agriculture news in marathi agrowon special article on 3 months monsoon analysis | Page 2 ||| Agrowon

पावसाच्या सरासरीमागचं वास्तव

डॉ. रंजन केळकर
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

जून, जुलै व ऑगस्ट २०१९ या तीन महिन्यांत महाराष्ट्रात पडलेल्या पावसाची सरासरी काढली, तर ती सामान्यापेक्षा २० टक्के अधिक आहे. अर्थातच हा सरासरी आकडा आल्हाद देणारा आहे. तरीही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्त जनतेला किंवा सोलापूर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यंदाचा मॉन्सून सामान्य झाला असल्याचं पटवून देणं मात्र फार कठीण जाणार आहे. 
 

यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने आता होऊन गेले आहेत. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत देशभरात पडलेल्या पावसाची सरासरी सामान्याच्या अगदी १०० टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात जर पाऊस व्यवस्थित पडला, तर हा आकडा कदाचित बदलणारही नाही. म्हणून यंदाचा मॉन्सून एक आदर्श मॉन्सून  म्हणायचा का नाही? कारण मॉन्सूनचा पाऊस हा केवळ आकडेवारीचा खेळ होऊ शकत नाही. 

१ जूनपासून ३० सप्टेंबरच्या दरम्यान देशभरात जो काही पाऊस पडतो, मग तो कुठंही, कधीही असो, त्याची सरासरी हवामानशास्त्रज्ञ काढतात आणि केवळ त्या एका आकड्यावरून देशावरचा मॉन्सून सामान्य होता किंवा नव्हता हे ते ठरवत असतात. त्याचप्रमाणं मॉन्सूनचं आगमन व्हायच्या पुष्कळ दिवस आधी त्याचा पाऊस सामान्य असेल किंवा नसेल याचं भाकीत केवळ एका सरासरी आकड्याच्या रूपात सांगितलं जातं. हवामानशास्त्रज्ञ त्याला दीर्घ अवधी पूर्वानुमान म्हणतात. त्या पूर्वानुमानातील पावसाच्या सरासरी आकड्यात ४-५ टक्के चूक होण्याची शक्यताही वर्तविली जाते. पण मुख्य म्हणजे दीर्घ अवधी पूर्वानुमानात देशातील कोणत्या भागात दुष्काळ पडू शकेल आणि कोणत्या भागात अतिवृष्टी होऊ शकेल याविषयी कसलंही भाकीत केलं जात नाही. आगामी मॉन्सूनचं सरासरी पर्जन्यमान सामान्य किंवा सामान्याच्या जवळपास राहील, असं पूर्वानुमान जेव्हा एप्रिल-मे महिन्यांत हवामान विभागाकडून वर्तवलं जातं तेव्हा साहजिकच शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर एक सुंदर स्वप्न उभं राहतं. पण अनेकदा एखाद्या लहान शेतावरची परिस्थिती सबंध देशाच्या सरासरीपेक्षा अगदीच निराळी ठरू शकते आणि त्यावर शेती करणाऱ्याचा अपेक्षाभंग होतो.

सामान्य मॉन्सूनचा खरा अर्थ
सन १९८९ पासून २००१ पर्यंतच्या तेरा वर्षांत सलगपणे भारत देशाला सामान्य मॉन्सून लाभला होता. विशेष म्हणजे त्यातील प्रत्येक वर्षी हवामान विभागानं मॉन्सून सामान्य राहील, असं दीर्घ अवधी पूर्वानुमान जाहीर केलं होतं आणि प्रत्येक वर्षी ते खरं ठरलं होतं. त्या काळीही पर्जन्यमानाचं वितरण देशावर सर्वत्र सम-समान झालं होतं असं नाही. पण मॉन्सून एकंदरीत सामान्य असण्याचं प्रमाण हे होतं, की सलग तेरा वर्षं देशाचं अन्नधान्य उत्पादन वाढत गेलं होतं. धान्याची कोठारं भरून वाहत चालली होती. देश धान्याची आयात करण्याऐवजी निर्यात करू लागला होता. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं होतं. त्यामुळंच २००२ मध्ये जेव्हा मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याचा सामना करायला देश आधीच सक्षम बनलेला होता. म्हणून केवळ आकड्यांच्या चौकटीत बसवून मॉन्सूनला सामान्य ठरवलं जाऊ नये. त्याचे सुपरिणाम दृष्टीस पडले पाहिजेत.
या वर्षीच्या मॉन्सूनची परिस्थिती मात्र अगदीच निराळी आहे. मॉन्सून सामान्य राहण्याचे संकेत हवामान विभागानं आधी दिले असले, तरी यंदाचे जून आणि जुलै महिने हे शेतीच्या दृष्टीनं विपरीत ठरले. जून महिन्याचं देशावरील सरासरी पर्जन्यमान सामान्याहून ३३ टक्के कमी भरलं. जून व जुलै या दोन महिन्यांचं देशावरील एकत्रित पर्जन्यमान सामान्यापेक्षा १९ टक्के कमी होतं. पण त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अपेक्षेपेक्षा इतका जास्त पाऊस पडला, की ही त्रुटी संपूर्णपणे भरून निघाली. तीन महिन्यांत मॉन्सूनच्या देशावरील सरासरी पर्जन्यमानाचं स्वरूप पूर्णपणे बदलल्याचं आपण पाहिलं. सप्टेंबर अखेरीस, म्हणजे मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचा हिशेब बंद करण्यात येईल तेव्हापर्यंत सरासरी पर्जन्यमानाचा आकडा आणखी वाढण्याची आणि या वर्षीचा मॉन्सून सामान्य झाल्याची घोषणा केली जाण्याची चांगली शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील परिस्थिती
जून, जुलै व ऑगस्ट २०१९ या तीन महिन्यांत महाराष्ट्रात पडलेल्या पावसाची सरासरी काढली, तर ती सामान्यापेक्षा २० टक्के अधिक आहे. अर्थातच, हा सरासरी आकडा आल्हाद देणारा आहे. तरीही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्त जनतेला किंवा सोलापूर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यंदाचा मॉन्सून सामान्य झाला असल्याचं पटवून देणं मात्र फार कठीण जाणार आहे. राज्यात मुळातच मॉन्सूनचा पाऊस खूप उशिरा सुरू झाला होता. त्यानंतर जून व जुलै महिन्यांतील पाऊस बहुतेक कोकणात आणि घाटमाथ्यावर पडत राहिला. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पावसाचं प्रमाण तुलनेनं फार कमी राहिलं होतं. अनेक भागांत पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाची खरी सुरुवात झाली ती जुलैच्या अखेरीस. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही दक्षिण मध्य महाराष्ट्रावर दमदार पाऊस बरसला. रिकामी असलेली अनेक धरणं काठोकाठ भरली. त्यांतील पाणी सोडावं लागलं. परिणामी, कोल्हापूर-सांगलीत महापुरानं थैमान घातलं. पण तिकडे मराठवाड्यात मात्र पाऊस नीट पडलाच नाही. 

