भूतानच्या आनंदाचे रहस्य काय?

जगातील सुमारे २२२ देशांच्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत आज भूतान प्रथम क्रमांकावर आहे. विकसित, श्रीमंत देश, आनंदी व सुखी असू शकतात, पण भूतान हा गरीब देश असूनही तो जगात सर्वात जास्त सुखी व आनंदी देश आहे. हे विशेष! या देशाच्या आनंदाचे नेमके रहस्य काय ते जाणून घेऊया.
agrowon editorial article
agrowon editorial article

भारतीयांना भूतान या देशात येण्यासाठी व्हिसाची गरज नाही, पण पासपोर्टची आवश्‍यकता आहे. प्रवेश करताना सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जाते. इतकेच नव्हे तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करतानाही कागदपत्रांची, साहित्याची फेरतपासणी काटेकोरपणे केली जाते. देशात सर्वत्र सर्वजण नियमांचे पालन करीत असल्याने या देशात कोठेही मोर्चे, दंगली, अतिरेकी हल्ले होत नाहीत. येथील देशाचा सर्व कारभार लोकशाही पद्धतीने चालत असला तरी त्यावर राजेशाहीचा पगडा व हुकूमत आहे. पण पारंपरिक राजघराण्याची हुकूमशाही नाही. सर्व ठिकाणी राजे पदसिद्ध अध्यक्ष असतात. येथील जनतेला राजघराण्याबाबत फार मोठी आपुलकी व प्रेम आहे, आदर- सन्मान आहे. सर्वत्र राजांची छायाचित्रे दिसून येतात. भूतानवासीयांना भारताबाबत, भारतीयांबद्दल विशेष आस्था व प्रेम आहे. कारण आपण भगवान बुद्धांच्या देशातले आहे म्हणून. भूतान प्रामुख्याने बौद्धधर्मियांचा देश आहे. येथील बहुतांश जनता मंगोलियन वंशाची आहे. येथील सर्वजण हिंदी भाषा बोलू शकतात, इंग्रजीही येथे बोलली जाते. या देशात भारतीय चलन वापरून व्यवहार करता येतात. भूतानला भारताकडून मदत व सहकार्य केले जाते. येथील सर्व घरांची, इमारतींची बांधणी एकसारखीच, पण वैशिष्ट्यपूर्ण पॅगोडाप्रमाणे आहे. ही येथील मुख्य खासियत आहे. येथे अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत. अनेक बौद्ध मंदिरे (पॅगोडा) आहेत. 

संपूर्ण भूतान सेंद्रिय या देशातील दुसरा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती आणि मुख्य पीक म्हणजे भात. भाताचे पारंपरिक स्थानिक वाणंच शेतकरी प्रामुख्याने वापरतात. येथे सफरचंद, मोसंबी या फळवर्गीय पिकांचीही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पालेभाज्या, फळभाज्याही येथे शेतात पिकविल्या जातात. भूतानच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. शेतीसाठी रासायनिक खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा, तणनाशकांचा येथे अजिबात वापर केला जात नाही. या देशात रासायनिक खते व कीटकनाशके तयार करणारा एकही कारखाना नाही किंवा याची खरेदी-विक्री करणारी दुकानेही नाहीत. संपूर्ण देश सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. येथे आहारात रानभाज्यांचाही वापर करतात. बाजारातही अनेक राजभाज्या विक्रीला येतात. जंगली नेचांचे कोंब, ऑर्किडची फुले व कोवळी फळे रानभाज्या म्हणून बाजारात विक्रीसाठी आल्याचे मी येथे प्रथमच पाहिले. सेंद्रिय शेतीमुळे येथील भाज्यांची व फळांची चव कांही वेगळीच असते. भूतानमध्ये आरोग्य रक्षणासाठी प्रामुख्याने पारंपरिक देशी औषधी, वनौषधींचा व आयुर्वेदाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

