देशी गोवंश दुर्लक्षितच!

दिवाळी सण हा सणांचा राजा. या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण हा सण अत्यंत संयमाने आणि काळजी घेत साजरा करणार आहोत. या मोठ्या सणाची सुरुवात आपल्याकडे गोधन पूजनेने म्हणजे ‘वसुबारस’ने होते. घरासमोर रांगोळ्या काढून, महिला मंडळ उपवास करून सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रत्यक्ष गाईची पूजा करतात. अशा या गाईची आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती होण्यासाठीच हा लेखप्रपंच...
agrowon editorial article
agrowon editorial article

आपल्या देशात सण आणि महोत्सव साजरे करताना आपण काहीही कमतरता ठेवत नाही. अत्यंत उत्साहाने  सर्व सण साजरे करतो, आनंद उपभोगतो आणि तीच आपली संस्कृतीदेखील आहे. दिवाळी सण हा सणांचा राजा. दरवर्षी सलग पाच-सहा दिवस साजरा होणारा हा सण या वर्षी आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संयमाने आणि काळजी घेत साजरा करणार आहोत. या मोठ्या सणाची सुरुवात आपल्याकडे गोधन पूजनेने म्हणजे ‘वसुबारस’ने होते. आश्‍विन महिन्यातील वद्य द्वादशीला गोधन पूजनेने दीपावली सुरुवात होते. घरासमोर रांगोळ्या काढून, महिला मंडळ उपवास करून सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रत्यक्ष गाईची पूजा करतात. जिथे वाढत्या शहरीकरणामुळे गायी उपलब्ध होत नाहीत तिथे मात्र वेगवेगळ्या माती, चांदीच्या प्रतिमा, गाईच्या प्रतिकृती उपलब्ध करून त्यांची पूजा केली जाते. अगदी शेवटी रांगोळी काढून देखील पूजा केली जाते.

अनादिकालापासून गोपालन हे आपल्या देशात केले जाते. भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या उपलब्धतेवर देशाच्या विविध भागांत गोवंशाची निर्मिती होत गेली. पूर्वीच्याकाळी गोधनाच्या संख्येवर कुटुंबाची श्रीमंती मोजली जात होती. गर्ग संहितेत वर्णन केल्याप्रमाणे गो संख्येवरून गोपालकांना पदव्या बहाल केल्या जात असत. पाच लाख गाई सांभाळणारा ‘उपनंद’ दहा लाख गाई सांभाळणारा ‘वृषभानु’ पन्नास लाख गाई सांभाळणारा ‘वृषाभानुवर’ आणि एक कोटी गाई संभाळणारा हा ‘नंदराज’ अशा पदव्या बहाल केल्या जात. महाभारतात पाडवांकडे प्रत्येकी आठ आठ लाख देशी गायीचे कळप होते. विशेष बाब म्हणजे नकुल आणि सहदेव हे पशुवैद्य म्हणून त्यांची देखभाल करत होते, असा सगळा इतिहास आणि माहिती आपण वाचत आलो आहोत.

हळूहळू भौगोलिक सामाजिक आणि सांस्कृतिक बदल होत गेले. गाई-म्हशींचा वापर हा अनुक्रमे बैलनिर्मिती आणि दुधासाठी होऊ लागला. शेती पूर्णपणे बैलावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनाकडे म्हणावे इतके लक्ष त्या काळात दिले गेले नाही. गोवंशाची विविधता भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी संलग्न असल्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार हा त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे केला. आजमितीला जगात ७२५ गोवंश आहेत. आफ्रिका खंडात १२०, युरोप खंडात ३०५ आणि अमेरिका खंडात ११० गोवंश आहेत. आपल्या देशात एकूण ४८ देशी गोवंश आहेत. या गोवंशाचा विचार केला तर सर्व गोवंश हे त्या त्या भागातील हवामान, पर्यावरण, उपलब्ध वैरण त्याला अनुसरून आहेत. म्हणून गीर म्हटल्यानंतर गुजरात, सहिवाल म्हटल्यानंतर पंजाब. राठी म्हटल्यानंतर राजस्थान आणि खिल्लार म्हटल्यानंतर महाराष्ट्र डोळ्यासमोर येतो. म्हणजे त्या त्या भागातील हवामान, पर्यावरण, वैरण त्याच्या प्रगतीला पूरक असल्यामुळे त्यांची वाढ त्या त्या भागात झाली आणि तेथील पशुपालकांनी त्याचा वापर केला.

