आशेचे किरण

राज्यातील बीटी कापूस उत्पादक सध्या आर्थिक अडचणीत आणि प्रचंड संभ्रामास्थेत पण आहेत. अशावेळी सरळ वाणांत बीटी अथवा नांदेड-४४ बीटी असे काही आशेचे किरण त्यांना दिसत आहेत.
संपादकीय
संपादकीय

मागील काही वर्षांपासून राज्यात खासगी कंपन्यांच्या संकरित बीटी कापूस वाणांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. संकरित बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावही वाढला आहे. बीटी कापसाचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. अनधिकृत बीटी बियाण्यांचाही राज्यात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक अडचणीत तर आहेच परंतु कापसाचे नेमके कोणते वाण लावायचे, अशा संभ्रमावस्थेतही तो आहे. अशा निराशाजनक वातावरणात कापूस उत्पादकांना आता काही आशेचे किरण दिसू लागले आहेत. गुंटुर येथे झालेल्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पावरील कार्यशाळेत ‘केंद्रीय कापूस संशोधन संस्थे’च्या (सीआयसीआर) ‘सीएनए-१०२८’ या देशी कापसाच्या सरळवाणांच्या प्रसारणास नुकतीच मान्यता मिळाली आहे. हा वाण अधिक उत्पादनक्षम असून धाग्याची लांबी, ताकद, तलमता आदी बाबींमध्ये सुद्धा सरस आहे. या वाणाचे सीआयसीआरच्या प्रक्षेत्रावर बीजोत्पादन घेतले जात असून काही शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीजी-१ वरील महिको-मॉन्सॅंटोची रॉयल्टी संपुष्टात आल्यावर सीआयसीआरने क्राय-१ एसी जीन त्यांच्याकडील चार सरळ वाणांत टाकला आहे. या बीटी सरळवाणांच्या बीजोत्पादनासाठी त्यांनी महाबीजशी करार केला असून त्यांचेही बियाणे कापूस उत्पादकांना लवकरच उपलब्ध होईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महाबीज यांच्या प्रयत्नातून विकसित करण्यात आलेल्या नांदेड-४४ बीटी वाणाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या वाणाच्या चाचण्या मराठवाड्यात घेतल्या गेल्यामुळे यावर्षी केवळ या विभागासाठीच व्यावसायिक लागवडीस परवानगी मिळाली आहे. चालू खरीप हंगामात या वाणाच्या बियाण्यांची २६ हजार पाकिटे मराठवाड्यातील कापूस उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यावर्षी मध्य भारतातही नांदेड-४४ बीटीच्या चाचण्या घेण्यात येत असून पुढील वर्षी संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य भारतातही लागवडीस परवानगी मिळेल. महाबीजच्या सहयोगाने पुढील वर्षी या वाणाचे तीन लाख बियाणे पाकिटे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. बीटी कापसाचे देशात आगमन होण्यापूर्वी भारतातील जवळपास ५० टक्के क्षेत्र नांदेड-४४ या वाणानेच व्यापले होते. हा वाण रस शोषक किडीस सहनशील असून कमी पाण्यात तग धरून राहतो. या वाणांस वरचेवर बहार येत असून अधिक उत्पादनक्षम पण आहे. पूर्वी नांदेड-४४ या कापसाच्या वाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक होत होता. या वाणात आता बीटी जनुक घातल्यामुळे त्यावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल.    

कपडा तयार करण्यासाठी लांब धाग्यात मध्यम लांबीचा धागाही मिसळावा लागतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेले खासगी कंपन्यांचे संकरित बीटी वाणं लांब धाग्याचीच आहेत. त्यामुळे मागील दोन-तीन वर्षांपासून कापड उद्योगाला मध्यम धागा दुसऱ्या देशांतून आयात करावा लागत आहे. यावर बऱ्यापैकी परकीय चलनही खर्च होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे नांदेड-४४ बीटी कापसाच्या धाग्याची लांबी मध्यम आहे. या वाणाची राज्यात, देशात लागवड वाढली म्हणजे कापड उद्योगाची मध्यम धाग्याची पूर्तता देशातच होऊ शकते. देशी कापसामधील सरळ अथवा संकरीत बीटी वाणांचा प्रसार देशात झपाट्याने व्हायला हवा. याकरिता त्यांचे बियाणे उत्पादनावर संबंधित संस्थांसह शासनानेही लक्ष द्यायला हवे. विशेष म्हणजे या वाणांच्या बीजोत्पादनात शेतकरीही सहभाग घेऊन चांगली अर्थप्राप्ती करू शकतात. कापसाच्या बीजोत्पादनासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण याकरिता संबंधित संस्थांनी तसेच कृषी विभागानेही पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्रासह कापूस उत्पादक प्रमुख राज्यांमध्ये बीटी सरळ वाणं आणि संकरित नांदेड-४४ बीटी यांनी ३० ते ४० टक्के क्षेत्र व्यापले पाहिजे. असे झाले तरच पांढऱ्या सोन्याने पुन्हा कापूस उत्पादकांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com