कांदा बीजोत्पादकांची कंपनीकडून फसवणूक

आम्ही घाम गाळून कांदा बियाणे पिकवले. मात्र आता करार करणाऱ्यांनी भाव देताना हात आखडता घेतला आहे. शासनाने न्याय द्यावा. - संतोष कडूजी खडसे, कांदा बीजोत्पादक, शेलू खडसे, ता. रिसोड, जि. वाशीम.
कांदा बीजोत्पादकांची कंपनीकडून फसवणूक
कांदा बीजोत्पादकांची कंपनीकडून फसवणूक

अकोला ः कांदा उत्पादक शेतकरी गेले काही वर्षे सातत्याने अडचणींना सामोरे जात असताना, आता कांदा बीजोत्पादक संकटात आले आहे. कंपन्यांकडून बीजोत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार रिसोड तालुक्‍यात पुढे आला आहे.

पेरणीच्या आधी कंपन्यांनी ३५ ते ४० हजार रुपये क्विंटलने करार केला होता, मात्र बहुतांश शेतकऱ्यांना अवघा १३ हजार रुपयांचा दर दिला असून, त्याचे धनादेश देण्यात आले. विशेष म्हणजे हे धनादेश कुणाला ऑक्‍टोबर तर कुणाला नोव्हेंबर महिन्यातील तारखांचे वितरित केले आहेत. हा प्रकार पाहून शेतकरी धास्तावले असून, न्यायाची मागणी करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्‍यातील शेलू खडसे, मोरगव्हाण, मोप, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द आदी गावांमध्ये कांदा बीजोत्पादन मोठ्या प्रमाणात घेणारे शेतकरी आहेत. गेल्या हंगामात या गावातील असंख्य शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांसाठी कांदा बीजोत्पादन घेतले.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांमार्फत मध्यस्थांनी कांदा बियाण्याचे करार केले. ३५ ते ४० हजार रुपये क्विंटलचा दर मिळेल असे सांगण्यात आले. करार करताना शेतकऱ्यांकडून कोरे चेक, स्टॅंप व सातबारा अशी कागदपत्रे घेतली गेली. शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ही कागदपत्रे संबंधित व्यक्तींनी त्यांच्याकडेच जमा ठेवली.

करारानुसार शेतकरी बीजोत्पादन घेण्याच्या कामाला लागले. कंपन्यांनी १६०० रुपये क्विंटल दराने कांदा शेतकऱ्यांना पुरविला. एकरी १५ क्विंटलपर्यंत कांदा पेरणीसाठी दिला गेला. याचे नगदी पैसे शेतकऱ्यांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये कांदा लागवड केली. मशागत केली व योग्य व्यवस्थापन करून बीजोत्पादन केले.

बियाणे तयार झाल्यानंतर संबंधितांनी ते नेले. परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा चुकाऱ्याचे धनादेश हातात पडले; तेव्हा शेतकरी चक्रावून गेले. करार ३५ ते ४० हजार रुपये क्विंटलचा झालेला असताना चुकारे मात्र १३ हजार रुपयांपर्यंत केले जात आहेत. शिवाय हे धनादेश पोस्ट डेटेट दिले आहेत. भविष्यात ते वटताना अडचण झाली तर करायचे काय, अशी भीतीसुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना लागवडीपासून काढणीपर्यंत ३५ ते ४० हजारांपर्यंत खर्च लागलेला आहे. त्यानंतर कुणाला एकरी दोनपासून चार क्विंटलपर्यंत बियाणे झाले. आता मिळत असलेल्या दराने हिशेब केला तर खर्चसुद्धा निघायला तयार नाही. ही चिंता अधिक भेडसावत आहे. आपली मोठी फसगत झाल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.

विविध कारणे देत टाळाटाळ बियाणे घेताना आता त्याची उगवणक्षमता, तसेच सध्याचे बाजारभाव अशी कारणे सांगितली जात आहेत. तुमच्या बियाण्याची उगवणक्षमता किती येते त्यावर चुकारे केले जातील, असेही शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. एकूणच या दडपशाहीने शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com