agriculture news in marathi agrowon special article on availibility of water and requirement | Agrowon

नीट समजून घेऊया ‘पाण्याचे गणित’
प्रा. एच. एम. देसरडा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

भारतात अगदी अवर्षणप्रवण भागातदेखील किमान ३०० मिमी पाऊस पडतोच. म्हणजे हेक्टरी तीस लाख लिटर पाणी तेथे उपलब्ध होते. या कमी पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशात हेक्टरी ३ एवढी मानवी लोकसंख्या असते. अर्थात, माणशी किमान दहा लाख लिटर पाणी प्रत्येक गावशिवारात उपलब्ध होते. एवढ्या पाण्यावर बाहेरून अजिबात पाणी न आणता पिण्याच्या व किमान भरणपोषण देणाऱ्या खाद्यान्न, भाजीपाला, फळे व दुधाच्या गरजा भागविता येणे शक्य आहे.  
 

आजमितीला अवर्षण, पाणीटंचाई या देशासमोरील अव्वल समस्या आहेत. मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे तसेच जून-जुलै महिन्यात खंड पडल्यामुळे २० जुलैला ११८ जिल्हे अवर्षण सावटाखाली आहेत. हवामान खात्याच्या आलेखानुसार भारताच्या ३६ पर्जन्य विभागांपैकी २८ विभागातील किमान एक जिल्हा प्रभावित झाला आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली नांदेड व परभणी हे चार जिल्हे या यादीत होते. आता जुलै शेवटी व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोकण, घाटमाध्यासह मराठवाड्यातील या जिल्ह्यांतही चांगला पाऊस झाला आहे. परंतु लातूर, बीड, उस्मानाबाद यांसह विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत तरी दमदार पाऊस झालेला नाही. या संदर्भात एक बाब आवर्जून लक्षात घेतली पाहिजे, की अवर्षण व दुष्काळ या भिन्न बाबी आहेत. ‘अवर्षण’ हा निसर्ग चक्राचा भाग असून दुष्काळ हा चुकीच्या पाणी नियोजन, धोरण, व्यवस्थापन व वापरामुळे ओढवतो. म्हणजे पाणीटंचाई व दुष्काळ मानवनिर्मित, शासननिर्मित आहेत. आजीमाजी सरकारे, धोरणकर्ते त्यास मुख्यत: जबाबदार आहेत. भरीसभर म्हणजे हवामान बदलामुळे अनिश्चितता, दोलायमानता, अतिवृष्टी, अनावृष्टी, ढगफुटी आणि चक्रीवादळांचे प्रमाण व व्याप्ती वाढत आहे. हे सर्व बदलते वास्तव नीट ध्यानी घेतल्याखेरीज अवर्षण, पाणीटंचाई व दुष्काळाचा मुकाबला करता येणार नाही. 

गत काही दशकातील बदलते वास्तव लक्षात घेऊन मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कारकिर्दीत पाण्याला अग्रक्रम देण्याचे योजले असून पाण्याशी संबंधित विविध खाती व विभागांचे एकत्रीकरण करून नवे जलशक्ती मंत्रालय कार्यान्वित केले आहे. पंतप्रधानाने ‘मन की बात’ मध्ये आगामी पाणी नियोजन व धोरणाची रूपरेषा अधोरेखित केली आहे. ‘नलसे जल’ हे भाजप घोषणापत्रातील आश्वासन ‘हरघर जल’ या नावाने सरकारची भूमिका म्हणून अर्थसंकल्पात मान्य करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ धर्तीवर हा सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून २५० पाणी समस्याग्रस्त जिल्ह्यांत याची अंमलबजावणी होणार आहे. यात महाराष्ट्रातील बीड, बुलडाणा, अमरावती, वाशीम, सांगली, अहमदनगर, नाशिक व पुणे या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र, यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद आणि कार्यवाहीचा आराखडा याचा तपशिल मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आजघडीला उपलब्ध नाही. यासंबंधी जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या वक्तव्य व मुलाखतीतून समोर आलेला तपशील पुढीलप्रमाणे आहे. पाणीटंचाई निवारणासाठी वर्षाजल संकलन; पाण्याचा निगुतीने न्याय्य वापर; पुनर्वापर आणि वनीकरण अशी चतु:सूत्री सांगितली. तत्त्वत: हे ठीक आहे. मात्र हे सर्व नेमके कोण व कसे करणार? प्रारंभी पाण्यासंबंधी काही मूलभूत व मुख्य मुद्दे लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. मुळात भारत हा जलसंपन्न देश आहे. जगातील एकूण जमिनीपैकी अवघी दोन टक्के जमीन भारताची आहे; पण त्याच्या दुप्पट म्हणजे चार टक्के पर्जन्यजल (पाऊस व हिमवृष्टी) उपलब्ध होते. देशपातळीवर वार्षिक पर्जन्यमान ११७० मिमी असून त्यापासून चारहजार अब्ज घनमीटर जल मिळते. अर्थात त्यात स्थलकाल विषमता, तफावत आहे. आश्यर्च म्हणजे देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापूंजीला सुद्धा पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. या उलट राजस्थानच्या मरूभूमीत कुशल जलसंवर्धनाने संपन्नता निर्माण केली आहे. कारण त्यांनी जलसंग्रहाच्या निष्णात पद्धतीचा अवलंब केला. या जलशास्त्र व संस्कृतीचा आम्हाला विसर पडलेला आहे. 

