agriculture news in marathi agrowon special article on chemical fertilizers in India | Page 2 ||| Agrowon

जमिनीची सुपीकता आणि  खतांची कार्यक्षमता वाढवा 

डॉ. भास्कर गायकवाड 
बुधवार, 26 मे 2021

रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भविष्यात रासायनिक खतांच्या टंचाईची शक्यता या बाबी लक्षात घेऊन शेतीमधून शाश्‍वत उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यासाठी जमिनीची प्रत सुधारण्याशिवाय पर्याय नाही. 

शेती उत्पादन, शेतकऱ्‍यांना मिळणारा फायदा, अन्नधान्य स्वयंपूर्णता यामध्ये रासायनिक खतांना महत्त्व आहे. रासायनिक खतांचा वापर वाढविण्यासाठी १९६५-६६ (हरितक्रांती) नंतर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. रासायनिक खतांना पिके चांगला प्रतिसाद देत आहेत, असे बघून या रसायनांचा अतिरेक आणि बेसुमार वापर सुरू झाला. पिकाला रासायनिक खत देताना कमीत कमी ढोबळ मानाने पिकाला ४ः२ः१ या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर होणे अपेक्षित होते. परंतु अशा प्रकारची काळजी केव्हाच घेण्यात आली नाही. शेतकऱ्‍यांचे सर्वांत जास्त आवडीचे खत म्हणजे युरिया. त्यामुळे युरिया शेतकऱ्‍यांच्या गळ्यातील ताईत झालेला आहे. पर्यायाने रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढला. युरिया या खतामध्ये क्लोराइडचे प्रमाण असल्यामुळे युरियाच्या जास्त वापरामुळे जमिनीतील जीव-जिवाणू, गांडुळे नष्ट होऊन जमिनीचा जैविक गुणधर्म संपुष्टात येतो. याचा विचार करून युरियाच्या किमती वाढविण्यावर कृषी शास्त्रज्ञांचा शासनावर दबाव असतो. परंतु युरियाच्या किमती वाढल्या तर शेतकरी नाराज होऊन शासन पर्यायाने राजकारणावर परिणाम होतो. या चक्रव्यूहामध्ये युरिया आजपर्यंत शासनाच्या नियंत्रणात आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांच्या वापरावरच सुरुवातीपासून शास्त्रज्ञ, शासन आणि पर्यायाने शेतकऱ्‍यांनी लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम निश्‍चितच जमिनीच्या सुपीकतेवर होऊन उत्पादनक्षमता घटली आहे. 

युरिया शासनाच्या अनुदानावर मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा वापर वाढत जाऊन नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण ७ : २.६७ :१ या प्रमाणात पोहोचले. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याऐवजी त्याचा जमिनीवर अनिष्ट परिणाम झालेला आहे. अर्थात, आजही नत्र खत वापरण्याचे प्रमाण जास्तच आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश हीच फक्त पिकांची अन्नद्रव्ये नसून पिकांना १६ प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. गंधक, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम यांसारख्या दुय्यम तसेच फेरस, मॅंगेनीज, झिंक, बोरॉन यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अंतर्भाव असलेल्या खतांची निर्मिती होऊन त्यांचा वापर वाढला तरच आज उत्पादन वाढीत होत असलेली घट थांबविता येईल. लोकसंख्या वाढीचा दर १.९० टक्का असताना अन्नधान्य उत्पादनाचा वेग फक्त १.२० टक्का आहे. यावरून कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी सुरू आहे, असे म्हणता येणार नाही. 

मागील अनुभव असा आहे, की ज्या ज्या वेळी रासायनिक खतांच्या किमती वाढल्या त्या त्या वेळी त्यांच्या वापरामध्ये घट होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर झालेला आहे. १९९२-९३ मध्ये स्फुरद आणि पालाश खतांवरील निर्बंध उठविल्यानंतर स्फुरद आणि पालाश खतांचा वापर १४ आणि ३५ टक्क्यांनी कमी झाला होता. रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढला. रासायनिक खतांच्या किमती वाढू नये, यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांच्या किमती वाढणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जगामध्ये रासायनिक खत निर्माण करण्यासाठी लागणाऱ्‍या कच्च्या मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे आणि २०५० मध्ये जगाला लागणाऱ्या एकूण रासायनिक खतांच्या फक्त ६५ टक्के खतच निर्माण होऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. भारत देश हा रासायनिक खतांच्या बाबतीत बऱ्याच अंशी परावलंबी आहे. स्फुरद तयार करण्यासाठी लागणारे रॉक फॉस्फेट तसेच फॉस्फरिक आम्ल आयात करावे लागते. तसेच सल्फर, अमोनियाही मोठ्या प्रमाणात आयात करावा लागतो. याचा विचार करून रासायनिक खतांच्या कार्यक्षम वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