महाराष्ट्राच्या चार हवामानशास्त्रीय उपविभागांत जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचं सरासरी पर्जन्यमान पुढीलप्रमाणं आहे. मध्य महाराष्ट्रात सामान्यापेक्षा ५३ टक्के अधिक, कोकणात सामान्यापेक्षा ३३ टक्के अधिक, विदर्भात सामान्यापेक्षा ४ टक्के कमी, पण मराठवाड्यात सामान्यापेक्षा ३० टक्के कमी. जिल्हा पातळीवरचे पर्जन्यमानाचे आकडे पाहिले, तर पर्जन्याची विषमता जास्त स्पष्ट होऊ लागते. सोलापूर जिल्ह्यात मॉन्सूनच्या जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतील पाऊस - ५० टक्के म्हणजे सामान्याच्या निम्मा पडला आहे. बीड जिल्ह्यात - ४३ टक्के, परभणीत - ३९ टक्के, जालना व लातूरमध्ये - ३३ टक्के, आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही - ३६ टक्के हे आकडे बोलके आहेत. आमच्याकडे पाऊस कधी पडणार अशी विचारणा करणारे फोन मला अजूनही मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून येत असतात. त्यावरून तेथील परिस्थिती किती बिकट आहे, हे समजतं.

हवामानशास्त्र विभागानं मॉन्सूनच्या दीर्घ अवधी पूर्वानुमान देण्याच्या प्रणालीत वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत. पण अजूनही मॉन्सून सामान्य असेल किंवा नसेल हे फक्त एका सरासरी आकड्यावरून सांगितलं जातं. त्यातही ४-५ टक्के चूक व्हायची शक्यता असते. आज आपल्याला गरज आहे ती अनावृष्टी आणि अतिवृष्टी याविषयी सखोल व विशिष्ट माहिती देणाऱ्या दीर्ध अवधी पूर्वानुमानाची. शेतकऱ्यांना त्याच्या पिकांच्या नियोजनासाठी अशा पूर्वानुमानांची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर, त्यांचा भ्रमनिरास होतच राहील.
 

डॉ. रंजन केळकर : ९८५०१८३४७५
(लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक आहेत.)


इतर संपादकीय
बांधावरच्या तरुणाईला गरज स्व-संवादाची!अभिनेता सुशांतसिंह राजपूतने नुकताच टोकाचा निर्णय...
आरोग्य निर्भरतेसाठी पशुधन गाळतेय ‘लाळ’ राज्यात पशुरोग निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा...
राजर्षींचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य दोन एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर...
आपत्ती शिकविते नियोजनप्रभावी विस्तार शिक्षण यंत्रणा नसल्याने शाश्वत...
सडेवाडीचा आदर्शया वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
शेतकऱ्यांना हवी थेट आर्थिक मदतकोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेमधून...
दुबार पेरणीस शेतकऱ्यांना उभे करा राज्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक...
श्रमाचा बांध  ऐन पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यानंतर...
पर्यटन पंढरीचा ‘निसर्ग’  निसर्ग आणि कोकण यांचे अतिशय जवळचे नाते आहे....
सुधारित तंत्रा’चा सरळ मार्ग  आपल्या देशात एचटीबीटी कापूस, बीटी वांगे, जीएम (...