नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर टाकण्यात आलेल्या धाडींबाबत मला माहिती नाही. मात्र आयकर विभाग आणि अन्य विभागांना मिळालेली गाेपनीय माहिती किंवा तक्रारींनतरच धाडी टाकण्यात आल्या असतील. विनाकारण काेणी धाडी टाकत नाही. ज्या व्यापाऱ्यांनी हिशेब व्यवस्थित ठेवले असतील, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. - सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्री
कांदा
कांदा

लासलगाव/ नामपूर : लासलगावसह चांदवड, येवला, पिंपळगाव बसवंत, सटाणा, उमराने येथील व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने गुरुवारी (ता. १४) छापे टाकले. त्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प झाले होते.   गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची चौकशी सुरू केली होती. तसेच व्यापऱ्यांच्या घर, गोडाऊन, कार्यालयाची कसून तपासणी आयकर अधिकारी करत होते. आयकर विभागाने अचानकपणे टाकलेल्या छाप्यांमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यात लासलगावमधील ओमप्रकाश राका, कांतिलाल सुराणा या दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. परिणामी लासलगाव बाजार आवारात सर्वच लिलाव ठप्प झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. बाजार समितीत माल आणूनदेखील शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागले. कांदा व्यापारी साठवणुकीची मर्यादा पाळत नसल्याने छापे टाकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तर १८ सप्टेंबरपर्यंत नामपूर येथील कांदा मार्केट बंद राहणार असल्याचे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडनीस यांनी सांगितले.  दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून उन्हाळ कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी (ता. १४) रास्ता रोको आंदोलन केले. महसूल व पोलिस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.                   आॅगस्ट महिन्यात कांद्याचे दर अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. परंतु, सप्टेंबर महिन्यापासून कांद्याचे भाव सुमारे १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खालावल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या शेडवर धाडी टाकल्या जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. सत्ताधारी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा, बाजारभाव हस्तक्षेप योजना लागू करावी, शेतमालसाठी दर संरक्षण कायदा लागू करावा अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या. या वेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सावंत, आसखेडा येथील प्रगतिशील शेतकरी अमृत कापडनीस, नामपूर बाजार सामितीचे संचालक समीर सावंत, शशिकांत कोर, प्रशांत अहिरे, सचिन कापडनीस, मधुकर कापडनीस, युवक काँग्रेसचे महेंद्र पवार, संदीप कापडनीस, किरण अहिरे आदींसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. रास्ता रोको झाल्यानंतर सटाणा येथील नायब तहसीलदार विनोद चव्हाण, जायखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामुळे नामपूर- ताहराबाद रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती. आंदोलनकाळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून येथील कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत असल्याने व्यापाऱ्यांना साठवणुकीची अडचण निर्माण झाली आहे. मजूर टंचाई, आर्थिक टंचाई, कांदादराची दोलायमान स्थिती, शासनाची व्यापारीविरोधी भूमिका आदी बाबींमुळे १८ तारखेपर्यंत येथील कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.  - भाऊसाहेब कापडनीस, सभापती, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com