युक्ताहारविहारस्य...

आधुनिकीकरणाच्या नावाखाली संपूर्ण मानवजातीची आहार-विहाराची पद्धत आणि व्यवस्था पूर्णपणे बदलून गेली आहे. स्वतःला मॉडर्न समजण्याच्या नादात आहार व्यवस्था पर्यायाने शरीर आणि मनाची संपूर्ण जडणघडण बदलून गेली आहे. आज त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्ठस्य कर्मसु।  युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखहा।।

श्रीमद् भगवद् गीतेमधील सहाव्या अध्यायातील सतराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला हा उपदेश आहे. गीतेतील सहावा अध्याय हा आत्मसंयम योग याबद्दलचा असून संपूर्ण मानव जातीला, जोपर्यंत पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत ती उपयोगी ठरेल, असे हे मार्गदर्शन आहे. हजारो वर्षांपूर्वी आहार आणि विहार आणि त्यासंबंधीच्या सर्व बाबींचे महत्त्व आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. मात्र, ते आज परत नव्याने समजून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली संपूर्ण मानवजातीची आहार-विहाराची पद्धत आणि व्यवस्था पूर्णपणे बदलून गेली आहे. स्वतःला कुठेतरी मॉडर्न समजण्याच्या नादात आहार व्यवस्था पर्यायाने शरीर आणि मनाची संपूर्ण जडणघडण बदलून गेली आहे. आज त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. आहार-विहार या शब्दांचा अर्थ फक्त खानपान आणि त्यासंबंधीचा नसून व्यापक प्रमाणात आहे. खानपान हा जसा शरीराचा आहार आहे, तसा मनालासुद्धा आपण रोज आहार पुरवत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. खानपानातील बदलाचे शरीरावर परिणाम जाणवतात. मात्र, मनाला पुरविलेल्या आहाराचे परिणाम माणसाच्या विचारांवर आणि कर्मावर पडत असतात. आजच्या इंटरनेटच्या जगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे यातून आपण दिवसभरात मनाला आहार पुरवत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वृत्तपत्र, मोबाईल, टीव्हीच्या माध्यमातून आपण म्हणाला जो वैचारिक आहार देतो त्याचे रूपांतर आपल्या विचारात पर्यायाने कृतीत होत असतो. शरीरात विष गेल्यावर शरीर विषारी होत जाते तसेच मनात चुकीच्या विचारांचे सेवन झाल्यास निश्चित विचार देखील विषारी होतात आणि त्यातून घडणारे कर्म हे त्याच स्वरूपाचे असेल, यात शंका नाही. शरीराच्या आहारासंबंधी देखील अनेक नियम पाळण्याची गरज आहे योग्य वेळेस योग्य प्रमाणात घेतलेला समतोल आहार शरीराचे योग्य पोषण करतो. 

गेल्या ५० वर्षांचा आहारशास्त्राचा इतिहास पाहता त्यात खूप मोठा बदल झाला आहे. मात्र, हा बदल शरीर व्यवस्था बिघडवणार ठरला. मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह आणि रसायनांचा वापर केलेला हवाबंद डब्यातील आहार तसेच फास्ट फूड शरीराला खूप घातक ठरत आहे. त्यातून वेगवेगळे रोग आणि विकार उत्पन्न होत आहेत. अगदी अल्प वयापासूनच फास्ट फूड, प्रिझर्वेटिव्ह युक्त आहार मुलांच्या शरीरात गेल्याने शरीर कमकुवत होण्यास सुरुवात झाली आहे. काही वर्षांपूर्वी फक्त बोटावर मोजण्याइतके पदार्थ बाजारात मिळायचे, आज मात्र हजारो पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. याचा गांभीर्याने विचार करून पालकांनी मुलांना घरी बनवलेले सात्विक आहार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील महिलांना देखील विविध आहार तसेच हंगामाप्रमाणे उपयुक्त फळे भाज्या तसेच इतर आहार याबद्दल माहिती असावी. सात्विक आहारासोबत नियमित व्यायाम, ध्यानधारणा, प्राणायाम, योगासन इत्यादि उपक्रम करण्याची गरज आहे. भावी पिढीच्या भवितव्यासाठी युक्त आहारासोबत युक्त विहाराची देखील बालपणापासून जोड देण्याची गरज आहे. शालेय शिक्षणातून ह्या विषयावरील जनजागृती आवश्यक आहे. शरीराच्या निरोगीपणासाठी जशी सात्विक आणि योग्य आहार-विहाराची गरज असते तसेच आपले दिवसभरातील कर्म त्यात मानसिक, शारीरिक आणि वाचिक कर्म सात्विक असण्याची गरज आहे. कायिक, वाचिक, मानसिक हे कर्माचे तीन ढोबळ प्रकार असून हे सात्विक होण्यासाठी आपण जो वैचारिक आहार घेतो तो महत्त्वाचा आहे. ‘आहार तैसी होय बुद्धी’ या स्वरूपाची अनेक उदाहरणे अनेक ग्रंथांमध्ये संतांनी सांगितले आहेत. आहार सात्विक असावा तसेच तो सात्विक पद्धतीने आणि सात्विक घरचा असणे आवश्यक आहे. कारण आपण आहारासोबत तिथली एनर्जी अर्थात तरंग देखील ग्रहण करत असतो.

जगातील सर्वच धर्मांनी त्यांच्या धर्मग्रंथातून आणि उपदेशातून सात्विक आहार आणि विहार या बाबत मार्गदर्शन केले आहे. शरीरासाठी आज अनेक उपवासाच्या लग्नाच्या पद्धती उपलब्ध आहेत. कारण शरीर हे धर्माची साधना करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे ते निरोगी असणे आवश्यक आहे पण मौन आणि ध्यानाच्या माध्यमातून मानसिक उपवास करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे. समाजात आज वाढता हिंसाचार, गुन्हे, बलात्कार, विकृत्या इत्यादी सर्व समाजमन बिघडल्याचे संकेत आहे आणि यासाठी समाजमनाला पुरवण्यात येणारा वैचारिक आहार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. इंटरनेटचे युग असले तरी आपण त्यात काय बघावे आणि त्यातून काय बोध घ्यावा, मनावर काय बिंबवावे हे आपल्या हातात आहे. कारण साधन कधीच वाईट नसते त्याचा उपयोग आपण कसा करतो याला जास्त महत्त्व आहे. संगणकाच्या भाषेत बोलायचे झाल्यास ‘इनपुट’ जसे असेल तसेच ‘आउटपुट’ होईल. त्यामुळे इनपुटकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा दुःखाशिवाय दूसरे फळ प्राप्त होणार नाही.

सचिन होळकर : ९८२३५९७९६० (लेखक कृषी तसेच संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com