इथेनॉलनिर्मितीचा ‘ब्राझील पॅटर्न’

ब्राझीलमध्ये १९७५ मध्ये ‘नॅशनल अल्कोहोल प्रोग्रॅम’ राबविला आणि फक्त सहाच वर्षांत ९० टक्के कार या इथेनॉल किंवा गॅसोलिनवर चालणाऱ्‍या विकल्या गेल्या. ब्राझीलमध्ये इथेनॉलचा वापर इंधन म्हणून करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले आणि त्याला यशही मिळाले.
agrowon editorial article
agrowon editorial article

ऊस, शुगरबीट, मका, गोड ज्वारी यांच्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. अर्थात, ज्या वनस्पतींमध्ये स्टार्च आहे त्याचे रूपांतर अगोदर साखरेमध्ये करून नंतरच त्यापासून इथेनॉल तयार केला जातो. भारतामध्ये उसाच्या मळी (मोलॅसेस) पासून इथेनॉल तयार करण्याची सुरुवात झाली. आता थेट उसाच्या रसापासूनही इथेनॉल तयार करायला शासनाची परवानगी मिळाल्यामुळे त्याचीही सुरुवात झालेली आहे. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण, शहरीकरण झाल्यामुळे तसेच मानवाची जीवनशैली बदलल्यामुळे इंधनाची गरज वाढली. नैसर्गिक साठा मर्यादित आणि मागणी जास्त यामुळे एकतर इंधनाची कमतरता वाढली, किमती वाढल्या! म्हणूनच भविष्यात हा मर्यादित साठा संपल्यानंतर काय, हा विचार केला तर या नैसर्गिक इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉलचा विचार पुढे आला. इथेनॉलचा पहिला प्रयोग १८९७ मध्ये झाला. ज्या वेळी ‘इंटर्नल कम्बशन इंजिन’चा वापर सुरू झाला त्या वेळी इथेनॉल हे एक इंधन म्हणून त्याचा वापर करण्यासाठी प्रयोग केला.

ब्राझीलमध्ये १९२० पासून इथेनॉलचा वापर केला जातो. इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये विविध प्रमाणात मिसळून करता येतो तसेच काही गाड्या इथेनॉलवरही चालतात. इथेनॉलच्या वापरामुळे गाडीची कार्यक्षमता वाढते, पर्यावरणातील अनेक घातक वायूंचे प्रमाण कमी होते तसेच वनस्पतीपासून तयार करता येत असल्यामुळे त्याच्या किमती नियंत्रित किंवा कमी ठेवणे शक्य आहे. सध्या जागतिक पातळीवर विशेषतः भारतामध्ये इथेनॉलनिर्मिती आणि त्याचा इंधन म्हणून वापर यावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. भारतामध्ये आता आपण इथेनॉलवर चालणाऱ्‍या गाड्या तयार करण्याचा प्रयत्न करतो; परंतु १९४८ मध्ये फोर्ड कंपनीने अल्कोहोलवर चालणाऱ्‍या कारमध्ये पहिल्यांदा इथेनॉलचा वापर केला होता.

ब्राझीलमध्ये उसाचे मोठे क्षेत्र असून, गरजेनुसार ते साखर तयार करतात आणि राहिलेल्या सर्व उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते.ब्राझीलमध्ये सध्या दोन कोटी ७० लाख कार असून, त्यापैकी ७३ टक्के कार या इथेनॉल किंवा गॅसोलिनवर चालतात. १९७५ मध्ये ब्राझीलमध्ये ‘नॅशनल अल्कोहोल प्रोग्रॅम’ राबविला आणि फक्त सहाच वर्षांत ९० टक्के कार या इथेनॉल किंवा गॅसोलिनवर चालणाऱ्‍या विकल्या गेल्या. एवढ्या पद्धतशीरपणे ब्राझीलमध्ये इथेनॉलचा वापर इंधन म्हणून करण्यासाठी प्रयत्न झाले आणि त्याला यशही मिळाले. पेट्रोल आणि इथेनॉलच्या किमती कमी-जास्त झाल्यावर ग्राहकांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून २००० मध्ये ब्राझीलमध्ये ‘फ्लेक्सी फ्युएल व्हेईकल्स’ (एफएफव्हीएस) म्हणजेच पेट्रोल तसेच इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती केली, जेणेकरून इंधनाच्या किमतीनुसार ग्राहक पाहिजे ते इंधन घेऊ शकतो. या गाड्या २००४ मध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्तावित केल्या आणि अवघ्या पाच वर्षांत ९० टक्के नवीन गाड्या ‘एफएफव्हीएस’ प्रकारच्या विकल्या गेल्या. अर्थात हे सर्व बदल करण्यासाठी ब्राझीलमध्ये ‘प्रोअलकुल’ ही योजना पद्धतशीरपणे राबविण्यात आली. देशातल्या तसेच आंतरराष्ट्रीय ऑटो कंपन्या, ऊस उत्पादक, इथेनॉल तयार करणाऱ्‍या कंपन्या तसेच ब्राझीलमधील इंधन घेणारे सर्व ग्राहक यांना विविध प्रकारचे अनुदान, योग्य सेवा सुविधा दिल्यामुळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने ब्राझीलमध्ये इथेनॉल क्रांती झाली.

