ग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे

ग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे
ग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे

आळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची शिदोरी घेतच आपल्या गावाकडे परतले.  सरपंचांच्या माध्यमातून शेती व गावाचा विकास कसा घडवून आणता येईल, याविषयीचे मंथन घडवून आणणारी एक ऐतिहासिक चळवळ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स होते. स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक, तर राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचाही सहयोग परिषदेला लाभला.  गावात मूलभूत सुविधा, तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी योजना कशा पद्धतीने राबविता येतील, याचे मार्गदर्शन या महापरिषदेत सरपंचांना मिळाले. पंचायतराज व्यवस्थेचा पाया सरपंच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केल्यामुळे आपले पद छोटे नाही याची जाणीव सरपंचांना झाली. तसेच, गावविकासात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री आणि राज्य सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा विश्वास या महापरिषदेत मिळाल्याने सरपंच मंडळी समाधानी चेहऱ्याने गावाकडे परतत होती. 

सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने अनेक सरपंच एकमेकांचे मित्र बनले. तसेच, पोपटराव पवार, चंदू पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ सरपंचाना भेटण्याची, चंद्रकांत दळवी यांच्यासारख्या आयएएस अधिकाऱ्याशी संपर्क करण्याची सुविधा सरपंचांना मिळाल्यामुळे गावाच्या विकासाला प्रेरक ठरणारे दुवे मिळाल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व जलसंधारणमंत्र्यांची भूमिका सरपंचांना एकाच व्यासपीठावर ऐकण्यास मिळाल्यामुळे ग्रामविकासाची राज्याची वाटचालदेखील सरपंचांना स्पष्टपणे समजली. 

गावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य केंद्र, पोषण आहार, महिला व बालकल्याण, डेअरी, विविध कार्यकारी सोसायट्या, जलसंधारण, आदर्श गाव, तसेच विविध सेवा यांची उभारणी कशी करायची, त्यासाठी निधी कसा उभारायचा, याचे धडे दोन दिवस सरपंचांनी गिरवले. आळंदीमधील सातव्या सरपंच महापरिषदेमुळे आतापर्यंत ‘सकाळ अग्रोवन’च्या माध्यमातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाचे प्रशिक्षण मिळालेल्या सरपंचांची संख्या आता आठ हजार झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com