agriculture news in marathi agrowon special article on agrarian crises part 2 | Agrowon

योग्य नियोजनातून करा भविष्य सुरक्षित

योगेश शेटे
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

ज्या लोकांना पर्यायी उत्पन्नाचे साधन आहे, त्या लोकांचे जीवन आणि फक्त शेतीवरच जीवन जगत आहेत. त्यांचे जीवन यात खूप मोठी तफावत आहे. ही तफावत जर कमी करायची असेल तर राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गैरसरकारी संघटना, तरुण वर्ग या सर्वांना विश्वासात घेऊनच एकत्रित मार्ग काढावा लागेल.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांनंतर चांगला विचार मानवी जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे, असा संदेश देणारी आपली शाश्वत शेतीनिष्ठ जीवनप्रणाली आहे; परंतु उदारीकरणाच्या नावाखाली जगासाठी बाजारपेठ आपण खुली केली, त्याचा काही अंशी फायदा झाला असला तरी भारतीय जीवनावर मात्र खूप मोठा परिणाम झाला आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. मानवी जीवनात कितीही भौतिकवादी गोष्टींचा उपभोग घेतला तरी जीवनाचा खरा मार्ग आपल्या संस्कृतीने आधीच सांगून ठेवला आहे. आज हा मार्ग परदेशातील लोकांनादेखील समजू लागला आहे. आपण मात्र भौतिक वादाच्या लाटेवर स्वार होऊन वेगळ्याच गोष्टींत मशगूल आहोत. या गोष्टी या ठिकाणी मांडण्याचे कारण एवढेच, की स्पर्धेच्या नावाखाली मोठे लग्न, मोठे घर, सामाजिक प्रतिष्ठा, चैन या गोष्टींपासून दूर राहून आपली आनंदी जीवनशैली जपणारा समाधानी शेतकरीदेखील आता या सर्व भौतिक गोष्टींच्या फंदात पडून आपले समाधान संपवत चालला आहे. पर्यायाने सावकारी कर्ज, बँकांचे व्याज या चक्रात अडकून आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहे. तेव्हा या काळात शेतकऱ्यांनी अतिरिक्त खर्चापेक्षा आपल्या अत्यावश्यक बाबींवर अधिक लक्ष द्यायला हवे.

सध्या सर्वांत ज्वलंत आणि जिवंत विषय जर शेतकरी समाजाला कोणता भेडसावत असेल तर तो म्हणजे या समाजातील मुलांच्या लग्नांचा. शेतकऱ्याचे सामाजिक, आर्थिक पातळीवर इतके अतोनात हाल चालू आहेत की आज कनिष्ठ नोकरी उत्तम झाली आहे. उत्तम शेती कनिष्ठ झाली आहे. समाजातील काही उदाहरणांवरून असे दिसून येते की पाच हजार रुपये महिना नोकरी असणाऱ्या तरुणाचे लग्न होते; परंतु ज्याला स्वतःची पाच एकर जमीन आहे, अशा तरुणाचे लग्न होत नाही. कृषीसमाजाचा हा खूप मोठा अवमान आहे. यावरून हेच दिसून येते की, कठीण काळात मदतीला शेतीच धावून येणार आहे मग ती कर्ज काढायला असो किंवा विकून मोठी अडचण भागवायला असो. जर यात बदल झाला नाही, तर आपण वेगळ्या प्रकारच्या सामाजिक संकटांना सामोरे जाऊ. मानवी जीवनात विवाह अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. गृहस्थी जीवन आणि कौटुंबिक स्वास्थ्य याला आता जगाने मान्यता दिली आहे. मनुष्य कौटुंबिक वातावरणात सुंदर जीवन जगू शकतो; परंतु ७० टक्के लोकांच्या कुटुंबाला सुरुंग लावण्याचे कामच आपण आपल्या शेतीविषयक धोरणातून करीत आहोत. ज्या लोकांना पर्यायी उत्पन्नाचे साधन आहे त्या लोकांचे जीवन आणि फक्त शेतीवरच जीवन जगत आहेत त्यांचे जीवन यात खूप मोठी तफावत आहे. ही तफावत जर कमी करायची असेल तर राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गैरसरकारी संघटना, तरुण वर्ग या सर्वांना विश्वासात घेऊनच एकत्रित मार्ग काढावा लागेल. आज काही लोक, अभिनेते, व्यापारी, खेळाडू मोठा भूभाग खरेदी करत आहेत आणि शेतकऱ्याच्या पंक्तीत बसत आहेत. ही स्पर्धा शक्य नाही; कारण जमिनीच्या विकासासाठी इतर बाजूला कोट्यवधी रुपये आहेत आणि शेतकरी मात्र दारोदारी सावकारी कर्जासाठी धावत राहतो. यासाठी सरकारने शेतकरी शब्द परिभाषेत बदल करणे आवश्यक आहे.

