उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलती

शेती हा उद्योगच आहे, हे सूत्र आत्तापर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांनी लक्षात घेतलेले दिसत नाही. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना करीत आहेत. पण, शेती हा उद्योगच असल्यामुळे वेगळा दर्जा देण्याची आवश्यकता नाही. उलट उद्योगाप्रमाणे शेतीला सर्व सवलती त्वरित दिल्या पाहिजेत.
agrowon editorial article
agrowon editorial article

शेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. उद्योगाची व्याख्या काय? भांडवल गुंतवणे, उत्पादन सुरू करणे आणि नंतर बाजारात आपल्या उत्पादनांची विक्री करणे. शेतीमध्ये जमीन ही एक भांडवली मालमत्ता आहे आणि पेरणीच्या सर्व कामांनंतर स्वयंरोजगाराद्वारे किंवा कामगारांना गुंतवून किंवा पीक भागीदारीच्या (क्रॉप शेअरिंग) तत्त्वावर विविध उत्पादने बाजारात आणली जातात. त्यामुळे उद्योगास दिल्या जास असलेल्या सर्व सुविधा शेतीला दिल्या पाहिजेत.

उदाहरणार्थ जमीन मालमत्ता मूल्यानुसार पत क्षमता मूल्य (क्रेडिट रेटिंग), आवश्यकतेनुसार कर्ज आणि विकास प्रकल्पांच्या आधारावर ''फायनान्स कन्सोर्टियम''अंतर्गत उद्योगास देण्यात आलेल्या सुविधेनुसार एकापेक्षा जास्त बँकाकडून कर्ज घेण्यास परवानगी मिळायला हवी. रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकानुसार बँकांकडून कर्जमाफीची सवलत आणि आजारी उद्योगांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सवलतीच्या योजनांनुसार आजारी शेतीला वेळेवर दिलासा दिला पाहिजे.

कर्जमाफीमुळे शेतकरी अधिकच असंतुष्ट कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतीला सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी दिली. पण, या कर्जमाफीमुळे शेतकरी अधिकच असंतुष्ट व असमाधानी झाला आहे. ग्रामीण भागातील सेवा सोसायट्या बंद पडत आहेत. शेतकरी सभासद आणि सचिव हे संयुक्तपणे कार्यालयांना टाळे लावत आहेत. कर्जमाफी दिली आहे पण सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी काही वेळ लागणार असल्यामुळे मार्चपर्यंत प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा करण्यात येणार आहे. याचा अर्थ या कर्जमाफीचा लाभ  शेतकऱ्यांना त्वरित मिळणार नाही. पण, हा विलंब अनिवार्य असेल तर ताबडतोब काही मार्ग काढला पाहिजे. तरच शेतकरी असंतोष दूर होणार आहे. रक्कम जमा होणार पण वेळ लागणार असेल तर बँका आणि ग्रामीण भागातील सहकारी सोसायट्या यांना सर्व थकीत कर्जाच्या वसुलीला ताबडतोब स्थगिती देणे हाच पर्याय आहे. शिवाय कर्जमाफीची सरकारी घोषणा करताना सातबारावरील नोंदीनुसार थकीत कर्जावरील रकमेतून दोन लाख माफी असे स्पष्ट केले असताना प्रत्यक्ष जाहिरातीत आणि परिपत्रकात (जीआर) फक्त पीककर्जावरील रक्कम असे नमूद केले आहे. या त्रुटीमुळे कर्जमाफी देऊनही असंतोष वाढला आहे

''एनपीए''मुळे शेती अधिक संकटात शेती क्षेत्र अधिक संकटात आहे याचे एक कारण म्हणजे ''एनपीए'' ही सर्व कर्जासाठी लागू केलेली परदेशी संकल्पना. एनपीएची संकल्पना (नव्वद दिवसांनंतर कर्जाच्या हप्त्यांची थकबाकी असल्यास लगेच वसुली व जप्तीची कारवाई करणे) भारतीय अर्थव्यवस्थेतील वास्तवाचा विचार न करता ही अमेरिकन संकल्पना आपल्या देशात आणली आहे. कारण कर्जदाराला निश्चित मासिक उत्पन्न मिळत असेल जसे शासकीय किंवा इतर सुरक्षित नोकरीत नियमित मासिक वेतन मिळवणाऱ्या कर्जदारांना नियमित हफ्ते भरता येतील. पण शेतकरी किंवा इतर सर्व व्यावसायिकांच्या बाबतीत ज्यांचे मासिक निश्चित उत्पन्न नाही व बाजारातील चढउतार किंवा इतर व्यावसायिक अडचणींवर येणारी रक्कम अवलंबून असेल; तर त्यांना नियमित हप्ते भरता येणार नाहीत. अशा सर्वाना ''एनपीए'' ची कोणतीही अट लागू करू नये, हे वास्तव स्थितीशी सुसंगत अपेक्षा आहे. याकडे भारतातील केंद्रीय पातळीवरील राज्यकर्ते आणि योजनाकारांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. सहकारी बँकिंग आणि इतर सर्व वित्तीय संस्था आणि बँक अशा सर्व क्षेत्रांमध्ये ''एनपीए'' च्या निकषाने शेतकरी, इतर व्यावसायिक आणि कर्ज देणाऱ्या संस्थांसमोर संकट निर्माण केले आहे.

कर्ज वसुली स्थगित केली पाहिजे थकीत कर्जे ''एनपीए''मुळे  काळ्या यादीत टाकली आहेत आणि कर्जदारांना ''एनपीए''च्या निकषांनुसार वसुलीला सामोरे जावे लागत आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे पण ही रक्कम आणखी तीन महिन्यांनी प्रत्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे सर्व थकीत कर्जे (माफी मिळणारे दोन लाख सह) मार्च २०२० पर्यंत थकबाकी आहेत. याचा अर्थ असा की सर्व कर्जाचा ''एनपीए'' शिक्का शिल्लक आहे. त्यामुळे बँका किंवा ग्रामीण सहकारी संस्था संकटाला सामोरे जात आहेत. एनपीएमुळे सर्व व्यवहार रोखले आहेत. एनपीएमुळे कर्ज खाती आणि कर्ज देणाऱ्या संस्था काळ्या यादीत जातात. बँका आणि ग्रामीण पतसंस्था यांनी पीककर्ज मंजूर केले असले तरी    ''एनपीए''मुळे त्यांचे वितरण रोखले आहे. जर पीककर्जच रोखले गेले, वितरित केलेच नाही तर ते थकीत आणि माफ कसे होईल?  यामुळेच आता शेती क्षेत्रातील सर्व थकीत कर्जे वसुली स्थगित केली पाहिजेत. जेणेकरून ''एनपीए'' शिक्का काढून टाकला जाईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज व्यवहाराचे कामकाज रोखले गेले आहे त्यांचा सातबारा कर्ज मुक्त करण्यासाठी सरसकट कर्जमाफीचा अंतिम विचार होईपर्यंत रोखलेले व्यवहार चालू ठेवले पाहिजेत.

प्रभाकर कुलकर्णी ः ९०११०९९३१५ (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com