बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त पंचनाम्यानुसार मदत

बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त पंचनाम्यानुसार मदत

मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी संयुक्त पंचनाम्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या दरानुसार मदत देण्यासाठी केंद्र सरकारला ३,३७३ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचे निवेदन मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. २२) विधानसभेत केले. 

राज्यात गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार ४३ लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे ३३ ते ३४ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झाले आहे.

यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार पिकांना मदत दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानुसार नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची विनंती केली.

त्यासाठी २,४२५ कोटी रुपयांच्या मदत मागणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता. यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. तर उर्वरीत चारशे कोटी रुपयांची मागणी धान उत्पादक व ओखीग्रस्तांना भरपाई देण्यासाठी करण्यात आली होती. 

दरम्यान, २३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार सरकारने कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेखालील पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना एनडीआरआच्या दरानुसार आणि निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. त्याचा विचार करून शासनाने हा निर्णय रद्द केला आहे.

तसेच आता पंचनाम्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या दरानुसार मदत देण्याचा निर्णय १७ मार्च २०१८ रोजी घेतला आहे. तसेच त्यापोटी केंद्र सरकारला ३,३७३ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. 

एनडीआरएफनुसार नुकसानीपोटी कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपये, बागायती क्षेत्राला हेक्टरी १३,५०० रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांना हेक्टरी १८,००० रुपये मदत देय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com