परतीच्या मॉन्सूनचा बदलता पॅटर्न

महाराष्ट्रावरून नैऋत्य मॉन्सूनच्या माघारीच्या सरासरी तारखा आता पहिल्यापेक्षा ५ ते १० दिवस उशीरा झाल्याआहेत. कोकण ८ ऑक्टोबर, मध्य महाराष्ट्र ८ ते १३ ऑक्टोबर, मराठवाडा ९ ऑक्टोबर आणि विदर्भ ८ ऑक्टोबर अशा मॉन्सून परतीच्या नव्या सरासरी तारखा आहेत. याचा अर्थ भविष्यकाळात नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस राज्यावर आतापेक्षा काही दिवस आणखी पडत राहणार आहे. पीक नियोजनात या बदलत्या वेळापत्रकाचा योग्य तो विचार शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी सुद्धा करायला हवा.
agrowon editorial article
agrowon editorial article

दरवर्षी जून महिन्यात आपण ज्या मॉन्सूनची मोठ्या आतुरतेने वाट पाहतो तो तर केवळ चार महिने राहणारा एक पाहुणा असतो. सप्टेंबर महिना लागला की, त्याच्या परतीचे वेध लागायला सुरुवात होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ४ सप्टेंबर २०२० ला एका वक्तव्यात जाहीर केले की, पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनची माघार सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती १० ते १६ सप्टेंबरच्या दरम्यान निर्माण व्हायची शक्यता आहे. अर्थातच, महाराष्ट्रावरून मॉन्सून केव्हा प्रयाण करील ते त्यानंतरच सांगता येईल, आता नाही. 

वस्तुस्थिती अशी आहे की, मॉन्सूनच्या आगमनाविषयी विशेषतः केरळवरील आगमनाविषयी, जितके संशोधन झालेले आहे तितके मॉन्सूनच्या परतीविषयी केले गेलेले नाही. हवामानशास्त्रज्ञांनी मॉन्सूनच्या आगमनाची व्याख्या काटेकोरपणे केलेली आहे. अलीकडील काही वर्षांत केरळवरील आगमनाचे पूर्वानुमान पंधरा दिवस आधी केले जात आहे आणि ते बहुतेक वेळा खरे ठरले आहे. परतीच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही. मॉन्सूनचे आगमन किंवा त्याचे एखाद्या ठिकाणी दाखल होणे ही एक नैसर्गिक घटना असते जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, कारण पाऊस पडू लागतो, वारे नैऋत्येकडून वाहू लागतात. पण मॉन्सूनचे परतणे तसे नसते. मॉन्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पुष्कळदा विश्रांती घेतो व पुन्हा सुरू होतो. तेव्हा मॉन्सूनने माघार घेणे ही तशी एका विशिष्ट स्वरूपाची घटना नसते. आपल्याला तिची जाणीव होईलच असे नाही. ती केवळ एका नैसर्गिक प्रक्रियेची सुरवात असते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की, हवामानाची परिस्थिती पूर्ववत, म्हणजे मॉन्सून येण्याआधीसारखी होते.

भारतीय जनता आणि विशेषतः शेतकरी बंधूभगिनी मॉन्सूनचा घनिष्ठ संबंध पावसाशी जोडत असले तरी मॉन्सूनचा खरा संबंध पावसाशी नसून वाऱ्यांच्या दिशेशी असतो. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील वारे नैऋत्येकडून वाहतात आणि समुद्रावरचे बाष्प, ढग व पाऊस जमिनीवर घेऊन येतात. पण सप्टेंबरमध्ये वारे उलट दिशेने वाहू लागतात. ते उत्तरेकडची कोरडी हवा दक्षिणेकडे आणतात आणि पाऊस कमी होतो किंवा थांबतो. यालाच मॉन्सूनची माघार किंवा परतीची प्रक्रिया म्हणतात. 

