स्वच्छ, सुरक्षित, सुखी अन् आनंदी भूतान

भूतान हा निसर्ग सौंदर्याने नटलेला, नितांत सुंदर देश. सर्व परिसर हिरवागार. झाडांनी व वनांनी व्यापलेला. देशभर कमालीची स्वच्छता, शांतता आणि सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे. थोडक्‍यात काय तर हा देश म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

‘भू तान'' हिमालयाच्या कुशीत वसलेला एक छोटासा,   निसर्ग सौंदर्याने नटलेला, नितांत सुंदर देश. संपूर्ण देश प्रदूषणमुक्त. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही. हवा, पाणी पूर्णपणे प्रदूषणविरहित. ना जमिनीचे प्रदूषण, ना ध्वनी प्रदूषण. अगदी आल्हाददायक, शांत वातावरण. ना कोठे कचरा, ना घाण. सतत धूर ओकणारे कारखाने नाहीत. कर्कशपणे हॉर्न वाजविणारी वाहने नाहीत. सांडपाणी वाहून नेणारे ओढे, नाले नाहीत. ना प्रदूषित पाणी घेऊन वाहणाऱ्या नद्या. सर्व कांही सुंदर आणि स्वच्छ. सर्व परिसर हिरवागार. झाडांनी व वनांनी व्यापलेला. शून्य प्रदूषण असणारा देश. देशभर कमालीची स्वच्छता, शांतता आणि सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे. रस्त्यावर पचापच थुंकणारी, बेदरकारपणे वाहने चालविणारी माणसे या देशात नाहीत. नियमांचे काटेकोरपणे पालन करणारी जनता या देशात आहे. दंगेधोपे, मारामाऱ्या, चोऱ्या, दरोडे या देशात होत नाहीत. कोणावरही अत्याचार होत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या देशात मुली व महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत. येथील जनता सुखी, आनंदी व समाधानी आहे. थोडक्‍यात काय तर हा देश म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. 

भूतान देश पूर्व हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला असून, त्याच्या पश्‍चिमेस सिक्किम, पूर्वेस अरुणाचल प्रदेश, दक्षिणेस पश्‍चिम बंगाल व आसाम ही भारतातील राज्ये आहेत, तर उत्तरेस तिबेट व चीनची सरहद्द आहे. या देशाचे क्षेत्रफळ ३८ हजार चौरस किलोमीटर असून, ७० टक्के जमिनीवर वनक्षेत्र आहे. या देशातून सहा हजार वनस्पती, ६७० पक्षांच्या आणि १८० सस्तन प्राण्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. जगातील कोणत्याही देशातील जैवविविधता घनतेपेक्षा भूतानमधील जैवविविधता घनता सर्वात जास्त आहे. या देशाचे क्षेत्रफळ कमी आहे, पण जैवविविधता विपुल आहे. कारण येथील जैवभौगोलिक नैसर्गिक स्थिती वैशिष्ट्यपूर्ण असून, जैवविविधता संरक्षण-संवर्धनाबाबतचे सर्व नियम-कायदे येथे अगदी काटेकोरपणे पाळले जातात. भूतानचा बहुतांश भाग उंच पर्वतरांगा व प्रचंड मोठ्या दऱ्या-खोऱ्यांनी बनलेला डोंगराळ प्रदेश आहे. या देशात सात प्रमुख नद्या असून, त्या पूर्णपणे प्रदूषणमुक्त आहेत. त्या सर्व उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. जून ते सप्टेंबर महिन्यात येथे पाऊस पडतो. ऑक्‍टोबर महिना आल्हाददायक असतो. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत गोठवणारी थंडी येथे असते. या कालावधीत सर्व परिसर बर्फमय असतो. एप्रिल, मे या महिन्यात मिश्र स्वरूपाचे वातावरण असते. येथील जंगल-वनांचे प्रामुख्याने तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. सबट्रॉपिकल भागातील १५० ते २००० मीटर उंचीवरील भूप्रदेशात वाढणारी वने, शीत प्रदेशातील २००० ते ४००० मीटर उंच भागातील वाढणारी वने व बर्फमय असणाऱ्या ऍलपाईन भागात वाढणारी वने. 