स्वातंत्र्योत्तर काळात जे महाकाय पाणीसाठे करणारे प्रकल्प उभारले त्यांनी शेती, उद्योग व शहरांसाठी हुकमी जलसाठे उपलब्ध करून दिले. सध्या देशातील एकूण पाणी वापरापैकी ९० टक्के पाणी सिंचनासाठी वारपले जाते. भूपृष्ट व भूगर्भातील जलस्त्रोतांचा यासाठी अतिवापर केला जातो. तांदूळ, गहू व उसासारख्या पिकांसाठी एवढे पाणी वापरणे म्हणजे सरळसरळ जलसंकटाला निमंत्रण आहे. सोबतच पाण्याचा अवास्तव वापर करणारे कागद, साखर, मद्यार्क, रसायने आदी कारखाने, बांधकामे, पंचतारांकित हॉटेल्स व एकंदरित चैनचंगळवादी जीवनशैलीसाठी होणारी पाण्याची नासाडी तात्काळ थांबविणे ही काळाचीच गरज आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे भारतातील प्रचलित जलसंकट हे अस्मानी नसून सुलतानी आहे. मात्र, पाणीच नव्हेतर, एकूण नैसर्गिक संसाधनांच्या वापराबाबत आपण कमालीचे निरक्षर आहोत. आवर्जून लक्षात घेण्याची बाब म्हणजे कमीत कमी पर्जन्यमान असलेल्या (१०० ते २०० मिमी) भूभागात देखील हेक्टरी १० ते २० लाख लिटर पर्जन्य जल संकलन/साठवण करता येते. याचा अनुभव आजही जैसलमर, बारमेर, जोधपूर जिल्ह्यात आजही येतोय. एवढेच काय ३०० मिमी इतके माफक पर्जन्यमान असलेल्या गावांनी देखील, केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे, तर हंगामी एक अगर दोन पिकांसाठी आपल्या स्थानिक लघूपाणलोटात पुरेसे पाणी साठवले, वापरले आहे. खरं तर पाण्याचं गणित अगदी साधेसोपे आहे. भारतात अगदी अवर्षणप्रवण भागात देखील किमान ३०० मिमी पाऊस पडतोच. म्हणजे हेक्टरी तीस लाख लिटर पाणी तेथे उपलब्ध होते. या कमी पर्जन्यवृष्टीच्या (अवर्षणप्रवण) प्रदेशात हेक्टरी ३ एवढी मानवी लोकसंख्या असते. अर्थात माणसी किमान दहा लाख लिटर पाणी प्रत्येक गावशिवारात उपलब्ध होते. एवढ्या पाण्यावर बाहेरून अजिबात पाणी न आणता पिण्याच्या व किमान भरणपोषण देणाऱ्या खाद्यान्न, भाजीपाला, फळे व दुधाच्या गरजा भागविता येणे शक्य आहे. हे तथ्यं नीट आकलन झाल्याखेरीज लोकाभिमुख जलधोरण, ‘हरघर जल’, ‘हरखेत को पानी’ सुतराम शक्य नाही.

भारताच्या शाश्वत विकासार्थ पाणी नियोजन व व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. यासाठी पाणी धोरणात आमूलाग्र बदलाची नितांत आवश्यकता आहे. पाणी नियोजनाची प्रचलित यांत्रिकी-अभियांत्रिकी पद्धती जलशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांचा अव्हेर करणारी आहे. त्याऐवजी सामाजिक-पर्यावरणीय दृष्टीचा अवलंब करून पाण्याचे मूलस्थानी निसर्गसुलभ पद्धतीने संकलन, साठवण केले जावे. लोकसहभागाने विकेंद्रित जलसाठे निर्माण करून संरक्षित सिंचन व जलसंवर्धन करणे ही जमीन-पाणी, वने-कुरणे, जैव-विविधता व्यवस्थापनाची गुरूकिल्ली आहे. जलसाक्षरता, सामाजिक न्याय व शाश्वत विकास या त्रिसूत्रीचा जाणीवपूर्वक अवलंब केल्याखेरीज केवळ मंत्रालयाचे नाव बदलण्याच्या युक्तीने जल जीवनशक्ती होणार नाही.

प्रा. एच. एम. देसरडा ः ९४२१८८१६९५
(लेखक महाराष्ट्र राज्य नियोजन 
मंडळाचे माजी सदस्य आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...