाही. सद्य परिस्थितीत आवश्यक परवान्याने त्यांची वाहतुक-विक्री करता येते. भाजीपाला खरेदीत योग्य काळजी घेतली, त्याची व्यवस्थित हाताळणी केली आणि चांगला शिजवून भाजीपाला खाल्ला तर त्यातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. उलट आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी फळे-भाजीपाल्याचा आहारात वापर वाढायला हवा. परंतू याबाबत शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत कोणाचेच योग्य प्रबोधन झाले नाही.

भाजीपाला उत्पादनात राज्यात अनेक लहान-मोठे शेतकरी आहेत. हंगामनिहाय विविध भाजीपाला पिकांची लागवड करुन हे शेतकरी राज्य, देश आणि जगभरात भाजीपाला पाठवितात. भाजीपाल्याची शेती ताजा पैसा मिळवून देणारी तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी मानली जाते. त्यामुळे सध्याची नियोजित भाजीपाला लागवड रद्द झाल्यास पुढे राज्यातील, देशातील भाजीपाला पुरवठा विस्कळीत होईल, किरकोळ बाजारातील भाजीपाला दर ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जातील. हे सर्व टाळण्यासाठी योग्य दक्षतेत भाजीपाल्याचा आहारात वापर करण्याबाबत ग्राहकांमध्ये व्यापक प्रबोधन व्हायला हवे. हे करीत असतानाच सध्याच्या आणि कोरोना संकट टळल्यानंतरच्या परिस्थितीत फळे-भाजीपाल्यासह एकंदरीतच शेतमालाच्या विक्रीची नवी व्यवस्था उभी करावी लागेल. यांत शेतमालाची कमीत कमी हाताळणी होऊन तो थेट ग्राहकांच्या हातात पडला पाहिजे. थेट शेतमाल विक्रीस बळ देणार असल्याचे कृषी, पणन विभागाकडून सातत्याने बोलले जाते. आता ही व्यवस्था राज्यात रुजवण्याची चांगली संधी चालून आली आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेत शेतकऱ्यांचे गट, समूह, उत्पादक कंपन्या यांची भुमिका मोलाची आहे. सध्या काही गट, शेतकरी उत्पादक कंपन्या थेट शेतमाल विक्री करताहेत. त्यांना सुद्धा फळे-भाजीपाला थेट ग्राहकांना विक्रीत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या कृषी तसेच पणन विभागाने तात्काळ दूर करायला हव्यात. त्यांना गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत शेतमाल वाहतूक, साठवणुक, विक्री, प्रक्रिया यांत काही सेवासुविधा लागत असल्यास त्याही त्वरीत पुरवायला हव्यात. अशा प्रकारची शेतमाल विक्रीची नवी व्यवस्था उभी राहिल्यास पुरवठा साखळी सुरळीत होऊन फळे-भाजीपाला यांची मागणी वाढेल, उत्पादकांना दरही चांगले मिळतील. सध्याचा भाजीपाला लागवडीबाबतचा संभ्रमही दूर होऊन राज्यात शेतीची व्यवस्थित बसलेली घडी विस्कटणार नाही.


इतर संपादकीय
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
कुलगुरु निवडीत नको तडजोडमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे (जि.अहमदनगर...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
पावसाच्या बदलत्या पॅटर्नचा अभ्यास कधी?‘‘दोन एकरातील सोयाबीन काढणीला आले असून पंधरा...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
किसान रेल्वे धावो सुसाट तुमची उमटलेली पाऊले नेहमी आत्मविश्वासपूरक आणि...
कोरोनाचे विदारक वास्तवभारतात ३० जानेवारी २०२० ला केवळ एक कोरोनाबाधित...
एका शोकांतिकेचे पुनरावर्तनदेशात एप्रिलपासून उन्हाळ कांद्याचा आवक हंगाम सुरू...
हा तर विश्वासघात!खरे तर जून ते सप्टेंबर या काळात कांद्याचे दर थोडे...
`अॅक्शन प्लॅन’ करेल काम!  मागील महिनाभरापासून विदर्भातील संत्रा उत्पादक...
कायदा कठोर अन् अंमलबजावणी हवी प्रभावी...शेतकऱ्यांना बनावट कीडनाशकांपासून संरक्षण...
अभियाने उदंड झाली, अंमलबजावणीचे काय?देशात शेतमाल खरेदीची अद्यापपर्यंत नीट घडी बसलीच...
आव्हान रोजगारवृद्धीचे!वाढती लोकसंख्या, अर्थव्यवस्थेचा अस्थिर वृद्धीदर,...
परतीच्या मॉन्सूनचा बदलता पॅटर्नदरवर्षी जून महिन्यात आपण ज्या मॉन्सूनची मोठ्या...
अनुकरणीय उपक्रमखरीप हंगाम आता संपत आला आहे. राज्यातील अनेक...