परिचारक निलंबन अन् मुंडेंच्या कथित ध्वनिफितीवरून गोंधळ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचे मागे घेतलेले निलंबन आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कथित ध्वनिफीत प्रकरणावरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी (ता. ५) दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

त्याआधी प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीवर शिवसेना सदस्यांनी आक्रमकपणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली होती. त्यामुळे कामकाज वादळी होणाची चिन्हे दिसत होती. विधानसभेत सोमवारी सहाव्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच शिवसेनेच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरत घोषणा देण्यास सुरवात केली.

या वेळी प्रशांत परिचारक यांच्या निषेधाचा फलक शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत फडकावला. सत्ताधारीच वेलमध्ये उतरल्याने अध्यक्षांनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्यांनी परिचारकांचे निलंबन करा, जय जवान जय किसान, भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. 

या वेळी शिवसेना सदस्यांच्या मागणीला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "आमदार परिचारकांचे निलंबन रद्द करण्याचा विषय महत्त्वाचा आहे. परिचारकांनी सैनिकांचा अवमान करत देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की परिचारकांचे कायमस्वरूपी निलंबन करा.

परिचारकांनी सैनिकांचा अवमान केला असल्याने अनेक माजी सैनिकांनी आमच्याकडे तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेणे हे सभागृहाचा अवमान असल्याचे विखे पाटील म्हणाले. 

निवेदन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबाबत एकमताने वरच्या सभागृहात ठराव मंजूर झाला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीत धनंजय मुंडे, नीलम गोऱ्हे आणि त्या वेळी काँग्रेसकडून असलेले नारायण राणे होते. त्या समितीने निलंबन रद्द करण्याचा एकमताने ठराव घेतला आहे.

या समितीच्या शिफारशीवरून निलबंन रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला होता. समितीने जो निर्णय दिला, त्यात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आहेत. त्या वेळी काँग्रेसचे सदस्य असलेले राणेही आहेत, तर शिवसेनेच्या नीलमताईही आहेत. मात्र, परिचारकांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून गोंधळ वाढल्याने विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले. 

तिकडे विधान परिषदेतही शिवसेनेचे अनिल परब यांनी प्रशांत परिचारकांच्या निलंबनाची मागणी केली. या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांत गोंधळ सुरूच राहिल्याने दोन्हीकडील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com