गावांचे कारभारी आळंदीत दाखल; सरपंच महापरिषदेस आज प्रारंभ

गावांचे कारभारी आळंदीत दाखल; सरपंच महापरिषदेस आज प्रारंभ
गावांचे कारभारी आळंदीत दाखल; सरपंच महापरिषदेस आज प्रारंभ

आळंदी, जि. पुणे  : ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने आजपासून (ता. २४) होणाऱ्या दोनदिवसीय कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या मंथनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महापरिषदेचे उद्‍घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासाची दिशा कशी स्पष्ट करतात, याविषयी सरपंचांमध्ये उत्सुकता आहे. उत्साही सरपंच मंडळी शुक्रवारी रात्रीपासूनच आळंदीत दाखल व्हायला सुरवात झाली. माउलींचे दर्शन आणि ग्रामविकासाचा प्रसाद, असा दुहेरी लाभ महापरिषदेच्या निमित्ताने मिळत असल्याची भावना सरपंचांमध्ये आहे.   

आळंदीत माउली समाधी मंदिराजवळ फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात आज (शनिवार) सकाळी दहा वाजता सरपंच महापरिषदेला सुरवात होईल. कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण विषयांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या या महापरिषदेसाठी एक हजार सरपंचांची निवड करण्यात आली आहे. राज्याचा गावगाडा कुशलपणे चालविणारे अनेक युवा, सुशिक्षित सरपंच तसेच कर्तबगार महिला सरपंच महापरिषदेत सहभागी होत आहेत. महापरिषदेचा समारोप रविवारी सायंकाळी राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.  

महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स लि., पॉवर्ड बाय जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., प्रायोजक सोनाई पशू आहार, मारुती सुझुकी इंडिया लि., बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., विक्रम टी, डॉलिन- सिडलर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा बायोसिस्टिम्स प्रा. लि., राज्य जलसंधारण विभाग, रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहेत.

‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने आजवर सात सरपंच महापरिषदा घेण्यात आल्या असून, त्यातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाचे अनोखे पर्व ग्रामीण महाराष्ट्रात सुरू झाले आहे. महापरिषदांमधील मार्गदर्शनाचा लाभ घेतलेल्या शेकडो सरपंचांनी आपल्या गावांचा कायापालट केला आहे. त्याच्या यशकथाही ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. म्हणूनच ‘ॲग्रोवन’च्या महापरिषदेमध्ये सहभाग हा सरपंचांना आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचा आणि अत्यावश्यक टप्पा वाटतो.      ट्रॅक्टरसह अनेक बक्षिसे महापरिषदेत सहभागी सरपंचांना फोर्स मोटर्सतर्फे ट्रॅक्टर जिंकण्याची संधी आहे. त्याशिवाय विक्रम टीतर्फे ग्रामपंचायतींसाठी १५ सॅनिटरी वेंडिंग मशिन्स, सोनाई पशुआहारतर्फे १० सरपंचांना गिफ्ट हॅम्पर्स, तसेच डॉलिन सीडल इलेक्ट्रॉनिक्सतर्फे १० मोबाईल पंप गार्ड अशी बक्षिसे जिंकण्याची संधी सरपंचांना मिळणार आहे.        ग्रामविकासाचा जागर महापरिषदेच्या निमित्ताने तज्ज्ञांची, धोरणकर्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी राज्यातील सरपंचांना मिळते आहे. दोन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये शनिवारी (ता. २४) सरपंचांसाठी आदर्शवत ठरलेले पोपटराव पवार सरपंचांशी संवाद साधणार आहेत. सर्वश्री विलास शिंदे (सह्याद्री अॅग्रोची यशोगाथा), अमोल बिरारी (महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रम), जयंत पाटील कुर्डूकर (सरकारी मदतीशिवाय ग्रामविकास) सरपंचांना कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या विविध अंगांवर मार्गदर्शन करतील. रविवारी (ता.२५) राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे कृषिमालाच्या हमीभावाविषयी बोलतील. याशिवाय दिनेश भोसले (दुष्काळात आधार पूरक उद्योगांचा), नामदेव घुले (ग्रामपंचायत अधिनियम) मार्गदर्शन करतील. यानंतरच्या चर्चासत्रात चंदू पाटील मारकवार, सुभाष भोसले हे गावविकासावर पहिल्या चर्चासत्रात, तर तनिष्का उपक्रमातील सदस्या श्रीकला जाधव, अनिता माळगे दुसऱ्या चर्चासत्रात सहभागी होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com