गरीब देश, पण सुखी देश भूतान आपल्यापेक्षाही खूप गरीब देश आहे. तरीही येथील प्रत्येक माणूस आनंदी आहे, प्रसन्न आहे, सुखी आहे. मानव विकास निर्देशांक आणि ‘हॅपी इंडेक्‍स’ अशा दोन प्रकारे जगातील सुखी-आनंदी देशांची सूची तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेल्या जगातील सुमारे २२२ देशांच्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत आज भूतान प्रथम क्रमांकावर आहे. विकसित, श्रीमंत देश, आनंदी व सुखी असू शकतात, पण भूतान हा गरीब देश असूनही तो जगात सर्वात जास्त सुखी व आनंदी देश आहे. हे विशेष! इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा नाही. हा देश सुखी, आनंदी का आहे? हे या देशाला कसं काय जमलं? उत्तर सोपं आहे. माणसाला त्याच्या जीवनात सर्वात जास्त चिंता असतात त्या आपल्या मुलाचं शिक्षण कसं होणार? आपल्या म्हातारपणी आपल्या आरोग्याबाबतचा खर्च कोण करणार? आणि आपण कमावलेलं सगळं चोरीला गेलं, तर आपलं कसं होणार? हे तीन प्रश्‍न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. गरजा व अपेक्षा कमी असतील, समाधानी वृत्ती असेल तर आणि मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात. हे भूतानच्या प्रशासनानं जाणलं आहे. म्हणूनच भूतानमध्ये सर्व प्रकारचे, केजी ते पीजी, संपूर्ण शिक्षण मोफत आहे. भूतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्य सेवा सर्वांसाठी मोफत आहे. येथे कोणत्याही मालमत्तेची चोरी होत नाही. आरोग्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरण आहे. सर्वच बाबतीत सुरक्षितता आहे. यामुळेच संपूर्ण जनता चिंतामुक्त आहे. म्हणूनच भूतान सुखी व आनंदी देश आहे. या देशात विषमतावाद नाही. निसर्ग संवर्धन व पुनर्वापरावर भर दिला जातो. ‘वापरा आणि फेका’ ही वृत्ती येथील समाजात नाही, म्हणूनच हा देश स्वच्छ व शांत आहे. भारतानं भूतानकडून हे सर्व शिकायला हवं. यासाठी आपल्या देशातील सर्व नागरिकांनी आणि राज्यकर्त्यांनी आपली मानसिकता आणि विचार बदलायला हवेत. आपली लोकसंख्या आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या पाहिजेत. असं सर्व झालं तर आपला देशही सुखी-आनंदी राष्ट्र बनू शकेल. 

...अन् कर्कश हार्न वाजू लागले आयुर्वेद व औषधी वनस्पतींचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने आम्हाला नुकतीच माहे ऑक्‍टोबर २०१९ मध्ये भूतानला भेट देण्याची संधी मिळाली. स्वच्छ पर्यावरणात आणि आनंदी भूतानवासीयांबरोबर बोलण्याचा, चर्चा करण्याचा सुवर्णयोग आम्हास प्राप्त झाला. येथील सर्व अनुभव अविस्मरणीय होते, हे मात्र नक्की! भूतान येथे सहा दिवस राहिल्यानंतर सातव्या दिवशी आम्ही भारताच्या सीमेवर असणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या जयगाव शहरात पोचलो. आमच्या सहा दिवसांच्या भूतान मुक्कामात आम्ही एकदाही वाहनांचा हॉर्न ऐकला नव्हता. पण भारताच्या हद्दीत आल्या आल्या वाहनांचे कर्कश हॉर्न वाजू लागले. ओव्हरटेक करीत वाहनांच्या जीवघेण्या स्पर्धा सुरू झाल्या. खड्ड्यांनी व धुळीने माखलेले रस्ते आणि रस्त्यांच्या बाजूस पसरलेले कचऱ्याचे ढीग, हे सर्व पाहून मन अगदी सुन्न होऊन गेलं. 

डॉ. मधुकर बाचूळकर : ९७३०३९९६६८ (लेखक वनस्पती तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com