सोलापूर बाजार समिती निवडणूक; अर्ज दाखल करण्यास उरले दोन दिवस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या, शुक्रवार (ता. १) आणि शनिवारी (ता. २) असे दोनच दिवस आता हातात उरले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अद्यापही पॅनेलची घोषणा केलेली नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचीच सर्वाधिक पळापळ सुरू आहे. 

कोणत्याही नेत्याविना कार्यकर्ते परस्पर अर्ज भरून माघारी परतत आहेत. भाजप-शिवसेना युती की राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी असे कोणतेही चित्र अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी भाजपअंतर्गतच पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दोन गटांतच ही निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

बाजार समितीच्या संचालक मंडळावर गेल्याच आठवड्यात पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर सत्ताधारी भाजपला रान मोकळे झाले आहे. पोलिस कारवाईमुळे तत्कालीन सभापती दिलीप माने, महादेव चाकोते यांच्यासह तत्कालीन संचालक सध्या टूरवर आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्यापही काहीच हालचाली दिसत नाहीत. राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी गेल्या काही वर्षांपासून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बाजार समितीच्या कारभारात लक्ष घातले आहे. 

बाजार समितीच्या संचालकांवरील कारवाईचा विषय असो की आता जाहीर झालेली निवडणूक असो, त्यांनी प्रत्येकवेळी अप्रत्यक्षपणे बाजार समितीतील राजकारण चांगलेच प्रतिष्ठेचे केले आहे. साहजिकच, आता ते भाजपकडून पूर्ण ताकदीनिशी उतरून बाजार समिती ताब्यात घेण्याचे प्रयत्न करत आहेत. पण पण दुसरीकडे भाजपअंतर्गतच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा गट या निवडणुकीत सक्रिय झाल्याचे दिसते.

स्वतः पालकमंत्री विजयकुमार देशमुख कुंभारी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेही भाजपमध्ये सध्या तरी सन्नाटाच दिसत आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर नेत्यांपेक्षा कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या सूचनेची वाट न पाहता अर्ज भरण्यासाठी धावपळ करत आहेत. 

दरम्यान गुरुवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित पवार, सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे माजी संचालक भारत जाधव, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र साठे, कॉंग्रेसचे अप्पासाहेब बिराजदार, भाजपचे श्रीमंत बंडगर यांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com