agriculture news in marathi agrowon special article on climate change is biggest challenge | Agrowon

हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हान

डॉ. नितीन उबाळे
शनिवार, 18 जानेवारी 2020

हवामान बदलामुळे वादळे, तापमानवाढ, बर्फवृष्टी, सागरी पातळीत वाढ, दुष्काळ, अतिपर्जन्यमान, जंगलातील वणवे, जैवविविधतेचा ऱ्हास, भूस्खलन व विविध पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच वातावरणातील या बदलास निसर्गातील मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, असेच म्हणावे लागेल.
 

आ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. यावर उपाययोजना व ध्येयधोरणे ठरविण्यासाठी २ ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत माद्रिद (स्पेन) येथे संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान परिषद पार पडली. परंतु, सर्व राष्ट्रांची पॅरिस कराराच्या अंमलबजावणीबाबत सहमती न झाल्याने ही परिषद अनिर्णीतच राहिली. ‘जगातील राष्ट्रांनी हवामान बदलावर उपाययोजना करण्याची चांगली संधी सोडली’ असे खेदपूर्वक मत संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गटर्रस यांनी समारोपप्रसंगी व्यक्त केले. याबाबत पुढील वर्षी ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणाऱ्या परिषदेची वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की. तोपर्यंत हवामान बदलाच्या समस्या व परिणाम यात मात्र वाढ झालेली असेल. 

वर्ष २०१९ हे हवामान बदलाच्या दृष्टीने मैलाचा दगड गाठणारेच ठरले असे म्हणावे लागेल. ''पाबूक'' ''फणी'', ''क्यार'' व ''वायू'' अशा वादळांचा परिणाम भारत देशाच्या भूभागावर व अंदमान द्वीपसमूहावर मोठ्या प्रमाणावर दिसून आला. वातावरणातील प्रदूषण पातळीने तर उच्चांक गाठल्याचे दिल्लीमध्ये दिसून आले. यावर सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला उपाययोजना करण्यास सांगून ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळाले. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संस्थेचे महासचिव पेट्टेरी तालास यांनी या शतकाच्या अखेरपर्यंत ३ ते ५ अंश सेल्सिअसने तापमान वाढ होण्याचा इशारा दिला आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे आव्हान मानवजातीपुढील सर्वांत मोठे पर्यावरणीय आव्हान असणार आहे, हे मात्र नक्की!

शेती क्षेत्रावरील परिणाम
आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून, देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा जवळपास १८ टक्के आहे. कृषी क्षेत्राच्या एकूण वाट्यांपैकी उद्यानवर्गीय पिकांचा वाटा जवळपास ३० टक्के आहे. आज बदलत्या हवामान चक्राचे संकट बळिराजाच्या उशापाशी येऊन बसले आहे अन् ते येणाऱ्या काळात सातत्याने घोंघावत राहणारच आहे. शहरीकरण व औद्योगीकरण वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून वनस्पतींची वाढ वेगाने होत असली, तरी फुलधारणा व फळधारणा काळात अनुकूल वातावरण नसल्यामुळे फुलगळ, फळगळ व उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. तृणधान्ये, कडधान्ये, फळे, भाजीपाला, फूल उत्पादन आदींवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. शेती क्षेत्रातील या परिणामामुळे कृषी रसायने व खते आदी कृषी निविष्ठांचा वापर वाढत आहे. परिणामी खर्चाचा भार शेतकऱ्याला सोसावा लागत आहे. इतक्या उपाययोजना करूनही पदरात समाधानकारक उत्पन्न पडत नसल्यामुळे शेती तोट्यात येऊ लागली आहे. ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस कमी कालावधीत झाल्याने शेतीची हानी मोठ्या प्रमाणावर झाली. या पूरमय परिस्थितीने जमिनीतील सुपीक थर वाहून गेला आहे. तसेच ऊस पिकाच्या लागवडीवरील खर्चसुद्धा मिळाला नाही. मॉन्सूनच्या पर्जन्यवृष्टीतील हा बदल येणाऱ्या काळात शेतीस घातक ठरणार आहे. दिवस-रात्रीच्या तापमानातील फरक वाढत असल्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक होत नाही. वाढत्या तापमानात किडींचे प्रजनन होऊन त्यांची संख्या वाढते. तसेच सरासरीपेक्षा अतिथंड तापमानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रसार होतो. गेल्या काही वर्षांत पाऊस वेळेवर न आल्याने खरिपात पेरणी करूनही उगवण क्षमता कमी दिसून आली आहे. काही ठिकाणी तर दुबार पेरणीचे संकट आले आहे. हिवाळ्यात पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळत आहे. परिणामी फळबागांमध्ये रोगराई वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात वातावरणातील धग वाढून उष्माघात होऊन मनुष्य व जनावराचा मृत्यू होऊ शकतो. कोरडवाहू प्रदेशात दुष्काळामुळे पिकांना पाणी कमी पडून उत्पादन व प्रत खालावत आहे. फळबागांमध्ये बऱ्याच पिकांची वाढ समाधानकारक न झाल्यामुळे पुनर्लागवड करण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. एकूणच जैविक व अजैविक ताणास वनस्पती अधिक प्रमाणात बळी पडत आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर अस्मानी संकटाचे घोंघावणे असेच राहिल्यास गरिबी व बेरोजगारीचे प्रमाण वाढेल.