महाराष्ट्रात देखील खिलार, डांगी, देवणी, लालकंधारी, गवळाऊ या जाती अनुक्रमे सांगली-सोलापूर, नाशिक, लातूर, नांदेड, आणि वर्धा हे जिल्हे डोळ्यासमोर येतात. त्याचे कारणच असे आहे, की या सर्व प्रजाती जमिनीची विविधता, पर्यावरण, जलसंधारणाच्या सोयी, सामाजिक स्थिती, पर्जन्यमान व स्थानिक गरजेतून या जाती निर्माण झाल्या. त्यामध्ये वाढ झाली आणि पशुपालकांनी त्या सांभाळल्या. यावरून आपल्या लक्षात येईल, की ज्या वेळी अशा प्रजाती आपण स्थलांतरित करतो व  संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो त्या वेळी ज्या अडचणी येतात त्याचे मूळ यामध्ये दडलेले आहे.

वाढते औद्योगिकीकरण, वाढलेल्या लोकसंख्येमुळे तसेच शेतीसाठी वाढलेला जमिनीचा वापर, वाढलेली जंगलतोड, चराई क्षेत्र कमी झाले, त्यामुळे कुरणात आणि जंगलाच्या आसपास जनावरांना चारण्याचा प्रकार बंद झाला. त्यामुळे मुळातच कमी असणारी उत्पादनक्षमता आणखी कमी झाली. दूध कमी झाले आणि त्यामुळे देशी गोवंशाकडे दुर्लक्ष व्हायला लागले. जंगलात जनावरे चारण्यावर बंदी आली, शेतीतील यांत्रिकीकरण वाढले, त्यामुळे एकूणच बैलाच्या उत्पादनासाठी असणाऱ्या देशी गाई दुर्लक्षित झाल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र एकूणच उपलब्ध गाईंची संख्या, असणारे दूध उत्पादन आणि आपली लोकसंख्या याचा ताळमेळ बसेना. या प्रचंड लोकसंख्येला कमी किमतीत पूरक असे अन्न म्हणून दूधपुरवठा करणे आवश्यक होते. त्यामुळे संकरिकरणांचा निर्णय घेण्यात आला. तो प्रचंड यशस्वी झाला आणि आपण दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर पोचलो. संकरिकरणांमुळे देशातील करोडो अल्प, अत्यल्प भूधारक पशुपालक हे स्वतःच्या पायांवर उभे राहिले. त्यांच्या एकूणच आर्थिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाले आणि त्यांच्या जीवनात स्थिरता आली हे महत्त्वाचे परिणाम या संकरिकरणामुळे दिसले, याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.

भारतासारख्या खंडप्राय देशात अशा प्रकारची योजना राबवताना देशी गोवंशाकडे आणि त्याच्या दूध उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले हे कबूल करावे लागेल. संकरिकरणामुळे काही देशी गोवंशाच्या शुद्धतेवर परिणाम झाला, त्याची संख्या कमी होत गेली. काही श्रीमंत पशुपालक, सेवाभावी संस्था, पांजरपोळ यांचे लक्ष देशी गाईंच्या संवर्धनाकडे वळले आहे. आजही काही प्रमाणात शेतकरी शेती कामासाठी देशी बैल वापरतो. शेणखत, गोमूत्र यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, देशी गाईची रोगप्रतिकारशक्ती, स्थानिक वातावरणाची जुळवून घेण्याची क्षमता, त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमामुळे दूध उत्पादन वाढ होण्याची शक्यता आणि पशुपालकांच्या पशुसाक्षरतेमुळे सर्व पशुपालकांनी केलेले व्यवस्थापनातील बदल यामुळे निश्‍चितच येणाऱ्या काळात देशी गाईसुद्धा पशुपालकांच्या दारात मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागतील.

डॉ. व्यंकटराव घोरपडे  : ९४२२०४२१९५ (लेखक पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त  सहायक आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com