राजर्षींचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य

‘नायक हा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत नायक असतो', असे प्रसिद्ध तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाइन यांनी म्हटले आहे. हे विधान राजर्षी शाहू छत्रपतींना तंतोतंत लागू पडते. कारण कोल्हापूर संस्थानात १८९६ ते १८९९ च्या दरम्यान दुष्काळ आणि प्लेग या संकटांशी शाहू छत्रपतींनी जो अपूर्व लढा दिला, त्यावरून त्यांचे आपत्ती काळातील व्यवस्थापन कौशल्य लक्षात येते, तसेच त्यांचे जन्मसिद्ध नायकत्वही समजते. शाहू महाराजांच्या आजच्या जयंतीनिमित्त.
agrowon editorial article
agrowon editorial article

दोन एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार समारंभपूर्वक हाती घेतला आणि खऱ्या अर्थाने ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती बनले. या प्रसंगी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी''मध्ये ‘करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग'' असा अग्रलेख लिहून छत्रपतींना शुभेच्छा दिल्या होत्या. कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार हाती घेण्यापूर्वी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची कधी पायी, तर कधी घोड्यावरून पाहणी केली होती. शिरोळ, गडहिंग्लज, गारगोटी भागात ते हिंडले होते. शाहू छत्रपतींनी केवळ दोन वर्षांत संस्थानची भ्रष्टाचारी प्रशासनव्यवस्था पूर्ण बदलून टाकली. लोकांच्या सर्वंकष कल्याणाचा राज्यकारभार सुरू झाला. लोकांना सुलतानी संकटाची कोणतीच भीती आता उरली नव्हती. लोक सुखसमाधानात राहू लागले होते. तोच संस्थानमध्ये अस्मानी संकट उभे राहिले. १८९६ चा पावसाळा पूर्ण कोरडा गेला. जमिनी उन्हाने करपून निघाल्या. जमिनीला भेगा पडू लागल्या. नदी-नाले, तळी आणि विहिरींत पाण्याचा थेंबही दिसेना. सर्वसामान्य जनता भरडून निघाली. शेतकऱ्यांच्या घरातील धान्यांचे साठे संपून गेले. पोटासाठी लोक चोऱ्यामाऱ्या करू लागले. दुष्काळामुळे धान्यांच्या किमती आकाशाला भिडल्या. एक मणाचे पोते आधी एक रुपया १४ आण्यांना मिळत होते, तेच पोते आता चार रुपयांना विकले जात होते. पावणेतीन रुपयांना मिळणारे गव्हाचे पोते साडेचार रुपये भावाने मिळू लागले. साडेतीन रुपये मण असणारा तांदूळ साडेचार रुपये मण झाला. 

राजर्षी शाहूंना या अस्मानी भयानक संकटाचे गांभीर्य लक्षात येताच ते प्रजेला धीर देण्यासाठी कधी पायी, तर कधी घोड्यावरून मोजके अधिकारी बरोबर घेऊन दुष्काळी भागात फिरू लागले. दीनवाण्या शेतकऱ्यांना धीर देऊ लागले. दुष्काळावर मात करण्याच्या जिद्दीने ते त्यावर उपाय करण्याच्या कामाला लागले. 

शाहू छत्रपतींनी यासंबंधी पुढील उपायांची अंमलबजावणी केली.   भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, साठेबाजी करणारे व्यापारी-शेठजी आणि देवाधर्मांचा बागलबुवा दाखवून लुटणारे पुरोहित यांच्या गैरवर्तनाला आळा बसेल, असे महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केली.  

 संस्थानातील धान्यवाटपाची पुनर्रचना केली. त्यासाठी व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेऊन त्यांनी खरेदी केलेल्या किमतीतच धान्य लोकांना विकण्याचा हुकूम दिला. त्या वेळी व्यापाऱ्यांना येणारा तोटा दरबार भरून देत होता.

  व्यापारी आणि दानशूर व्यक्‍तींनी शाहू छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन ८५०० रुपये जमा केले. त्यातून स्वस्त धान्य दुकाने उघडण्यात आली. म्हैसूर संस्थानकडून आणि ब्रिटिश सरकारकडून धान्याची मदत घेतली.

 शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानातील विहिरी, तळी, तलाव यांचा शोध घेऊन त्यामधील गाळ काढण्याची व्यवस्था करून या विहिरी आणि तळी अधिक पाणीदार केली.

 शेतकऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या जनावरांना जगविण्यासाठी संस्थानात अनेक ठिकाणी छावण्या उघडल्या.