 उपाययोजना
संशोधन, तंत्रज्ञान, जागरूकता तसेच वनीकरण याद्वारे हवामान बदलावर काही प्रमाणात करता येऊ शकेल. संशोधनाद्वारे बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या निर्मितीवर भर द्यायला पाहिजे. हवामानातील बदलानुसार आणि पाणी उपलब्धतेनुसार पीक उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. हवामान अंदाजाची अचूकता आणि व्याप्ती वाढवणे. स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी मोठ्या प्रमाणावर करून तंत्रज्ञानाद्वारे ती माहिती शेतकऱ्यास पोचविणे गरजेचे आहे. हवामान विमा योजनेद्वारे नैसर्गिक संकटात नुकसान झाल्यास शेतकऱ्यास काही प्रमाणात भरपाई देता येऊ शकेल. शेतकऱ्यास मानसिक पाठबळ पुरवण्यासाठी शासकीय व स्वयंसेवी यंत्रणांनी पुढे येणे गरजेचे वाटते. खनिज इंधनांचा वापर कमी करण्यासाठी जैवइंधनांचा व हरित तंत्रज्ञानाचा प्रसार व वापर वाढवावा लागेल. विकसित देशात वाढत्या शहरीकरणावर, औद्योगीकरणावर व उत्खननावर काही प्रमाणात बंधने घालावीत. हवामान बदलावर मात करण्यासाठी फळ व वन पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. संकट काळात परसबागेतील लागवड हा अन्न सुरक्षिततेचा स्रोत असू शकेल. बेसुमार जंगलतोडीवर नियंत्रण व पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करणे क्रमप्राप्त आहे. हरित तंत्रज्ञान, जैविक इंधने, जैविक खते,  जैविक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर गरजेचे आहे. हवामान बदलाबाबत साक्षरता व शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी युवकांद्वारे चळवळ उभी होणे आवश्यक आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी शासनाने कडक कायदे करायला हवेत. हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्या लागतील; अन्यथा येणाऱ्या काळात अन्न सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. यासंबंधी मानवी समूहाने कृती करण्याची हीच ती वेळ म्हणावी लागेल.

डॉ. नितीन उबाळे ः  ९९७५६७८१७५
(लेखक पारुल विद्यापीठ, वडोदरा-गुजरात येथे सहायक प्राध्यापक आहेत.)


इतर अॅग्रो विशेष
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...