भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे 'फेल'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भंडारा  ः नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेसाठी सोमवारी (ता. २८) पोटनिवडणूक घेण्यात आली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात याकरिता मतदानाची प्रक्रिया पार पडली. परंतु, या प्रक्रियेत तब्बल ८० टक्‍के ईव्हीएम मशिन बंद पडल्याने विरोधकांनी फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. 

भाजपच्या धोरणाला कंटाळत तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या या जागेसाठी सोमवारी (ता. २८) मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे तर भाजपचे हेमंत पटले यांच्यात सरळ लढत आहे. परंतु, मतदानाच्या दिवशी गोंदिया जिल्ह्यातील तीन तर भंडारा जिल्ह्यातील पाचही तालुक्‍यांत मतदान यंत्रात बिघाडाचे प्रकार घडले. त्यामुळे मतदारांचा उत्साह असताना आलेल्या या अडचणींमुळे मतदारांचा हिरमोड झाला आणि बहुतांश मतदार घरी परतले. 

मतदानाच्या टक्‍केवारीवर याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. भंडारा जिल्ह्यात दुपारपर्यंत अवघे २२ टक्‍के मतदान झाले होते. अनेक केंद्रावर मतदान यंत्र दुरुस्त झाल्यानंतर काही वेळाने ते पुन्हा बंद पडत होते. प्रत्येक तालुक्‍यात केवळ एक इंजिनियर असल्याने त्याला एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पोचण्यास दीड ते दोन तासांचा वेळ लागत होता. या कालावधीत मतदानाची प्रक्रिया ठप्प पडत असल्याने मतदारांचा हिरमोड होत ते आल्या पावली परत असल्याचे चित्र बहुतांश केंद्रावर होते.

पालघरमध्येही ईव्हीएमचा गोंधळ पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी  सोमवारी (ता. २८) मतदान पार पडले. या ठिकाणी संध्याकाळी तीन वाजेपर्यंत २८ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान अनेक केंद्रांवर ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारी येत होत्या. तर बंद यंत्रे बदलून दिल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, यावरून दिवसभर गोंधळ होता. पालघरची ही निवडणूक भाजप व शिवसेनेने खूपच प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकाचा जोरदार प्रचार केला होता. या दोघांबरोबरच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचेही आव्हान तगडे होते. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यातच खऱ्या अर्थाने सामना रंगला होता. या ठिकाणी ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सुरतमधूनच 'ईव्हीएम' का आणल्या?  राज्यात फक्त दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत्या. त्यामुळे बाहेरून ईव्हीएम मशिन मागवण्याची गरज नव्हती. तरीही सुरतमधून ईव्हीएम मशिन का मागवल्या, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. आज सकाळपासून भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळेतच ईव्हीएम मशिन बिघाडाच्या तक्रारी येण्यास सुरवात झाली. त्याबाबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पटेल म्हणाले, २००० मशिनपैकी जवळपास ३०० मशिनमध्ये बिघाड आहे, भंडारा-गोंदियाचे तापमान सध्या ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. या उच्च तापमानामुळेच ईव्हीएमच्या सेन्सरमध्ये बिघाड होत आहे, असे कारण अधिकारी सांगत आहेत. अशा प्रकारे बिघाड होत असल्यास ईव्हीएमची विश्वासार्हता कशी मान्य करायची असा प्रश्नही पटेल यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com