परतीचे सुधारित वेळापत्रक यंदाच्या वर्षी मे महिन्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सूनच्या परतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. जुने वेळापत्रक १९०१ ते १९४० च्या आकडेवारीवर आधारलेले होते. तर नवीन वेळापत्रक १९७१ ते २०१९ दरम्यानच्या अद्ययावत माहितीवर आधारित आहे आणि म्हणून आपण ते अधिक विश्वसनीय मानले पाहिजे. नव्या वेळापत्रकानुसार राजस्थानवरून मॉन्सूनच्या परतीची सुरुवात आता सरासरी १७ सप्टेंबरच्या आसपास होणार आहे. ही आधीच्या सरासरी तारखेपेक्षा एक पंधरवडा उशीराने आहे. त्यानंतर हळूहळू व क्रमाक्रमाने मॉन्सून देशाच्या विविध प्रदेशावरून मागे हटत जाईल आणि तेथील सामान्य हवामान पूर्ववत होत जाईल.  महाराष्ट्रावरून नैऋत्य मॉन्सूनच्या माघारीच्या सरासरी तारखा पण आता बदलल्या गेल्या आहेत. त्यासुद्धा पहिल्यापेक्षा ५ ते १० दिवस उशीरा आहेत. कोकण ८ ऑक्टोबर, मध्य महाराष्ट्र ८ ते १३ ऑक्टोबर, मराठवाडा ९ ऑक्टोबर आणि विदर्भ ८ ऑक्टोबर अशा मॉन्सूनच्या परतीच्या नव्या सरासरी तारखा आहेत. याचा एक अर्थ हा आहे की, भविष्यकाळात नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस महाराष्ट्रावर आतापेक्षा काही दिवस आणखी पडत राहणार आहे. पीक नियोजनात शेतकऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी या बदलत्या वेळापत्रकाचा योग्य तो विचार नक्कीच करायला हवा. येथे पुन्हा समजून घेणे महत्वाचे आहे की, या सरासरी तारखा आहेत आणि प्रत्येक वर्षी मॉन्सून या तारखा पाळीलच असे मुळीच नाही. या वर्षीसुद्धा मॉन्सूनच्या परतीच्या तारखा प्रत्यक्षात काय असतील आणि त्या कितपत नव्या वेळापत्रकानुसार ठरतील हे अजून आपल्याला पाहायचे आहे. 

परतीचा पाऊस इतर अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकरी परतीचा पाऊस अधिक महत्त्वाचा मानतात. याचे कारण असे की, महाराष्ट्रातील अनेक भागांतून मॉन्सून परतला तरी त्याबरोबर तेथील पाऊस लगेच बंद होत नाही. वाऱ्यांची दिशा बदलली तरी मॉन्सूनच्या हवेतील आर्द्रता वातावरणात टिकून असते आणि तिचे रूपांतर अधून मधून पावसात होते. पण परतीच्या पावासाचे स्वरूप निराळे असते. मॉन्सूनचा पाऊस सामान्यतः रिमझिम, हलका किंवा संततधार असतो. मॉन्सूनच्या ढगांची व्याप्ती विस्तृत असते. मॉन्सून सक्रिय असताना सबंध महाराष्ट्र राज्य ढगांनी व्यापलेले असते. उलट, परतीच्या पावसाचे ढग स्थानिक असतात आणि त्यांची उंची खूप असते. हा पाऊस वादळी स्वरुपाचा असतो, ज्याबरोबर मेघगर्जना होते आणि विजा चमकतात. दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जेथे खरीप हंगामात पुरेसा पाऊस पडत नाही, तेथे परतीचा पाऊस उपयुक्त ठरतो. पाणी जमिनीत जिरते आणि त्यावर रबी पिके काढता येतात. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा निश्चित अंदाज शक्य तितका लवकर मिळावा यासाठी हवामानशास्त्रज्ञांनी प्रयत्न करायची नितांत गरज आहे. खरीप पिकांच्या नियोजनासाठी आणि रबी पिके निवडण्यासाठी तो अतिशय उपयुक्त ठरेल. १ जून ते ७ सप्टेंबर २०२० च्या दरम्यानच्या एकूण पर्जन्यमानाची परिस्थिती अत्यंत समाधानकारक आहे. देशभराचे पर्जन्यमान सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक आहे. याच कालावधीत महाराष्ट्राला लाभलेल्या पर्जन्यमानाचे आकडे असे आहेत - कोकण +२४ टक्के, मध्य महाराष्ट्र + २९ टक्के, मराठवाडा + १७ टक्के, विदर्भ - १२ टक्के. राज्याची परिस्थितीही सामान्य किंवा सामान्याहून चांगली आहे. तेव्हा चिंतेचे कारण नाही. राजस्थानवरूनच मॉन्सून अद्याप हललेला नाही. तेव्हा महाराष्ट्रावरून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता इतक्यात तरी नाही.

डॉ. रंजन केळकर : ९८५०१८३४७५ (लेखक जेष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com