आजही वापरलेल्या खतांपैकी ३० ते ४० टक्के खतांचाच योग्य विनियोग होऊन बाकीचे खत वाया जाते. माती-पाणी परीक्षण केल्याशिवाय खतांचा वापर करूच नये. जमिनीतील क्षारता, सामू, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण जोपर्यंत योग्य पातळीवर ठेवले जात नाही, तोपर्यंत रासायनिक खतांच्या वापराला जमीन प्रतिसाद देत नाही. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविल्याशिवाय जमिनीतील सामू, क्षारता तसेच चुनखडीचे प्रमाण कमी होणार नाही. त्याचबरोबर जमिनीतील जीव-जिवाणू, गांडुळांची संख्या वाढत नाही. म्हणूनच सेंद्रिय पदार्थ मग तो कोणत्याही स्वरूपात असो त्याचा वापर जमिनीत केल्याशिवाय रासायनिक खतांचा वापर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घातल्यासारखे आहे. शेतातील शेणमूत्र, काडीकचरा हीच शेतकऱ्‍यांची खरी संपत्ती आहे. या संपत्तीला आपल्या शेतात व्यवस्थित वापरून आणि रासायनिक खतांच्या मृगजळातून बाहेर पडण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा वापर शेणखतामध्ये मिसळून केला तर त्याची कार्यक्षमता वाढते. खते देताना ती जमिनीवर न टाकता मुळांजवळ टाकली व मातीमध्ये व्यवस्थित मिसळली तरच त्यांचा कार्यक्षम वापर होतो. तसेच रासायनिक खतांचा वापर करताना ती जास्त वेळा विभागून दिली, तर त्यांचा कार्यक्षम वापर होतो. पिकाच्या पानांची, देठांची तपासणी करून त्यानुसार खतांचा वापर केला तर त्याचा फायदा जास्त होतो. त्यासाठी फवारणीयुक्त (पाण्यात विद्राव्य) खते तसेच ठिबकद्वारे देण्यात येणाऱ्‍या खतांचा वापर करता येईल. 

आज मोठ्या प्रमाणात जमिनी क्षारवट-चोपण झालेल्या आहेत. अशा जमिनीत आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर केला तरच ती पिकांना उपलब्ध होतात. म्हणून अशा खतांची निर्मिती आणि वापर वाढण्याची गरज आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये अत्यंत कमी प्रमाणात लागतात. परंतु त्यांची गरजेनुसार उपलब्धता नसेल तर मात्र दिलेल्या रासायनिक खतांचाही पिकांना काहीही उपयोग होत नाही. युरिया खतांचा वापर मोजकाच आणि थोड्या प्रमाणात अनेकदा विभागून केला तर त्याचा जमीन, जीव-जिवाणू आणि पिकांवर अनिष्ट परिणाम होणार नाही. पिकाची शाकीय वाढ नियंत्रणात राहून किडी-रोगांचे प्रमाणही कमी राहील. यापुढे रासायनिक खतांकडे बघताना पिकांचे किंवा जमिनीचे मुख्य खाद्य न बघता टॉनिकच्या स्वरूपात बघितले तर अनेक प्रश्‍न सुटतील. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भविष्यात रासायनिक खतांच्या टंचाईची शक्यता या बाबी लक्षात घेऊन शेतीमधून शाश्‍वत उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यासाठी जमिनीची प्रत सुधारण्याशिवाय पर्याय नाही. 
पर्यावरणामधील बदलांना सामोरे जाण्यासाठी, वाढत्या तापमानास तोंड देण्यासाठीही जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. पीक उत्पादन घेत असताना जमिनीतील कर्ब हाच खरा हिरो ठरणार आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीचा बाऊ न करता जो शेतकरी जमिनीची सुपीकता आणि कार्यक्षमता वाढवून खतांचा वापर कमी करतील, तोच यापुढील काळात शेती क्षेत्रात टिकाव धरू शकणार आहे. 

डॉ. भास्कर गायकवाड 
९८२२५१९२६० 

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स

इतर संपादकीय
कृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...
आकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...
वास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....
अजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...
अडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...
बाजार समित्या  नेमक्या कोणासाठी? पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...
समुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...
दुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...
एचटीबीटी’चे भिजत घोंगडे .  बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
अन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...
मृद्‍गंध हरवत चाललाय!यावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...
शेतकरी आजही पारतंत्र्यातच! १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...
करार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...
पेरणी ‘हिरव्या स्वप्नांची’!  मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
तो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...
बेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...
‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...
उत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’  जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...