तंत्रज्ञान स्वातंत्र्यास आग्रही कार्यकर्ता

एका बेजबाबदार दुचाकीस्वाराने अजित नरदे यांना धडक दिली आणि दवाखान्यातील चार दिवसांच्या झुंजीनंतर अखेर त्यांचा ४ फेब्रुवारी २०२० ला मृत्यू झाला. एक अत्यंत अभ्यासू आणि तर्ककठोर विचार करणारा बिनीचा शिलेदार आपण गमावला. अजित १९८१ सालात झालेल्या निपाणी येथील तंबाखू आंदोलनापासून शरद जोशी आणि शेतकरी संघटनेशी जोडले गेले ते शेवटपर्यंतच!
agrowon editorial article
agrowon editorial article

शरद जोशी यांना ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात जे हिरे गवसले, त्यातील अजित नरदे वरच्या फळीतले. अजित यांचे वडील नागेंद्र नरदे हे जयसिंगपूर येथील स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यलढ्यात अनेक वेळा वेगवेगळ्या जेलमध्ये गेलेले. इंग्रजांच्या विरुद्ध देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे आणि लढणारे जाज्वल्य कार्यकर्ते. तिकडे भगतसिंग यांना अटक झाली आणि इंग्रज त्यांना फासावर चढवणार, हे पक्के झाले. इकडे नागेंद्र नरदे यांनी काहीही करून भगतसिंगांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले (अर्थात ते सगळे गुप्तपणे.) त्यासाठी ते बोटीने पेशावरला गेले. त्यांनी भगतसिंग ज्या जेलमध्ये आहेत, ती जेल फोडण्यापासून अनेक पर्याय तपासून पहिले. पण, हेतू साध्य झाला नाही. 

अजित अशा क्रांतिकारकाच्या पोटी जन्मलेला, आपल्या वडिलांसारखाच क्रांतिकारी. पडद्यामागे, प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा कार्यकर्ता. त्यांना साखर डायरी सुरू करायची होती. शरद जोशी यांना त्यांनी तसे सांगितले. शरद जोशी यांनी एक अट घातली. तुला शेतकरी संघटनेचे आणि माझे नाव तुझ्या व्यावसायिक कामासाठी वापरता येणार नाही. त्यांनी ती अट मान्य केली. तेव्हापासून शेतकरी संघटनेचा बिल्ला आणि नाव त्यांच्या व्यावसायिक कामासाठी ते कधीही वापरत नसत. अगदी शरद जोशी गेल्यानंतरसुद्धा आत्तापर्यंत. ऐंशीच्या दशकात शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीत कोणताही वैयक्तिक अजेंडा नसलेल्या चळवळीला समर्पित असलेल्या कार्यकर्त्यांपैकी अजित एक; म्हणूनच ते शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे झुंजत राहिले.

प्रत्येक क्षेत्रातील अभ्यास आणि कार्यकारणभाव लक्षात घेऊन तर्काच्या आधाराने त्या विषयाचा विचार करण्याची आणि मांडण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. शेतकऱ्यांना बाजारपेठेचे आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे आहे. ते मिळाले, की शेतकऱ्यांना कोणत्याही मदतीची गरज पडणार नाही, या शरद जोशी यांच्या विचाराचा अजितवर प्रभाव होता. अजितसारख्या कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांच्या स्वतंत्रतेच्या विचारांना समृद्ध केले. ऐंशीच्या दशकात शेतकरी चळवळीत शरद जोशी यांच्या संपर्कात वैचारिक पातळीवरील जे परिपक्व आणि स्वप्रकाशित अगणित कार्यकर्ते आले, त्यातील अजित पहिल्या फळीचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता होता. उसाच्या अतिरिक्त सरकारी संरक्षणामुळे मराठवाड्यासारख्या कमी पाण्याच्या प्रदेशातील पाण्याची पातळी हजार फुटांच्या खाली गेली आहे. याबाबच माझा व त्याचा वाद कायम चालूच राहायचा. सरकारच्या अतिरिक्त संरक्षामुळे, संरक्षित पिकाचे अतिरिक्त उत्पादन तर होतेच; शिवाय शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या नावावर सरकारी तिजोरीवर जो डल्ला मारला जातो तो वेगळाच; सहकाराने ते सिद्ध केले आहे. उसाशिवाय गहू आणि तांदूळ या प्रमुख पिकांनाही सरकारचे संरक्षण आहे, ही तिन्ही पिके भरपूर पाणी पिणारे. तरीही, या पिकांचे अतिरिक्त उत्पादन आपण करतोच आहोत. हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, हे त्यांनाही मान्य होते. गहू आणि तांदळाची खरेदी करून तो सार्वजनिक वितरणव्यवस्थेच्या मार्फत वाटप करण्याचा अत्यंत खर्चीक आणि अव्यवहार्य अव्यापारेशु व्यापार आपले सरकार करते, याबद्दल ते अस्वस्थ असायचे.

शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आणि शरद जोशी यांच्या प्रयत्नामुळे बीटी कापसाच्या लागवडीला सरकारने २००२ साली परवानगी दिली. त्यामुळे भारतात कापसाचे उत्पादन वाढले. हिरव्या बोंडअळीला प्रतिकार करण्याची क्षमता असलेले हे बियाणे शेतकऱ्यांना वरदान ठरले. हे बियाणे वापरायला मिळाले पाहिजे, यासाठी शेतकरी संघटनेने मोठा संघर्ष केला होता. त्यात अजित यांचा वाट मोठा. त्याच धर्तीवर एचटीबीटी हे बियाणेही अधिकृतपणे वापरण्याचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी शेतकरी संघटना आणि अजित आग्रही राहिले आहेत. गेल्या काही वर्षांत एचटीबीटी कपाशीच्या अनधिकृत बियाण्यांची महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात; पण गुप्तपणे लागवड करीत आहेत. गेल्या वर्षी अजित आणि ललित बहाळे यांच्या नेतृत्वात अनधिकृत एचटीबीटी कपाशीच्या लागवडीचे आंदोलन वाजतगाजत आणि उघडपणे केले. असा अनधिकृत कापूस लावण्यात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका आहे, हे माहिती असूनसुद्धा शेतकऱ्यांनी तो धोका पत्करून त्या कपाशीची लागवड केली आणि हे आंदोलन केले. त्याची जागतिक पातळीवरील प्रसिद्धी माध्यमांनीही योग्य ती दखल घेतली.

संकरित असो की जीएम आणि एचटीबीटी, हे बियाणे अनेक कंपन्या तयार करीत असतात. बीटी आणि एचटीबीटी या प्रकारची बियाणे तयार करण्यात मोन्सॅंटो ही कंपनी आघाडीवर आहे. या क्षेत्रात तिची मक्तेदारी आहे. कोणत्याही पिकाचे बीटी आणि एचटीबीटी बियाणे वापरण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असले पाहिजे, अशी मागणी लावून धरणाऱ्याला, तथाकथित पर्यावरणवादी आणि रासायनिक लॉबीच्या तालावर नाचणारे लोक, मोन्सॅंटो कंपनीचे दलाल ठरवतात. मात्र, अजित यांना त्याची पर्वा नव्हती. विविध आघाड्या सांभाळणारा अष्टपैलू आणि अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्वाचा आणि संपूर्ण स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. आणखी एका त्याच्या वैशिष्ट्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे; तो म्हणजे तात्त्विक चर्चेत त्याचा कोणाशीही कितीही टोकाचा वाद झाला, तर ते त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध बिघडू देत नसत, ते खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. अजितबद्दल लिहिण्यासारखे कितीतरी विषय आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला आता वाटचाल करावी लागणार आहे, हे मन मान्य करायला तयार नाही. नियतीपुढे कोणाचे चालत नसते म्हणतात; ते मान्य करून आपल्याला शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा लढा अजितशिवायच चालू ठेवावा लागणार आहे. अजितसाठी तीच खरी श्रद्धांजली असेल. अनंत देशपांडे : ८६६८३२६९५२ (लेखक शेतकरी संघटना न्यासचे विश्‍वस्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com