अनेकदा शेतकऱ्याची आत्महत्या हा विषय चर्चेसाठी घेतला जातो; परंतु त्यातून योग्य निष्कर्ष आणि त्याच्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत. यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्तेस निसर्ग, पिकाचा भाव इथपासून ते शेतकऱ्याचे व्यक्तिगत आयुष्य, जीवनपद्धती आणि व्यसन जबाबदार असेपर्यंतची चर्चा होते. शेतकरी आत्महत्या हा विषय सामाजिकदृष्ट्या खूप गंभीर होत चालला आहे. याबरोबर वर उल्लेख केल्याप्रमाणे शेतकरी कुटुंबातील तरुणांची लग्न आणि काबाडकष्ट करून मुलांना शिकवून त्यांना काम नसल्याने वाढणारी बेरोजगारी याचा विचार केल्यास सामाजिक व आर्थिक पातळीवर जो शेतकरी खचतो आणि त्याचे वैयक्तिक जीवनही त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाते, त्याचवेळी शेवटी आत्महत्येचा मार्ग निवडतो. नोकरी, व्यवसाय, राजकारण या क्षेत्रातील जीवन आणि फक्त शेतीवर जगावे लागणारे जीवन यात खूप मोठा फरक आहे. या ठिकाणी इतर क्षेत्राला कुठेही कमी लेखण्याचा उद्देश नाही. कारण कुठल्याच क्षेत्रात कष्टाला पर्याय नसतो; परंतु तरीही सुरक्षितता नावाचा प्रकारच भारतीय शेतकऱ्यांना राहिलेला नाही. निसर्ग असो, व्यवस्था असो किंवा शेतमालाचे दर असोत सर्वच बाबतीत शेतकरी असुरक्षित झाला आहे. अशावेळी पिकाला योग्य भाव मिळावा ही त्याची अपेक्षा रास्तच आहे; परंतु भांडवलशाहीच्या सूत्रात कच्चा माल फुकटच मिळावा, अशी तरतूद करून ठेवली आहे. जेणेकरून पक्यामालाची किंमत त्यांना मापात ठेवता यावी; पण ही शेतकरी वर्गाची वर्षानुवर्षे चाललेली शुद्ध लुबाडणूक आहे. हे सर्व करत असताना सरकार नावाची अदृश्य ताकददेखील उद्योगपतींनाच पाठीशी घालताना दिसते आहे.

शेतकऱ्याच्या जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढ किंवा शेतमालाच्या दरात वाढ जेवढी व्हायला हवी होती तेवढी झाली नाही. जागतिकीकरण व उदारीकरण यामुळे भारतीय लोकांचे जीवनमान थोड्याबहुत प्रमाणात भौतिकवादाकडे म्हणजे चंगळवादाकडे झुकले आहे. त्यामुळे हौस या नावाखाली लग्न, बारसे, सण-समारंभ, मृत्यूनंतरचे विधी यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. विशेष म्हणजे यात विधी-समारंभात बरेचजण गबरही होत आहेत. शेतकरी मात्र अजूनही कात टाकेनासा झाला आहे. सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुकडोजी महाराजांची ग्रामगीता सवडीने कधीतरी वाचावी. जेणेकरून जीवनाचे आणि ग्रामीण भागाचे खरे वास्तव, समस्या आणि त्यावरची साधी सोपी उपाययोजना लक्षात येईल. प्रत्येकाने आपला उत्पन्न स्रोत आणि भविष्यातील नियोजन याचा विचार करून खर्च करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा शाही म्हणून केले जाणारे विवाह हे कष्टाच्या, घामाच्या पैशाचे नसतात तर चतुराईने कमावलेल्या पैशाचे असतात, हे आमच्या तरुण पिढीला कळत नाही. अशा वेळी स्पर्धेपोटी या अनावश्यक खर्चापेक्षा पैशाचा वापर शिक्षण, नवीन व्यवसाय उभारणी तसेच तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांनी करावा. अन्यथा येणारे दिवस आणखी बिकट आहेत. शेतकऱ्यांजवळ एकच साधन आहे ते म्हणजे परंपरागत शेती.

आणि सध्या सर्वांचे एकच लक्ष्य आहे शेती बळकावयाची. त्यासाठी दरापासून ते पाण्यापर्यंत आणि बियाणांपासून ते खतापर्यंत सगळ्यांचे राजकारण सुरु आहे. जमीन आणि पर्यायाने आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर खूप विचार करून पुढे जावे लागेल. शेतीबरोबरच इतर ठिकाणी प्रयत्न करून आपले आपण भांडवल उभे केले पाहिजे. तरच शेतकरी टिकेल. अन्यथा मजुरी किंवा शहराकडे काम पाहणे हे दोनच पर्याय शेतकऱ्यांपुढे उरतील.

योगेश शेटे


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...