ब्राझीलमध्ये १९७७ मध्ये पेट्रोलमध्ये फक्त ४.५ टक्के इथेनॉल मिसळले जात होते. त्याचे प्रमाण वाढून २०१८ पर्यंत २७.५ टक्क्यांपर्यंत गेले. ब्राझीलमध्ये साखर-इथेनॉल तयार करणारे कारखाने कोणती वस्तू तयार करायची याचा निर्णय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या वस्तूंच्या किमती तसेच देशांतर्गत असलेली गरज यांचा विचार करून घेतात. ब्राझीलमध्ये रोजगाराचा प्रश्‍न आहे. याचा विचार करून असे निदर्शनास आले की जर पारंपरिक इंधन वापरले तर कमी रोजगार मिळतो. इथेनॉलनिर्मिती आणि वापरामुळे पारंपरिक इंधनापेक्षा ३० पट जास्त रोजगार मिळतो. ब्राझीलमध्ये ४० लाख लोकांना इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यात नोकरी मिळाली. तसेच हे कारखाने ६०० शाळा, २०० डे-केअर सेंटर तसेच ३०० हॉस्पिटल चालवून सामाजिक बांधिलकीही जपतात. म्हणजेच इथेनॉलचा वापर सुरू झाल्यापासून ब्राझीलमध्ये इंधन सुरक्षा, देशाच्या आर्थिक फायद्यामध्ये वाढ तसेच सामाजिक सेवा सुविधा मिळवून देण्यामध्ये मोठा फायदा झाला.

ब्राझील ८० टक्के इंधन आयात करत होता. आता त्या देशामध्ये त्यांच्या एकूण इंधनांपैकी ६० टक्के इंधन इथेनॉलद्वारे मिळते. एवढी मोठी क्रांती १९७० ते २००९ दरम्यान, म्हणजे फक्त ४० वर्षांमध्ये झाली. ग्राहकांनी इथेनॉलचा वापर वाढवावा यासाठी ब्राझीलमध्ये पेट्रोलच्या प्रमाणात फक्त ६४.५ टक्के इतक्या इथेनॉलच्या किमती ठेवल्या. त्यासाठी पेट्रोलवर वेळोवेळी विविध कर लावून, तसेच इथेनॉलला सवलत देऊन इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन दिले. ब्राझीलमध्ये १९७५ मध्ये ५८९ लाख गॅलन इथेनॉल तयार होत असताना १९७९ मध्ये (चार वर्षांत) इथेनॉलचे उत्पादन ७३९७ लाख गॅलन म्हणजे १३ पट उत्पादन वाढले. अनेकदा अशी चर्चा होते, की परिवर्तन करण्यासाठी फार मोठा खर्च येतो. ब्राझीलमध्येही इथेनॉल परिवर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. १९७५ ते २००० या २५ वर्षांमध्ये ३० बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च केले. परंतु हीच रक्कम फक्त दोनच वर्षांमध्ये वसूल झाली. कारण ८० टक्के इंधनाची आयात करणाऱ्‍या देशामध्ये एकूण इंधनाच्या ६० टक्के इंधन (इथेनॉल) देशांतर्गत तयार होऊ लागले.

ब्राझीलमध्ये एकूण ७० लाख हेक्टरवर उसाचे उत्पादन घेतले जाते. तेथे एकूण ७२ हजार शेतकरी आणि ऊस उत्पादक काम करतात. या उसाच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी ३९० कारखाने, २४० डिस्टिलरी आणि त्याचे काम करणारे एकूण ३५ लाख कर्मचारी अशा पद्धतीची एक पूर्णपणे चेनच उभी राहिली. याच्या माध्यमातून ५६९० लाख टन उसाचे गाळप करून ३०० लाख टन साखर, १०६० लाख टन बगॅस तसेच २३.४ बिलियन लिटर इथेनॉलची निर्मिती केली जाते. याचमुळे ब्राझीलमध्ये उसावर आधारित देशाची अर्थव्यवस्था भक्कम आहे. ब्राझीलने इथेनॉल इंधन म्हणून वापरासाठी वेळोवेळी घेतलेले निर्णय, त्यामध्ये त्यांना आलेले यश-अपयश, शासकीय धोरण आणि विविध पक्षांची सरकारे यांचा सर्व विचार केला, तर नक्कीच ब्राझील देशाचा प्रयत्न इतरांसाठी प्रेरणादायी आहे. भारतामध्येही ज्या ज्या वेळी इथेनॉलबद्दल बोलले जाते, त्या त्या वेळी ब्राझीलचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

डॉ. भास्कर गायकवाड   ९८२२५१९२६०

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com