भूसंपादनातील विरोध मोडण्यासाठी महामार्ग अधिनियमाचा अध्यादेश

भूसंपादनातील विरोध मोडण्यासाठी महामार्ग अधिनियमाचा अध्यादेश
भूसंपादनातील विरोध मोडण्यासाठी महामार्ग अधिनियमाचा अध्यादेश

मुंबई  ः राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, पनवेल बडोदा महामार्ग तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडॉरला राजकीय आणि शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात बदल करून अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. ८) मान्यता दिली. या बदलाच्या आधारे विरोध असलेल्या जमिनीचेही संपादन करणे सरकारला सहज शक्य होणार आहे. 

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम-२०१८ मधील तरतुदींनुसार महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातील भूसंपादन विषयक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. २०१३ सालच्या कायद्यानुसार महामार्ग किंवा कोणत्याही प्रकल्पाला खासगी जमीन आवश्‍यक असल्यास जमीन मालक किंवा शेतकऱ्यांची संमती आवश्‍यक होती.

आता कायद्यात सुधारणा करण्यासाठी आवश्‍यक अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश जमीन संपादित केली असताना विरोध असलेली शिल्लक जमीनही संपादित करण्यास सरकारला अधिकार मिळणार आहे.

या अध्यादेशानुसार महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातील भूसंपादन हे भूसंपादन अधिनियम-१८९४ ऐवजी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३ अशी सुधारणा करण्यात आली आहे. तसेच भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३ नुसार भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत याच्या तरतुदी महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाखालील भूसंपादनासाठी लागू राहतील. त्याबाबत महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम १९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. 

या कायद्यामध्ये जमीन एकत्रीकरण योजनेमध्ये समाविष्ट असलेली जमीन संबंधित जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींच्या ऐच्छिक सहभागाबाबतच्या संमतीद्वारे प्राप्त करण्याची तरतूद आहे. तसेच या कायद्यातील कलम १९ जे नुसार जमीन एकत्रीकरण योजनेत स्वेच्छेने सहभागी न होणाऱ्या जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींच्या जमिनीचे संपादन हे जमीन संपादनासाठी लागू असलेल्या कायद्यानुसार करण्याची तरतूद असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com