Agriculture news in marathi, AGROWON Smart Awards 2017, Pune | Agrowon

नृत्य, गीतांनी सायंकाळ झाली रंगतदार

रविवार, 31 डिसेंबर 2017

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील ताईत झालेल्या ‘ॲग्रोवन’चा प्रारंभ झाला, ते हेच पुण्यातील प्रसिद्ध टिळक स्मारक सभागृह शुक्रवारी अन्नदात्याच्या सन्मानानं नक्कीच गहिरवलं असेल...! पुरस्कारार्थींच्या कर्तृत्वाची चित्रफीत पाहताना उत्सुकतेने सभागृहात निर्माण होणारी शांतता, नाव जाहीर होताच आप्तस्वकियांपासून सर्वांच्या टाळ्यांचा रांगडा कडकडाट... प्रत्येक पुरस्कारार्थीचे कर्तृत्व उलगडून सांगण्यापूर्वी बहारदार गाणी... नृत्य आणि विनोदी चुटक्यांनी रंगविलेली ही सायंकाळ अनेक वर्षं सर्वांच्या मनी रेंगाळेल यात शंकाच नाही...

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील ताईत झालेल्या ‘ॲग्रोवन’चा प्रारंभ झाला, ते हेच पुण्यातील प्रसिद्ध टिळक स्मारक सभागृह शुक्रवारी अन्नदात्याच्या सन्मानानं नक्कीच गहिरवलं असेल...! पुरस्कारार्थींच्या कर्तृत्वाची चित्रफीत पाहताना उत्सुकतेने सभागृहात निर्माण होणारी शांतता, नाव जाहीर होताच आप्तस्वकियांपासून सर्वांच्या टाळ्यांचा रांगडा कडकडाट... प्रत्येक पुरस्कारार्थीचे कर्तृत्व उलगडून सांगण्यापूर्वी बहारदार गाणी... नृत्य आणि विनोदी चुटक्यांनी रंगविलेली ही सायंकाळ अनेक वर्षं सर्वांच्या मनी रेंगाळेल यात शंकाच नाही... म्हणूनच हा शेतकऱ्याचा हिरवा ध्यास, जिद्द आणि कष्टाचा सन्मान असल्याची भावना उपस्थितांच्या तोंडून व्यक्त झाली. 

जगाचा पोशिंदा म्हणवणारा नेहमीच सर्वत्र उपेक्षितच राहतो. या जाणीव आणि नेणिवेतून शेतकऱ्याच्या पाठीवरही कौतुकाची थाप मारत, त्याच्या कर्तृत्वाला सन्मानित करण्यासाठी सकाळ-अॅग्रोवनने महाराष्ट्राच्या काळ्या मातीत सोनं उगवणाऱ्या कृषिरत्नांचा शोध घेतला. या प्रेरणादायी कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाचाही हृदय सत्कारसोहळा पार पडला. या वेळी काही क्षण भावुक होत उपस्थित पुणेकरांनीही शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम ठोकला. 

सकाळ-अॅग्रोवनचे स्मार्ट शेतकरी पुरस्कार २०१७ चे वितरण येथील टिळक स्मारक मंदिरात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात झाले. या सोहळ्याच्या वैभवात सांस्कृतिक कार्यक्रमाने तर आणखीनच रंगत आणली. सुरेल संगीताच्या साक्षीने एकेका शेतकऱ्याच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देत हा सोहळा टप्प्याटप्प्याने बहरत गेला. त्याला उपस्थितांमधून टाळ्यांच्या कडकडाची साथ मिळत होती. तब्बल साडेचार तास चाललेल्या या सोहळ्यात निवेदिका समीरा गुजर-जोशी यांचे ओघवते निवेदन सर्वांच्या स्मरणात राहणारे ठरले. गायिका प्रियांका बर्वे, गायक हृषीकेश रानडे यांच्या जुगलबंदीने उपस्थित कानसेन तृप्त झाले. योगेश शिरसाट यांच्या विनोदी चुटक्यांनी हलके फुलके मनोरंजन केले. अशा या दिमाखदार सोहळ्याच्या केंद्रस्थानी अर्थातच शेतकरी राजा होता. 

सतत अस्मानी आणि सुल्तानी संकटांचा सामना करीत पराकोटीच्या नकारात्मक वातावरणात आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टीही घडत आहेत, याचीच जाणीव या सोहळ्याच्या माध्यमातून झाली. राज्यस्तरीय, विभागस्तरीय, महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करीत आणि अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी हा मुख्य पुरस्कार, अशा विविध अकरा श्रेणीतील पुरस्कारांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी, महिला शेतकरी आणि प्रक्रिया उद्योजकांच्या कार्याचा गुणगौरव पार पडला. या सोहळ्यात पुरस्कारार्थींपैकी बहुतांश शेतकऱ्यांना प्रथमच गौरविण्यात येत होते. त्यामुळे त्यांच्या भावना शब्दांत वर्णन करण्यापलीकडच्या होत्या. प्रतिक्रिया देताना त्यांना शब्दही फुटत नव्हते, इतके ते भावुक झाले होते. बहुतांश पुरस्कारार्थी शेतकरी वयोवृद्ध आई-वडिलांसह सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी स्वतःच्या मुलांना पुरस्कार मिळाल्यानंतर शेतकरी माता-पित्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. 

तसेच शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात भूतकाळातील संघर्षाच्या आठवणी आणि दुसऱ्या डोळ्यात गौरवाप्रती कृतज्ञतेची भावना दिसून येत होती. पुरस्कार स्वीकारताना काही शेतकरी व्यासपीठावर नतमस्तक होत असल्याचे चित्र उपस्थितांच्या मनाला साद घालून गेले. शेतकऱ्यांनी अॅग्रोवनचा हा पुरस्कार आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. शेतकऱ्यांमधील दिलदारपणा, सच्चेपणा आणि साधेपणाची प्रचिती यातून दिसून येत होती.