मेळघाटातील आदिवासी बांधवांची दिवाळी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोरकू महिला सकाळी पाच वाजता उठून घराच्या साफसफाईला सुरुवात करतात. कोरकू जमातीबरोबरच मेळघाटात गोंड (टाटिया) लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. यांचा मुख्य व्यवसाय मेळघाटातील जनावरे चारणे हा आहे. या दोन्ही समाजांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत वैशिष्टपूर्ण आहे. आज आपण मुक्काम चीलाटी, ता. चिखलदरा, जि. अमरावती येथील कोरकू-गोंड जमातीच्या दिवाळी सणाबद्दल जाणून घेऊया.
agrowon editorial article
agrowon editorial article

नुकताच १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजन या दिवशी दिवाळी सण मोठ्या आनंदाने कोरकू बांधवांनी साजरा केला. कोरकू आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत थोडीफार आपल्यासारखी, परंतु वैशिट्यपूर्ण आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिला सकाळी पाच वाजता उठून घराच्या साफसफाईला सुरुवात करतात. कोरकू आपले पूर्ण घर गाईच्या शेणाने सारवून घेतात. ज्या घराला काड्यांचे कुड आहे, तेथेही गाईच्या शेणाने सारवले जाते. ज्या ठिकाणी पक्क्या भिंती आहेत, त्या ठिकाणी रंगासाठी चुना आणि गेरूचा वापर केला जातो. ही कामे कोरकू महिला भगिनी दुपारपर्यंत संपवून घरातील सर्व सदस्यांचे कपडे चादर नदीवर जाऊन धुऊन आणतात. हे असे दुपारी चार वाजेपर्यंत चालते. त्यानंतर महिला भगिनी स्वयंपाकाच्या तयारीला लागतात स्वयंपाकामध्ये भात, पोळी, गोड पुरी, तुरीच्या डाळीचे वरण किंवा दुसऱ्या कोणत्याही डाळीचे वरण करतात. पोळीसोबत दूध-साखर आणि गव्हाचा आटा एकत्र मिसळून लापशीसारखा पदार्थ बनवतात. 

काही पुरुष मंडळी आपल्या गाई-म्हशी-बैल यांना नदीवर नेऊन धुऊन आणतात. ही सगळी कामे दिवस मावळेपर्यंत पूर्ण केली जातात. त्यानंतर अंधार पडताना घरातील प्रमुख व्यक्ती जसे आई, वडील किंवा आजी, आजोबा आदी घरात असलेल्या गाईंची पूजा करतात. नंतर बैलाची पूजा केली जाते. घरातील महिला आरती ओवाळतात. पुरुषांच्या हातात तांदळाची खिचडी ठेवलेली सुपडी असते. महिला गोमातेची आणि लक्ष्मी मातेची मनात नाव घेऊन आरती करतात. गाय-बैलांना कुंकू लाऊन दोन्ही पायांजवळ गव्हाच्या पिठाचा दिवा लाऊन पूजा करतात.

गौमातेच्या पायांजवळ डोके ठेवून नमस्कार करतात. पशुधनाची पूजा आटोपल्यानंतर पुरुष मंडळी सुपडात ठेवलेली खिचडी थोडी थोडी गाय, म्हैस, बैल यांना खायला देतात. सर्व जण आपापल्या पशुधनाजवळ फटाके फोडतात. फटाके फोडणे झाल्यानंतर घरात ठेवलेल्या लक्ष्मी मातेचा फोटो आणि इतर देवदेवतांची पूजा केली जाते. घरात मांस-मटण सोडून बनविलेले सर्व पदार्थ देवाजवळ नैवद्य म्हणून थोडे थोडे ठेवतात. नंतर गाई-बैलांना पूजेच्या वेळी दिलेली खिचडी तिथे उपस्थित असलेल्या बांधवाना प्रसाद म्हणून वाटतात. सर्वांत आधी हा प्रसाद मुलींना देतात. मग पुरुष वर्गाला हा प्रसाद वाटतात. त्यांनी बनविलेले जेवण घरात बसून सर्व जण करतात. 

कोरकू जमातीबरोबरच मेळघाटात गोंड (टाटिया) लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. यांचा मुख्य व्यवसाय मेळघाटातील जनावरे चारणे हा आहे. यासाठी त्यांना मेळघाटात प्रत्येक गावात मोबदला दिला जातो. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर हे टाटिया जे जनावरे संभाळतात, त्या प्रत्येक घरी ढोलकी आणि बासरी वाजवून, नाचून जनावरांना खिचडी खाऊ घालतात. हे पूर्ण झाल्यावर गोंड (टाटिया) आपल्या घरी जातात. परत तयारी करून आपण सांभाळत असलेल्या जनावरांच्या मालकाच्या घरी जाऊन रात्रभर ढोलकी आणि बासरीच्या तालावर नाचतात. त्यानंतर गावातील जे जनावरांचे मालक आहेत ते या गोंड (टाटिया) यांना पंधरा, वीस किलो ज्वारी, मका, गहू किंवा धान देतात. 

लक्ष्मीपूजनानंतरच्या दुसऱ्या दिवशी मेळघाटातील सर्व लोक सकाळी उठून बैलांना दोरी (वेसण), खाटी (नवीन गळ्यातील दोरी) नवीन घालतात. आपल्याकडील पोळा सणासारखे सर्व बैलांना सजवून फटाके वाजवून गावात पळवतात. काही जण लहान लहान वासरांना घेऊन गावात पळवतात. नंतर एका ठिकाणी सर्व जनावरांना गोळा करून पूजा केली जाते. हे झाल्यावर गोंड (टाटिया) आणि गावातील जनावरांचे मालक यांची बैठक होते. या बैठकीत जनावर चराईची रक्कम ठरविली जाते. त्यानंतर पाच दिवसांच्या सुट्टीचे नियोजन केले जाते. पाच दिवसांच्या आत कुठे न कुठे अशा प्रकारची यात्रा भरते. या ठिकाणी हा गोंड समाज जाऊन नाचगाणे करतो आणि दुकानदार जे देईल ते घेतो. परत सहाव्या दिवशी आपल्या गावातील जनावरे चरण्यासाठी घेऊन जातो. जनावरे चारणाऱ्या या गोंड लोकांना ३६५ दिवसांपैकी फक्त पाच दिवस सुट्टी असते. इथे ३६० दिवस तो कामावर असतो. काही जनावर मालक या टाटियांना जनावर संभाळण्यापोटी पैसे आणि जेवण सुद्धा देतात.

दीपक जोशी : ९८५०५०९६९२ (लेखक प्रगतिशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com