बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्र

मीमांसा आक्रमक, पण लढे मात्र अहिंसक, असं बाबासाहेबांच्या लढ्याचं सूत्र होतं. मनुष्य आणि मानवी प्रतिष्ठा हा बाबासाहेबांच्या विचाराचा गाभा होता. त्यांच्या महाडच्या लढ्यासह सर्वच सत्याग्रहात हेच शास्त्र अधोरेखित होतं.
agrowon editorial article
agrowon editorial article

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा यशस्वी झाला, त्याचं कारण चळवळ कुठून सुरू करावी, ती कशी रेटावी आणि कुठं थांबवावी याचं भान त्यांना होतं. भावनिक मुद्याचा आधार घेऊन मूलभूत प्रश्नासाठी लढण्याची मानसिकता बाबासाहेबांनी तयार केलेली होती, हे त्यांच्या लढ्याच्या व्यूहरचनेचं मुख्य सूत्र होतं. खरंतर ब्रिटीशांच्या क्रुरतेची असंख्य उदाहरणे देता येतील; पण ते विज्ञानाबरोबर चालणारे आणि उदारमतवादी होते, यात कुठलेच दुमत असायला नको. भारतात ब्रिटिशांनी १८६२मध्ये विधान परिषद स्थापन केली. हा मुद्दा यासाठी चर्चायचा की, ब्रिटीशांनी आपल्याकडे हळूहळू का होईना, लोकसत्ताक सभागृहाची मुहूर्तमेढ रोवली.

सार्वजनिक वास्तूबाबत कायदा ब्रिटिशांनी १९२५मध्ये प्रतिनिधी सभागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचाच भाग म्हणून तत्कालीन भारतातील पहिले विधान मंडळ बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल अस्तित्वात आले. काही लोकप्रतिनिधी आणि ब्रिटिश व्हॉइसरॉय यांच्याकडून नियुक्त्या, असे याचे स्वरूप होते. व्हाइसरॉयची इच्छा होती की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशप्रणीत मंत्रिमंडळात सामील व्हावे. बाबासाहेब आंबेडकर यांचा सांसदीय प्रणालींवर प्रचंड विश्वास होता. त्यांनी ठरवले की, मंत्री होण्यापेक्षा आपल्या भूमिकांना न्याय देऊ शकणाऱ्या व्यक्तीला आपण मंत्री करून, बिल मांडून त्यांचे कायद्यात रूपांतर करून आपल्याला अपेक्षित असे सामाजिक बदल घडवता येतील. म्हणून त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे लढवय्ये नेते भास्करराव जाधव यांना मंत्री करण्याचा प्रस्ताव व्हॉइसरॉयसमोर ठेवला. व्हॉइसरॉय म्हणाले, ‘ते लोकांमधून निवडून आले पाहिजेत’. ब्राह्मणेतरांचे प्रतिनिधी म्हणून भास्करराव जाधव यांना उभे करण्यात आले. १९वर्षांच्या यशवंतराव चव्हाण यांनी भास्करराव जाधव यांचा हिरिरीने प्रचार केला होता. डॉ. आंबेडकरांनी प्रयत्नांची शिकस्त करून भास्करराव निवडून येतील, अशी व्यूहरचना आखली. जे किमान चौथी पास किंवा जे सरकारी कर भरतात त्यांनाच या निवडणुकीत मतदार म्हणून मान्यता मिळाली होती. डॉ. आंबेडकर यांना व्हाइसरॉय यांनी विधान मंडळात सदस्य म्हणून आधीच नियुक्त केले होते. बाबासाहेबांनी भास्करराव हे निवडून येण्यासाठी लक्ष घातले होते ते यासाठी, की त्या काळात भास्कररावांनी लिहिलेल्या ‘रामायणावर नवा प्रकाश’ या त्यांच्या ग्रंथाविरोधात काही धर्ममार्तंड कोर्टात गेले होते. भास्कररावांचे प्रतिमाहनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यांना निवडून आणणे आवश्यक होते. अखेर भास्कारराव निवडून आले आणि बॉम्बे लेजिसलेटिव्ह कौन्सिल मंत्रिमंडळात मंत्री झाले. त्यांच्याकडे चार खाती देण्यात आली, ती अशी- समाज कल्याण, शिक्षण, कृषी आणि ऊर्जा. भास्करराव मंत्री झाल्याच्या सहा महिन्यांनंतर बाबासाहेबांनी एक बिल तयार केलं. तो मसुदा त्यांनी रावबहादूर सी. के. बोले यांना कायदे कौन्सिलात मांडायला लावला. त्या बिलाच्या बाजूने बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केलं आणि त्याचे रूपांतर कायद्यात झाले. ते बिल होते, ‘कोणत्याही नागरिकाला कोणत्याही सार्वजनिक वस्तूला, वास्तूला अथवा मनुष्याला स्पर्श करण्यापासून मज्जाव करता येणार नाही.’ भास्कररावांच्या सहीने हा अध्यादेश जारी करण्यात आला.

