वृक्षसंवर्धनासाठी अनोखे संमेलन

आज आणि उद्या (१३ आणि १४ फेब्रुवारी) असे दोन दिवस सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यामधील बीड शहराच्या जवळ पालवणच्या डोंगरावर देशामधील पहिले वृक्षसंमेलन होत आहे. या दुष्काळी जिल्ह्यामध्ये आज दोन टक्केसुद्धा नैसर्गिक जंगल शिल्लक राहिलेले नाही. अशा ठिकाणी हे संमेलन भरवून या भागातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

अमेरिकेमधील टेक्सास प्रांतात मी एक उद्यान पहावयास गेलो होतो. योगायोगाने तिथे फुलपाखरांचे संमेलन सुरू होते. काही मोजकी म्हणजे शंभर एक माणसे तेथे उपस्थित होती आणि आश्चर्य म्हणजे हजारोंच्या संख्येने विविध प्रकारची फुलपाखरे सर्वत्र बागडत होती. संमेलनाचा खरा अर्थ मला तेथे कळाला. फुलपाखरांच्या विविध जाती, त्यांच्या विविध अवस्था, त्यांच्या खाद्य वनस्पती या सर्वांचे तेथे संरक्षण, संवर्धन केले जात होते. लोकांना ते समाजावूनही दिले जात होते आणि जाताना हातात एक फुलपाखराचे रंगीत कॅलेंडरसुद्धा दिले जात होते. असे संमेलन आठवणीतून जाणे केवळ अशक्यच! आज याचे मुद्दाम स्मरण होण्याचे कारण म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दोन दिवस भरणारे देशामधील पहिले वृक्षसंमेलन! 

पन्नास साठ वर्षापासूनचा मला उस्मानाबाद-बीड रस्ता आणि एसटीचा प्रवास आठवतो. बीडच्या घाटामधून बस ताशी जेमतेम एक दोन किलोमीटर वेगाने जात असे. आम्ही डोळे मिटून, घाबरून पण वाहकाच्या कौशल्यामुळे सुखरुप प्रवास करत असू. समोर दुसरे वाहन आले की बसला थांबावे लागे. केवढी घनदाट वनराई होती आणि त्यामध्ये ‘बेंडसुरा’ धरणाचे अथांग पाणी पाहिले की काळजाचे पाणी होत असे. तो सर्व निसर्ग, ती नदी, ते धरण आणि डोंगरावर लिहिलेले धरणाचे पांढऱ्या अक्षरामधील नाव आजही मी विसरू शकत नाही. त्यानंतर काही वर्षापूर्वी याच बीडचा मी रणरणत्या उन्हामध्ये भयाण दुष्काळात याच घाटामधून बसने ताशी ४० किमी वेगाने प्रवास केला होता. दुहेरी रस्ता, उघडे बोडखे डोंगर, सुसाट वेगाने धावणऱ्या गाड्या आणि पाण्याचा थेंबही नसलेले बेंडसुरा धरण पाहिले. या वेळी मात्र डोळे उघडे होते. बीड शहराच्या परिसरात होणाऱ्या वृक्षसंमेलनाची बातमी वाचली. तीन वर्षात पालवणच्या डोंगराचे सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने नंदनवन झाले.

जवळपास तीन लाख झाडे लावली गेली, परिसर हरित झाला, जैवविविधता वाढली, मागील वर्षाच्या धो धो पावसामध्ये धरण ओसंडून वाहू लागले. किती आनंदाच्या गोष्टी! निसर्ग हसला तरच आपण आनंदी आणि हसणार ना! पण हे समजणार कुणाला, एकट्या सयाजी शिंदेला समजले म्हणजे सगळ्यांना समजले का? त्यासाठी संमेलनास जावयास हवे, प्रत्यक्ष वृक्षांना पहावयास हवे, त्यांना स्पर्श करावयास हवा, त्याचा आनंद घ्यावयास हवा तरच असे संमेलन यशस्वी होते आणि आपण काहीतरी मोलाचा संदेश घेऊन गावी परततो. वृक्षलागवड, संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलामधील वृक्षांची सकारात्मक भूमिका अधोरेखित करण्यासाठी देशामधील हे पहिले वृक्षसंमेलन होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने दिलेल्या दोनशे हेक्टर क्षेत्रात गेल्या तीन वर्षात ‘सह्याद्री देवराई’ हा प्रकल्प शासन, वृक्षप्रेमी आणि लोकसहभागतून राबविला गेला. ‘येऊन येऊन येणार कोण? झाडांशिवाय आहेच कोण?’ या घोषणेने स्थानिक परिसरामधील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आणि आज याच प्रेरणेमधून हा दुष्काळी भाग ५० ते ६० विविध प्रजातींच्या तब्बल तीन लाख वृक्षाच्या पर्णसंभाराने बहरून गेला आहे. 

वृक्षलागवड हे एकट्याचे काम नाही, त्यासाठी लाखो हात एकत्र येण्याची गरज असते. यशोगाथा अशाच तयार होतात हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी हे एक निमित्त आहे. या संमेलनाच्या उद््घाटनाचा अध्यक्ष आहे एक वटवृक्ष. साहित्य संमेलनात ज्याप्रमाणे ग्रंथदिंडी काढतात त्याचप्रमाणे येथेही वृक्षदिंडी निघणार आहे. शुक्रवारी १४ फेब्रुवारी या दिवशीच्या सांगता समारंभास पक्षीराज गरुड आणि अजगर हजर असणार आहेत. एका पक्षीप्रेमीच्या मदतीने तंदुरुस्त झालेला हा गरुड समारोपाच्या कार्यक्रमात आकाशात मुक्त भरारी घेणार आहे. त्याचबरोबर जखमी अजगरही आता तंदुरुस्त झाल्याने जंगलात जाणार आहे. पालवणच्या या नंदनवनामध्ये वृक्षप्रेमी, जिल्ह्यामधील सर्व शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांना वृक्षरुपामधून सत्तावीस नक्षत्रे, सप्तऋषी, पंचवटी आणि रॉक गार्डनसुद्धा पहावयास मिळणार आहे. साहित्य संमेलनामध्ये आपण भरपूर पुस्तकांची खरेदी करतो, त्याचप्रमाणे येथेही आपणास खरेदी करावयाची आहे, मात्र ही अल्प किमतीत मिळणाऱ्या वृक्षरोपांची. प्रत्येकाने संमेलनास येताना तांब्याभर पाणी या तहानलेल्या वृक्षासाठी जरुर आणावे, असेही संवेदनशील आवाहन सयाजी शिंदे करतात. 

पाच सहा दशकापूर्वी खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ६० टक्क्यांपर्यंत वृक्षराजी असणाऱ्‍या मराठवाड्यात आज जेमतेम पाच टक्केच जंगल आहे, ही शेतकऱ्यां‍साठी आणि शेतीसाठी धोक्याची घंटा आहे. तिचा घंटानाद मोठा होईपर्यंत आपण सावध झाले पाहिजे. डोंगर टेकड्या हरित झाल्या तरच पावसाचे पाणी धरले जाऊ शकते आणि उगमापासून नद्या पुन्हा वाहू शकतात. म्हणूनच अशा यशोगाथा मराठवाड्यामधील प्रत्येक उजाड डोंगरावर, माळरानावर वृक्षाच्या हरित लेखनीमधून न मिटता लिहिणे आणि त्या ठिकाणी अशा वृक्षसंमेलनाच्या चळवळी लोकसहभागामधून उभ्या राहणे ही या भूभागासाठी काळाची गरज  आहे. डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com