 लोकांची खरेदीशक्‍ती जोपासण्यासाठी त्यांना रोजगार पुरविणारी रस्त्यांची कामे हाती घेतली.

 वृद्ध, रुग्ण यांच्यासाठी संस्थानमध्ये नऊ ठिकाणी आश्रम उघडून त्यांना जगण्याची संधी देऊन त्यांचा मूलभूत हक्‍क जोपासला. त्याचा फायदा पन्नास हजार लोकांनी घेतला. इतकेच नव्हे तर अपंगांना त्यांच्या घरी धान्य पुरवले.

  या खेरीज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तगाई दिली, तर नोकरदार वर्गाला दुष्काळी भत्ता वाटला.  दुष्काळावर मात करण्याठी खास प्रशासकीय विभाग उघडून त्यांचे सूत्रसंचालन भास्करराव जाधवांसारख्या समर्थ अधिकाऱ्यांकडे दिले. म्हणूनच १८९६-९७ च्या दुष्काळात संपूर्ण भारतात दहा लाख लोकांचे मृत्यू झाले, परंतु कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूकबळी गेला नव्हता.  प्लेगच्या संकटाशीही लढा 

गेले चार-पाच महिने जगभर ‘कोरोना'' धुमाकूळ घालतो आहे. यात अनेकांना प्राण गमावले आहेत. कोरोनावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी, शाहू छत्रपतींनी प्लेगच्या भयानक साथीशी कसा यशस्वी लढा दिला, हे पाहणे प्रबोधनात्मक ठरेल. १८९६ मध्ये कराची, भिवंडी, पुणे, सातारा आणि बेळगाव भागात प्लेगची साथ प्रथम पसरली. त्यानंतर तिचा प्रादुर्भाव कोल्हापूर संस्थानातही झाला. शाहू छत्रपतींनी हे प्लेगचे आव्हान स्वीकारले आणि ते त्याच्याशी सामना करू लागले. त्यांनी तातडीने पुढील उपाय केले. 

 प्लेगबाबतचे अज्ञान दूर केले. प्लेगचे जंतू कसे नष्ट करावयाचे यासंबंधी सविस्तर माहिती देणारा जाहीरनामा १० डिसेंबर १८९८ रोजी प्रसिद्ध केला. त्यामध्ये प्लेगचा उंदीर कसा जाळून टाकावा व आपले घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ कसा ठेवावा याची माहिती दिली.

 संस्थानातील १८ प्लेगग्रस्त गावांतील वस्ती हलविली. त्या गावांतील लोकांना रानात वस्ती करण्याचा आदेश दिला. त्यासाठी त्यांना घरे बांधण्याचे साहित्य पुरविले. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तसेच गावातील घरांची चोर-दरोडेखोरांपासून संरक्षण करण्याची हमी घेतली.  

 कोटीतीर्थ येथे खास हॉस्पिटल उघडले. शाहू महाराजांचा मुक्‍काम त्यावेळी पन्हाळ्यावर असे. ते दिवसातून एकदा शहरात येऊन सूचना देत. कोटीतीर्थ येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन रोग्यांची आपुलकीने विचारपूस करीत.

 प्लेगशी दिल्या जाणाऱ्या लढ्याला अधिक वेग यावा यासाठी पन्हाळा ते कोल्हापूर ते रेसिडन्सी अशी टेलिफोनची व्यवस्था केली.

 शहरात बाहेरून येणाऱ्यास संशयित रोग्यांसाठी ‘क्वॉरंटाईन'' कक्ष सुरू केले. तेथे संशयितास ३-४ दिवस राहावे लागे. ती व्यवस्था अतिशय कडक असल्याची आठवण डॉ. पी. सी. पाटील यांनी "माझ्या आठवणी'' या आत्मचरित्रात नमूद केली आहे.

 प्लेगच्या शेवटच्या टप्प्यात त्यावरील लस उपलब्ध झाली. ते टोचून घेण्यास लोक घाबरत. म्हणून शाहू छत्रपतींनी स्वत:सह आपल्या सर्व परिवाराला आणि अधिकाऱ्यांना प्लेगची लस टोचून घेऊन लोकांची भीती नष्ट केली. 

पस्तीशीच्या उंबरठ्यावर असणारा हा राजा दुष्काळ आणि प्लेग या अस्मानी संकटांशी प्रजेच्या संरक्षणासाठी निर्धाराने लढला, म्हणूनच तो ‘लोकराजा'' या पदवीला पात्र झाला. 

डॉ. रमेश जाधव 

(लेखक ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि शाहू चरित्राचे अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com