भूतानमध्ये लहान-मोठी २० शहरे आहेत. पण सर्वात मोठी मुख्य शहरे आहेत ती म्हणजे थींपू, पारो आणि पुनखा. थींपू ही भूतानची राजधानी. पारो येथे एकमेव महत्त्वाचा विमानतळ आहे. तोही भारताने पंडित नेहरू पंतप्रधान असताना तयार करून दिला आहे. या देशाची लोकसंख्या आहे, अवघी आठ लाख. स्त्री-पुरुष प्रमाण जवळपास समान आहे. या देशाच्या सीमारेषेवर असणारे सर्व सैन्य भारताचे आहे. येथील सर्व प्रमुख मार्ग व रस्ते आपल्या देशाने तयार केले आहेत, पण रस्त्यावर कोठेही खाचखळगे व खड्डे नाहीत हे विशेष! डोंगराळ प्रदेश असल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण येथे जास्त आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी फक्त रस्ते खराब आहेत, पण तेही तातडीने दुरुस्त केले जातात. बाकी सर्व रस्ते गुळगुळीत व चकचकीत आहेत. येथील वाहन संख्या मर्यादित आहे. मोटर सायकल, स्कूटर, रिक्षा ही वाहनेच नाहीत. काही मोटरसायकली फक्त पोलिसांकडेच आहेत. शहरांत व गावांत कार, टॅक्‍सी व बसेसची सोय आहे. येथील नागरिक पायी चालण्यास प्राधान्य देतात. यामुळे आपल्यासारखा येथे वाहनांचा गोंगाट व गर्दी अजिबात दिसत नाही. वाहनचालक अत्यंत संयमाने, सावकाश वाहने चालवितात. ‘नो हरि नो वरी’ हा या देशाचा मूलमंत्र आहे. पादचारीही रस्ता ओलांडताना फक्त झेब्रा क्रॉसींगचा वापर करतात. पादचारी रस्त्यावरून चालत नाहीत, फक्त फूटपाथचाच वापर करतात. फूटपाथवर, रस्त्यांवर कोठेही दुकानदारांचे, विक्रेत्यांचे अतिक्रमण दिसत नाही. रस्ता व फूटपाथवर, तसेच इतरत्र कोठेही कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत. वाहने फक्त पार्किंग झोनमध्येच सुव्यवस्थितपणे पार्किंग केली जातात. वाहतुकीचे व इतर सर्व नियम येथील सर्व नागरिक अगदी काटेकोरपणे पाळतात. यामुळे येथे अपघातांचे तसेच वादावादींचे प्रमाण नगण्य आहे. 

टुरिझम हा येथील मुख्य व्यवसाय आहे. येथे उद्योगधंदे फारसे नाहीत. कारखानदारी नाही. आवश्‍यक सर्व साहित्य व माल प्रामुख्याने येथे भारतातून येतो. येथील लोक टूरिस्टला, प्रवाशांना दैवत मानतात. अत्यंत प्रेमळ व आपुलकीची वागणूक देतात. आपण जगभरात कोठेही गेलात, तर तेथील प्रत्येक हॉटेलात, लॉजवर पाट्या दिसतात. चोरांपासून सावध रहा. तुमचे किंमती सामान आपल्या जबाबदारीवर ठेवा. साहित्य चोरी झाल्यास हॉटेल व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही, वगैरे. पण भूतानमधल्या कोणत्याही हॉटेलात अशा प्रकारच्या पाट्या दिसत नाहीत. कारण प्रवाशांच्या साहित्याच्या चोऱ्या झाल्या तर, ते परत आपल्या देशात येणार नाहीत आणि त्यांच्या देशातील इतरांनाही भूतानला जाऊ नका म्हणून सांगतील, यामुळे आपल्याच देशाचे नुकसान होईल. तेंव्हा ‘नो चोऱ्या'' असा संस्कार प्रत्येक भूतानवासीयांवर असल्याने या देशात चोऱ्या होतच नाहीत. येथील दुकानात व हॉटेलांत सर्व कामे मुली व स्त्रियांच करताना दिसतात. या देशात शाकाहार व मांसाहार दोन्हीही चालतो. पण संपूर्ण देशात एकही कत्तलखाना नाही. गुरे, जनावरे, शेळ्या, मेंढ्या, मासे, कोंबड्या येथे कापल्या जात नाहीत. मांस, मटण, मासे यांची कोठेही रस्त्यावर विक्री केली जात नाही. हे सर्व व्यवस्थित कापून, स्वच्छ करून, पॅकिंग करून भारतातून भूतानला पाठविले जाते.  

डॉ. मधुकर बाचूळकर: ९७३०३९९६६८ (लेखक वनस्पती तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com