‘ चवदार’ सत्याग्रहाची पाळेमुळे बाबासाहेबांनी स्थापलेली ‘कुलाबा बहिष्कृत हितकारणी सभा’ ही सामाजिक संघटना जोमाने कामाला लागली होती. या संघटनेत ब्राह्मण, मराठा, चांभार, महार, आग्री, चांद्रसेनी कायस्थ प्रभू, पारशी, अँग्लो इंडियन आदी मंडळी होती. बाबासाहेबांनी लढ्याची आखणी केली. अस्पृश्यादी मंडळींना सार्वजनिक विहिरी किंवा तलावातील पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. हा मुद्दा भावनिक आणि मूलभूत होता. पाण्याच्या प्रश्‍नावरून सत्याग्रह करण्याचं ठरलं. बाबासाहेबांची कार्यपद्धती कोणत्याही सामाजिक धुरिणाला मार्गदर्शकच ठरणारी आहे. ते त्यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांबरोबर साधक-बाधक चर्चा करीत. एखाद्याने विरोधी मत व्यक्त केलं तरीही त्यांच्या मताचा आदर करीत. आपल्या चळवळीला आणि वाटचालीला एखादा पवित्रा अपायकारक आहे, असे त्यांना पटवून दिले, की त्या मताशी ते सहमत होत. बाबासाहेबांनी पाण्याच्या प्रश्‍नावरून सत्याग्रह कुठे करायचा, याची सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली. चर्चेत रत्नागिरी, गणपतीपुळे, अलिबाग इत्यादी ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवर सत्याग्रहांचे प्रस्ताव आले. बाबासाहेबांचे सांस्कृतिक संचित, आकलन स्वाभिमानी होतं. त्यांनी ठरवलं की, ज्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेकावरून अपमान केला गेला, त्या रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाडच्या चवदार तळ्यावर हा सत्याग्रह करायचा. त्यांचा हा मनोदय त्यांचे ब्राह्मण सहकारी आणि महाड नगर परिषदेचे अध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांना त्यांनी बोलूनही दाखवला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची अशी पाळंमुळं आहेत.

महाडची परिषद झाली आणि कृती करण्यासंबंधी त्यांनी त्यांचे सहकारी अनंतराव चित्रे यांना सूचना केली. दुजोरा देण्यास चित्रे उभे राहिले. त्यांनी परिषदेस उद्देशून सुचवले, ‘‘आजची एवढी मोठी महत्त्वाची परिषद भरली आहे, तिने काहीतरी महत्त्वाचे कार्य केल्याखेरीज अधिवेशन संपू नये, असे मला वाटते. या महाड शहरात अस्पृश्य लोकांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय आहे. ती दूर व्हावी म्हणून येथील म्युनिसिपालिटीने येथील तळी सर्व जातीच्या लोकांना खुली केलीत, असे ठरावाने कधीच जाहीर केलेले आहे, (नगर परिषदेचे अध्यक्ष होते सुरबानाना) परंतु तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात अस्पृश्‍यांकडून अजूनही सुरू केलेला नाही. तो प्रघात जर या परिषदेने पाडून दिला, तर तिने महत्त्वाची कामगिरी बजावली, असे म्हणता येईल. तरी आपण सर्वजण अध्यक्षांसह (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) महाड येथील चवदार तळ्यात प्रवेश करून पाणी घेऊ या.’’ हा सत्याग्रह बाबासाहेबांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची चर्चा संपूर्ण जगभर झाली. बाबासाहेबांचे नेतृत्व तत्कालीन अखंड भारतभर मान्यता पावले. महाड सत्याग्रहाने सत्याग्रहाची व्याख्याच बदलली. या सत्याग्रहात ‘हरहर महादेव’, ‘महाड सत्याग्रह की जय’, ‘जय शिवराय’ आणि ‘जय जिजामाता’ या घोषणा बाबासाहेबांच्या आदेशाने दिलेल्या होत्या. बाबासाहेबांचा संघर्ष नीटपणे समजून घेतल्यास असे लक्षात येते की, मनुष्य आणि मानवी प्रतिष्ठा हा बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा होता. म्हणूनच ते माणसांच्या जीवाला जीवापाड जपत. तेच त्यांच्या सत्याग्रहाचे शास्र  होते. 

डॉ. ऋषिकेश कांबळे (लेखक ज्येष्ठ समीक्षक तथा औरंगाबादच्या स. भु. कला-वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com