बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

पावसामुळे राजुरा येथील नळगंगा नदीला पाणी असे ओसंडून वाहिले.
पावसामुळे राजुरा येथील नळगंगा नदीला पाणी असे ओसंडून वाहिले.

अकोला : वऱ्हाडात पावसाळी वातावरण असून, अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. मेहकर, मलकापूर, सिंदखेडराजा, शेगाव, बुलडाणा, मोताळा या तालुक्‍यांमध्ये काही सर्कलमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी (ता. १४) दुपारी बुलडाणा तालुक्‍यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आल्याने काही काळ बुलडाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

दिवसभर हा पाऊस अधून-मधून येत होता. रात्रीसुद्धा पावसाची रिपरिप सुरू होती. शुक्रवारी (ता. १५) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावीत होत्या. बुलडाणा जिल्ह्यात हा पाऊस बऱ्यापैकी होत असताना, वाशीममध्ये जोर काहीसा कमी आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्‍यांमध्ये गेल्या २४ तासांत अत्यल्प पाऊस पडला आहे.

गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात वीज पडण्याच्या चार घटना घडल्या. यात दोन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. शेगाव तालुक्‍यातील जानोरी शिवारात जगन्नाथ ढोले यांच्या शेतात निंदण सुरू असताना पाऊस आला. यामुळे मजूर महिला कडुलिंबाच्या झाडाखाली उभ्या होत्या. याच झाडावर वीज पडल्याने मीरा जगन्नाथ ढोले (वय २१) व रेखा लक्ष्मण वानखडे (वय ३७) या दोघी घटनास्थळीच ठार झाल्या. कांताबाई जगन्नाथ ढोले, वंदना संतोष वानखडे या जखमी झाल्या. या शिवारापासून काही अंतरावर त्र्यंबक निंबोळकर यांच्या शेतात वीज पडली. या घटनेत रंजना आत्माराम डांगे व कमल समाधान निंबोळकर या महिला जखमी झाल्या.  मोताळा तालुक्‍यातील गुगळी शिवारात दुपारी वीज पडून विशाल भागवत कानडजे (वय २२, रा. रिधोरा खंडोपंत) याचा मृत्यू झाला. विशाल हा गुरे चारण्यासाठी गेला असता वीज पडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. वीज पडण्याची दुसरी घटना तालुक्‍यातील लिहा शिवारात घडली. यात सविता ढेकळे (वय २२), वंदना ढेकळे (वय २९) या महिला जखमी झाल्या आहेत.

तालुकानिहाय पाऊस (मिमी) ः जळगाव जामोद २.४, संग्रामपूर १४.८, चिखली ६.९, बुलडाणा २५.१, देऊळगावराजा ३.२, मेहकर २५.८, सिंदखेडराजा १३.५, लोणार १५,  खामगाव ३.५, शेगाव २६,  मलकापूर ४२, मोताळा २१.३,  नांदुरा २०.८,  बाळापूर ६.५, पातूर २९, अकोला २०.२, वाशीम ९.८,  रिसोड ८.९, मालेगाव ४.१, मानोरा ८, कारंजा ४. सर्कलनिहाय ४० मिमीपेक्षा अधिक पडलेला पाऊस ः कवठळ ४०, उंद्री ४२.२, बुलडाणा ५३, मेहकर ४४, शेलगाव ४८, लोणी ५३, अंजनी ५०, दुसरबीड ६५, शेगाव ४१, मनसगाव ४४, दाताळा ४९, नरवेल ५१, जांभूळधाबा ६५, पिंपरी ५०, महाळुंगी ४४, आलेगाव ४५, कापशी ७३,  बोरगाव ५८, शिवणी ५९. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com