जैवइंधन निर्मिती-वापरासाठी  हवेत एकत्रित प्रयत्न 

देशाला आवश्यक असलेल्या एकूण इंधनाच्या जवळपास ७० ते ८० टक्के इंधन आयात करून लाखो कोटी रुपयांचे परकीय चलन खर्च करत असताना आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करण्यासाठी मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाहीत.
agrowon editorial article
agrowon editorial article

देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी इंधन आणि ऊर्जा या दोन मूलभूत स्रोतांचा वापर वाढविणे अनिवार्य आहे. ऊर्जेमुळे उत्पादन वाढते तर इंधनामुळे प्रगतीचा वेग वाढतो. आज शेतकऱ्‍यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पिकांचे उत्पादन घेऊन त्यांचा अन्न म्हणून वापर करणे हे पारंपरिक झाले आहे. देशातील उपलब्ध जमीन, पाणी आणि मनुष्यबळ यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर याच जमिनीतून आणि उपलब्ध साधनसामग्रीतून माणसांना आवश्यक असलेल्या अन्नधान्याबरोबरच आवश्यक असलेली ऊर्जा आणि इंधनाचे उत्पादन शेतीमधून सहज घेता येईल. सौरऊर्जा तसेच पवनऊर्जा यांच्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधामध्ये असलेल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. या सूर्यप्रकाशाचा वापर करून सौरऊर्जा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. तसेच याच सूर्यप्रकाशाचा वापर करून शेतीमधून इंधनाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणेसुद्धा सहज शक्य आहे. शेतीमधून सौरऊर्जा आणि सौरइंधनाचे उत्पादन घेतले तर शेतकऱ्‍यांच्या उत्पादनात वाढ होऊन दुप्पट उत्पन्न करण्याचे स्वप्न साकार करता येईल. 

जैवइंधन म्हणजे वनस्पती तसेच इतर जीवजिवाणूंची मदत घेऊन शेतामध्ये इंधन तयार करणे. आज आपण फक्त उसापासून इथेनॉल निर्मितीवर मोठ्या प्रमाणात चर्चा करत असलो तरीही याच शेतीमधून अनेक प्रकारच्या वनस्पती, शेवाळ, जिवाणू यांचा वापर करुन इंधनाची निर्मिती करता येते. या इंधननिर्मितीचे चार प्रकार आहेत. ऊस, मका, शुगरबीट, गहू, तांदूळ तसेच ज्या पिकामध्ये स्टार्च- साखरेचे प्रमाण असते त्यापासून इंधन तयार होते. त्याला पहिल्या पिढीतील जैवइंधन म्हणजेच ‘फर्स्ट जनरेशन बायोफ्युएल’ असे संबोधतात. आज आपण त्याला इथेनॉल किंवा बायोडिझेल असे संबोधतो. अर्थात उसापासून किंवा मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती यामध्ये बऱ्यापैकी प्रगती केली आहे. दुसऱ्‍या प्रकारचे जैवइंधन म्हणजे पिकाचे अवशेष जे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि जे अनेकदा जाळून टाकले जाते त्यापासून जैवइंधन तयार करणे. उसाचे पाचट, गव्हाचे काड- भुस्सा, कपाशीच्या पऱ्हाट्या, भाताचा तूस तसेच इतर पिकांचे वाया जाणारे अवशेष यांचा वापर करून जैवइंधन तयार करणे. पिकाच्या वाया जाणाऱ्‍या अवशेषांमध्ये मोठ्या प्रमाणात सेल्युलोज आणि लिग्नाईट असते. यामध्येही साखर असते. यामध्ये असलेल्या साखरेचे विघटन करून त्यापासून तयार होणाऱ्‍या इंधनाला दुसऱ्‍या प्रकारचे इंधन म्हणजेच ‘सेकंड जनरेशन बायोफ्युएल (२ जी)’ असे संबोधतो.

तिसऱ्‍या प्रकारचे जैवइंधन म्हणजे निसर्गामध्ये अनेक प्रकारचे शेवाळ असतात. काही शेवाळ झटपट वाढतात तर काही शेवाळ संथ गतीने वाढतात. या शेवाळामध्ये असलेल्या स्निग्धयुक्त तसेच इतर पदार्थांचा वापर करून त्यापासून तयार होणाऱ्‍या इंधनाला ‘थर्ड जनरेशन बायोफ्युएल (३ जी)’ असे संबोधतात. चौथ्या प्रकारचे जैवइंधन म्हणजे निसर्गातील विविध अखाद्य वनस्पती किंवा शेवाळामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त सौरऊर्जा शोषून घेऊन त्यामध्ये कर्ब, स्निग्धयुक्त पदार्थ जैवइंधन करण्यासाठी होतो. या इंधनाला ‘फोर्थ जनरेशन बायोफ्युएल’ म्हणजेच ‘४ जी बायोफ्युएल’ असे संबोधतात. यावरून लक्षात येते की निसर्गाने इंधन निर्मितीसाठी अनेक स्रोत उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा वापर वाढविण्यासाठी योग्य ते संशोधन, नियोजन, आर्थिक उपलब्धता आणि एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. 

