चाऱ्यासाठी न्या... मोफत घ्या...

आमच्या भागात हुमणीने थैमान घालायला सुरवात केली आहे. अर्धवट वाढलेला ऊस तोडल्याशिवाय पर्याय नाही. वाढ पूर्ण नसल्याने त्याची विक्रीही करणे अशक्‍य आहे. यामुळे या भागात ज्यांना चाऱ्यासाठी ऊस हवा आहे, त्यांना ऊस उत्पादक शेतकरी मोफत देत आहे. हा ऊस जनावरेही पूर्ण खात नसल्याने इतर शेतकरीही तो न्यायला तयार नाहीत. पुंडलिक कोरे, जरळी, जि. कोल्हापूर
 हुमणीमुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान
हुमणीमुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान

कोल्हापूर : उसाचे फायदेशीर पीक घेणारे शेतकरीही यंदा हुमणीच्या तडाख्याने त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील हुमणीने खराब होणारा ऊस चाऱ्यासाठी मोफत दिल्याशिवाय पर्याय उरला नाही. मोफत न्या, चाऱ्यासाठी न्या; पण ऊस न्या असे म्हणण्याची वेळ हुमणीचा प्रादुर्भाव झालेल्या ऊस उत्पादकांवर आली आहे.

कारखान्यांनी हुमणी नियंत्रणासाठी एक अभियान म्हणून पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तांत्रिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. विशेष जो ऊस वाढीच्या अवस्थेत आहे त्या उसालाही याचा फटका बसत आहे.

यंदाचा ऊस हंगामात गेल्या वर्षीच्या दरापेक्षा जादा दर मिळूनही उत्पन्नात घट होणार असल्याने यंदाही ऊस उत्पादक नफ्यात येण्याची शक्‍यता कमी असल्याचे ऊस उत्पादकांचे म्हणणे आहे.

केवळ उपलब्ध पाण्याच्या साठ्यावर उसाची अपेक्षित वाढ होत नाही. पाऊस व पावसाळी वातावरणातून मिळणारे घटकही उसाच्या वाढीला महत्त्वाचे ठरत असतात. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात प्रत्येक वर्षी एक ते दोन महिने पावसाची संततधार असते. तर पूर्व भागात पावसाळी ढगाळ हवामान असल्याने उसाची वाढ चांगली होते.

यंदा मात्र आठ ते दहा दिवसांचा पावसाचा कालावधी सोडल्यास संपूर्ण पावसाचे प्राबल्य असणाऱ्या जुलै व ऑगस्ट महिन्यात पूर्णपणे उन्हाळासदृश परिस्थिती राहिली. यामुळे जमिनीचा वाफसा कमी झाला. अनेक ठिकाणी पाणी देऊनही जमिनीची तहान भागली नाही. परिणामी जमिनीत हुमणी किडीची मोठी वाढ झाली.

हुमणीने खरीप पिकांच्या मुळावर तर हल्ला केलाच; परंतु उसाची मुळेही खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम उसाच्या वाढीवर झाला. उसाची वाढ खुरटल्याने ऊस आहे त्या अवस्थेतच पिवळा होऊन खराब होऊ लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com