उत्पादन खर्चात मोठी घट, पोल्ट्रीचा ‘मार्जिन’ वाढला

मागणीच्या प्रमाणात समतोल पुरवठा, प्रतिकूल हवामानामुळे नैसर्गिकरीत्या कमी होणारे उत्पादन आणि दरवर्षी वाढणारी मागणी या तिन्ही घटकांमुळे या वर्षी आतापर्यंत ब्रॉयलर्स मार्केट किफायती राहिले आहे. - कृष्णचरण, संचालक, कोमरला समूह.
पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

गेल्या महिनाभरात पोल्ट्री खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी घट झाली असून, त्यामुळे सध्याच्या दरपातळीवर ब्रॉयलर्स व अंड्यांच्या विक्रीवरील मार्जिनमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी बेंचमार्क नाशिक विभागात ७२ रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. गेल्या पंधरवड्यापासून बाजार स्थिरावला आहे. पुणे विभागात अंड्यांचा प्रतिशेकडा लिफ्टिंग दर मात्र प्रतिशेकडा २५ रु. बाजार नरमला आहे. ब्रॉयलर व लेअर पक्ष्यांच्या खाद्यातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या मक्याचे दर ऐन ऑफ सिझनमध्येच वर्षांतील नीचांकी पातळीवर पोचले आहेत.

सांगली विभागात १३८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर घसरले आहेत. यामुळे प्रतिकिलो उत्पादन खर्चात घट झाली आहे. गेल्या वर्षभरात सोयामिलचे सरासरी दरदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्याहून अधिक फरकाने स्वस्त आहेत. दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून उत्पादन खर्च कमी झालेला दिसताे.

ब्रॉयलर्स मार्केटसंदर्भात नाशिक येथील एव्ही ब्रॉयलर्सचे संचालक अरुण चव्हाण म्हणाले की, सध्या नाशिक विभागात पक्ष्यांची वजने सव्वादोन किलोच्या आत असून, विक्रीचा कुठलाही दबाव इंटिग्रेटर वा ओपन फार्मर्सवर नाही. गुजरात आणि मध्य प्रदेशातील बाजारभाव उत्तर महाराष्ट्राला आधार देणारे आहे. मधल्या काळात तापमानातील चढ-उतार, आर्द्रता आदींमुळे पक्ष्यांसाठी प्रतिकूल परिस्थिती होती. त्यात दोन किलोच्या आतील मालाची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. यामुळे पुढील काळात सरासरी वजने नियंत्रणात राहतील. नवरात्रीचाही बाजारावर फार मोठा फरक पडेल, असे दिसत नाही. एकूणच बाजाराची चाल उत्साहवर्धक आहे.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की दक्षिण भारतात दोन किलोच्या आत पक्ष्यांची वजने आहेत. सध्या बाजारात चांगली मागणी असून, नवरात्र वगळता खपवाढीच्या दृष्टीने अन्य अडथळे नाहीत. पुढे दसरा-दिवाळी हेदेखील सर्वाधिक खपाचे सण आहेत. ऑक्टोबर हिट, लांबलेल्या पावसाळ्यामुळे वाढती आर्द्रता किंवा प्रतिकूल हवामान आदींमुळे पक्ष्यांची वजने आणि पर्यायने पुरवठा हा नियंणात राहील. त्यामुळे बाजारभाव हे उत्पादन खर्चाच्या वर राहतील.

सध्या एका दिवसाच्या पिलांचे भाव तेजीत असून, त्यांचा तुटवडाही भासत आहे. त्यामुळे लहान शेतकऱ्यांकडील प्लेसमेंट घटलेली दिसते. तथापि संस्थात्मक प्लेसमेंट मात्र जैसे थे आहे. गेल्या आठवड्यात पिलांचे भाव प्रतिनग ४० रुपये तर हॅचिंग एग्जचे भाव प्रतिनग ३० रुपये या वर्षांतील उच्चांकी दराकडे वाटचाल करताना दिसले आहे. सध्याची प्लेसमेंट ही दिवाळीनंतर आणि थंडीच्या दिवसात येणारी असल्याने पिलांना मागणी आहे. कच्च्या मालाच्या दर घटल्याने झालेला उत्पादन खर्च कमी झाला आहे. ही बाबदेखील पिलांच्या व अंड्यांच्या भावाला आधार देत आहे.

पोल्ट्री दर

प्रकार  भाव  परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर   ७२  प्रतिकिलो  नाशिक
अंडी  ३४५  प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४० प्रतिनग  पुणे
हॅचिंग एग्ज ३० प्रतिनग मुंबई
मका १३८० प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २५,८०० प्रतिटन इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com