देशाला आवश्यक असलेल्या एकूण इंधनाच्या जवळपास ७० ते ८० टक्के इंधन आयात करून लाखो कोटी रुपयांचे परकीय चलन एकीकडे खर्च करत असताना आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करण्यासाठी मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाहीत. ‘तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी’ या उक्तीप्रमाणे आपली स्थिती आहे. भरपूर सूर्यप्रकाश, मोठ्या प्रमाणात असलेल्या पडीक जमिनी किंवा खराब झालेल्या जमिनी, शेती उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे शेतीमालाची नासाडी, शेतीमधून निघालेल्या आणि वाया जाणाऱ्या टाकाऊ परंतु उपयुक्त अशा पिकांच्या अवशेषाला पेटवून देणे अशा या परिस्थितीमध्ये दूरदृष्टिकोनातून जास्त कालावधीच्या योजना हाती घेतल्या नाहीत तर आपले इंधनासाठीचे परावलंबित्व कधीच कमी होणार नाही. ज्या इंधनावर देशाची प्रगती अवलंबून आहे त्याच इंधनावर आपण परावलंबी असू तर कधीही या प्रगतीच्या वेगाला ब्रेक लागू शकतो. यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

शेतीमधून पिकविल्या जाणाऱ्‍या पारंपरिक शेतीमालातून शेतकऱ्‍यांना जास्त आर्थिक फायदा होत नाही. शेती ही फक्त अन्नधान्य तयार करण्यासाठी न वापरता जैवइंधन तयार करण्‍यासाठी काही प्रमाणात वापरली तर शेतीमधून वाढलेले उत्पादन वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच शेतीमालाला चांगला दर मिळेल. जास्तीच्या क्षेत्रामधून जैवइंधन केले तर शेतकऱ्‍यास त्यापासून जास्त पैसा मिळू शकतो. म्हणजेच आज शेतकऱ्यांचे कमी उत्पन्न, तोट्याची शेती, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या यासारखे प्रश्‍न कमी होतील. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जैवइंधन तयार केले तर त्यापासून ग्रामीण तसेच शहरी मागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. एक लाख लिटर प्रतिदिवस या उत्पादन क्षमतेच्या जैवइंधन प्रकल्पाद्वारे कमीत कमी १२०० लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार मिळू शकतो. म्हणजेच देशामध्ये लाखो टन जैवइंधन तयार होत असताना लाखो बेरोजगारांना रोजगार मिळेल. 

आज देशामध्ये मोटारीचा वापर वाढत असताना त्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यावरणात घातक वायू सोडले जातात. तसेच लाखो टन पिकांचे अवशेष पेटवून दिल्यामुळे त्यामुळेही वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे जगामध्ये भारत हा जास्त प्रदूषित देश म्हणून गणला जातो. अशावेळी जैवइंधनाचा वापर वाढविला तर देशातील प्रदूषण कमी करता येईल. म्हणजेच देशापुढे असलेल्या इंधनाचे परावलंबित्व, दूषित पर्यावरण, परकीय चलनामध्ये घट, बेरोजगारी, कमी उत्पन्न देणारी न परवडणारी शेती, कर्जबाजारी शेतकरी तसेच वाया जाणारा शेतीमाल किंवा शेतीमालाच्या पडलेल्या किमती तसेच उत्पादन वाढल्यामुळे शेतीमालाला मिळत नसलेली किंमत या सर्व विषयांचा विचार केला तर जैवइंधन निर्मिती आणि त्याचा वापर यावर फार मोठ्या प्रमाणात काम करायला संधी आहे.

अर्थात यासाठी सर्व स्तरांवर याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. अल्प कालावधीच्या योजनांऐवजी दीर्घकाळाच्या योजना तयार करण्याची गरज आहे. यासाठी आडकाठी न करता जैवइंधनासाठीचा वापरासाठी अनुकूल शासकीय धोरण करावे लागेल. जैवइंधन तयार करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांबरोबर लहान लहान प्रकल्पांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यासाठी संशोधनावर जास्त भर द्यावा लागेल. देशपातळीवर या विषयातील विचारवंतांची थिंकटँक तयार करावी लागेल. त्याच्या माध्यमातून या विषयामध्ये काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना आर्थिक इंधन देऊन पुढील एक-दोन दशकांमध्ये इंधनासाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी सांघिक प्रयत्न केला तर इंधनशेतीतून दुसरी हरितक्रांती आणि देशाच्या प्रगतीचा वेग वाढविणे सहज शक्य होईल. 

-डॉ. भास्कर गायकवाड  ९८२२५१९२६० 

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत,)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com