यंदाच्या दिवाळीत बस इतके करूयात...

संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात तसे शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिवाळी हा प्रासंगिक सण न राहता, स्वास्थ्य आणि समृद्धीचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात निरंतर राहो ही शुभेच्छा!
agrowon editorial article
agrowon editorial article

कोरोनाचा प्रभाव ओसरू लागला. श्‍वास मोकळा झाला. जीवन पूर्वपदावर येऊ लागले. काळजी घेत माणसं सामाजिक जीवन जगू लागलीत. कोरोना प्रभावाच्या या दोन वर्षांत आपण खूप किंमत मोजली आहे. विशेषतः कृषिक्षेत्राने खूप झळ सोसली आहे. आता आपण दिवाळी साजरी करत आहोत. कवी शंकर रमाणी म्हणतात तसा तमाच्या तळाशी दिवे लावणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) आणि भाऊबीज असा हा सहा दिवसांचा दीपोत्सव आपण उल्हास आणि उत्साहाने साजरा करतो. ऋषी (ज्ञान) आणि कृषी (कर्म) हे भारतीय संस्कृतीचे दोन सशक्त पाय आहेत. संत ज्ञानेश्‍वर महाराज सांगतात त्याप्रमाणे, भारतीय कर्मयोगाला ज्ञानयोगाचे डोळे लाभले आहेत. हे ज्ञानाचे डोळे म्हणजे प्रकाश! बारकाईने पाहिले तर भारतीय सण हे कृषिसंस्कृतीशी, आयुर्वेदाशी आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडलेले आहेत. पोळा, दसरा, संक्रांत, दिवाळी हे सर्व सण शेती आणि शेतकऱ्यांच्या जगण्याला अर्थपूर्ण करणारे आहेत. 

दीपपर्व वसुबारस   दीपावली पर्वाची सुरुवातच वसुबारसने होते. गोवत्सद्वादशीला वसुबारस असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. गाय ही कृषिसंस्कृतीचे अभिन्न अंग आहे. 

धनत्रयोदशी पावसाळ्याने निरोप घेतलेला असतो. शेत-शिवार धनधान्याने समृद्ध झालेले असते. धनधान्याच्या रूपाने शेतकऱ्याच्या घरात धनाची रास आलेली असते. शेतकऱ्यांसाठी धान्य हेच धन असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखरेचे सेवन केले जाते. आयुर्वेद आरोग्याला धनसंपदा मानतो. याच दिवशी लोक धनासोबत धान्याची पूजा केली जाते. या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही. अशी कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करून दीप लावतात. 

नरकचतुर्दशी सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साह्याने नरकासुराला मारले व त्याच्या बंदिवासातल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. तो दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. स्त्री-पुरुषाच्या संघशक्तीच्या विजयाचा सामाजिक विचार यामागे आहे. 

लक्ष्मीपूजन आश्‍विन वद्य अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची घरोघरी पूजा करतात. लक्ष्मी हे वैभवाचे आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. बुद्धी आणि परिश्रमाने धन संपादन करावे, आणि सुखमय जीवन जगावे. यासाठी धनलक्ष्मीची पूजा करायची तो हा दिवस. अस्वच्छता दूर करणाऱ्या केरसुणीला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची फार सुंदर परंपरा आजही खेड्यापाड्यात आहे.

बलिप्रतिपदा  कार्तिक शुद्ध प्रतिपदा, अर्थात बलिप्रतिपदा. हा दिवाळीचा मुख्य दिवस. दानशूर बळिराजाची बलिपूजा या दिवशी केली जाते. या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची सांस्कृतिक पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. 

भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. भाऊबिजेला यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची परंपरा रूढ झाली. शेती, माती, निसर्ग, नाती, आरोग्य, धन, संपत्ती या सर्व बिंदूना प्रकाशरेषांनी जोडणारा विलोभनीय प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळी. परंतु स्नेहाचे तेल घातलेल्या, समजांच्या प्रकाश पणत्यांनी आज शेती, माती, निसर्ग, नाती, धन, संपत्ती, स्वास्थ्य या सर्व बिंदूना जोडणारी प्रकाश रांगोळी आपण खरेच रेखाटतो का? दुर्दैवाने याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागते. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या शब्दांत आपली दिवाळी म्हणजे प्रेताला शृंगारणे आहे. बाहेर रोषणाई आहे, आणि मनात निराशेचा निबिड अंधार आहे. 

आजही शेतकरी, सामान्य माणूस निराशेच्या गर्तेत गरगरतो आहे. संत कबीर म्हणतात, तसे अस्मानी आणि सुलतानी या ‘दो पाटन के बीच’ शेतकऱ्यांचे अवघे जिणे भरडून निघत आहे. कुठलीच राजकीय सत्ता शेतकऱ्यांना यातून अंतिम मुक्ती देणार नाही, हे जोपर्यंत शेतकरी स्वतः मान्य करत नाही, तोपर्यंत त्याचा अभ्युदय होणे नाही.  सत्तेकडून वापरला जाणार नाही, आणि सत्तेचा विधायक वापर केल्याशिवाय राहणार नाही. हे जितक्या लवकर शेतकऱ्याला जमेल, उमजेल तितक्या लवकर त्याच्या आयुष्यात दिवाळी येईल. दिवाळीचा खरा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात... मी अविवेकाची काजळी।  फेडून विवेकदीप उजळी।  तै योगिया पाहे दिवाळी।  निरंतर।। दिवाळी म्हणजे जसे दिवे पेटविणे असते, तसे पेटलेल्या दिव्यांवर आलेली काजळी झटकणे म्हणजेसुद्धा दिवाळी असते. आपण फक्त दिवे लावण्याला (?) दिवाळी म्हणतो. दिवे विझू न देणे, विझलेले दिवे पुन्हा उजळणे, आणि दिव्यांवरची काजळी झटकणे म्हणजे दिवाळी असते.  आपण जर संपन्न असू तर आपल्या अवतीभवतीच्या अभावग्रस्त माणसांच्या आयुष्यात आपण उमेदीचे दिवे पेटवू शकतो का? शब्दांइतकीच आपण त्यांना थेट मदत करू शकतो का? कुणा अभावग्रस्ताच्या मनावर आलेली निराशेची काजळी झटकू शकतो का? आपल्या इवल्या इवल्या परिप्रेक्षात आपण हे करू शकत असू तर ती यथार्थ दिवाळी असेल. अन्यथा, आपल्या ऐश्‍वर्याचा, अहंकाराचा, उजेड हा इतरांच्या मनात न्यूनत्वाचा गहन अंधार पेरणारा ठरू शकतो. दिवाळीच्या संदर्भात ‘बस इतकेच करूयात’ या शीर्षकाची माझी एक कविता आहे.  आपल्या उत्सवी उत्साहाने  कुणी निरुत्साही होणार नाही. आपल्या फटाक्यांनी कुणाचे हळवे मन फाटणार नाही आपल्या देखण्या फराळाने  कुणी भुकेला शाप देणार नाही आपल्या उंची कपड्यांनी  कुणाला आपली कातडी उघडी पडल्याचा  जीवघेणा जाच होणार नाही आपल्या प्रकाशाने कुणाच्या अंतःकरणात  न्यूनत्वाचा अंधार दाटणार नाही  याची काळजी घेऊ यात ! यंदाच्या दिवाळीत बस इतकेच करूयात. संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात तसे शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिवाळी हा प्रासंगिक सण न राहता, स्वास्थ्य आणि समृद्धीचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात निरंतर राहो ही शुभेच्छा!

कमलाकर देसले  ९४२१५०७४३४

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com