नोबेल शांतता पुरस्कारचा असाही एक आनंद

जेमतेम ४३ वर्षे वय असणाऱ्‍या डॉ. अबीय अहमद यांनी एप्रिल २०१८ मध्ये इथिओपियाचे पंतप्रधान पद स्वीकारले. दीड वर्षाच्या कालावधीत अतिशय धाडसी निर्णय घेऊन देशांतर्गत बंडाळी, धार्मिक तेढ थांबवून सीमेवरील इरिट्रिया या चिमुकल्या राष्ट्राशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. लाखो लोकांचे प्राण वाचविले. म्हणून शांततेचा नोबल पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
संपादकीय.
संपादकीय.

इथिओपिया या शेतीप्रधान आफ्रिकन राष्ट्राच्या डॉ. अबीय अहमद अली या पंतप्रधानांना या वर्षीच्या शांतता नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. जेमतेम ४३ वर्षे वय असणाऱ्‍या या व्यक्तीने एप्रिल २०१८ मध्ये देशाचे पंतप्रधान पद स्वीकारले. दीड वर्षाच्या कालावधीत अतिशय धाडसी निर्णय घेऊन देशाच्या अंतर्गत सुरू असलेली बंडाळी, धार्मिक तेढ थांबवून सीमेवरील इरिट्रिया या चिमुकल्या राष्ट्राशी मैत्रीचे संबंध निर्माण करून दोन्ही देशांत शांतता निर्माण केली. लाखो लोकांचे प्राण वाचविले. त्यामध्ये प्रामुख्याने गरीब शेतकरी आणि जंगलावर उपजीविका करणारे अदिवासी यांचा समावेश आहे. म्हणून हा शांततेचा नोबल पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

इथिओपिया हा यादवीने पोखरलेला, लष्कर शहांच्या बेदिलीने त्रस्त, वांशिक तणाव, दुष्काळाने होरपळलेला देश. प्रतिवर्षी शेकडो हजारो बालकांना भुकेच्या वेदनेने कुपोषणाच्या मार्गामधून मृत्यूच्या दरीमध्ये कडेलोट करणारा आफ्रिका खंडामधील क्रमांक दोन वरच्या या देशाची लोकसंख्या ११ कोटी आहे. इरिट्रिया हे पूर्वी याच देशाचे एक संघराज्य मात्र १९९३ ला संघराज्यातून फुटून स्वतंत्र राज्य झाले. इथिओपिया आणि इरिट्रिया या दोन राष्ट्रांत युद्धाला तोंड फुटले. त्यात ८० हजार लोक मरण पावले, किती तरी बेघर झाले. या दोन राष्ट्राच्या सिमेवर ‘बॅडमे’ या शहराच्या मालकीवरून हा वाद सुरू होता. शेतकऱ्यांच्या मालाची फार मोठी बाजारपेठ येथे उपलब्ध आहे. इथिओपियाच्या लष्करी फौजा इरिट्रियाच्या शेतकऱ्यांना येथे प्रवेश करू देत नव्हत्या. बॅडमे शहर आणि त्याच्या आसपासची कॉफी, बीन्स, बटाटा, गहू, बाजरी, ज्वारीची शेती सततच्या युद्धामुळे उद्‍ध्वस्त झाली होती. दोन्हीही राष्ट्रामधील लाखो शेतकरी यात होरपळून निघाले होते. अनेक शे‍तकऱ्यांची मुले इथिओपियात, तर ते स्वत: इरिट्रियात, आई वडिल, वयोवृद्धाची ताटातूट, शेती एका राष्ट्रात, तर शेतकरी दुसऱ्‍या राष्ट्रात अशी शोकांतिका होती. सीमेवर लष्कर असल्यामुळे वाहतूक, दूरध्वनी, बाजारपेठ यांसारखे आपापसांमधील व्यवहार बंद होते. त्यामुळे कुपोषण व आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला होता. इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद यांनी एप्रिल २०१८ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर इरिट्रियाच्या पंतप्रधानांनी मैत्रीचा हात पुढे केला. सर्व प्रथम बॅडमे शहर त्यांना देऊन टाकले. सीमेवरच्या लष्करी चौक्या हलविल्या, वाहतूक बाजारपेठ, दूरध्वनी सुरू केले. या दोन्हीही राष्ट्रात त्यामुळे आनंद उत्सव साजरे झाले. 

इथिओपिया हा उत्कृष्ट कॉफी पिकवणारा देश. कॉफीबरोबरच त्यांच्या इतर शेत उत्पादनाला निर्यातीची मोठी संधी होती. पण या देशाला स्वत:चा समुद्र मार्ग अन् बंदरही नव्हते. या शांती करारामुळे इरिट्रियाची दोन समुद्र बंदरे इथिओपियाच्या शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आणि शेतीमालाची निर्यात जी गेली २० वर्ष अतिदूर अंतरावरून होत होती, ती जवळच्याच ठिकाणी स्वस्तात उपलब्ध झाली. पंतप्रधान पूर्वी सैन्यात असल्यामुळे इथिओपिया आणि इरिट्रिया या देशाच्या सीमेवर युद्धामुळे होरपळलेल्या शेतकऱ्‍यांचे आणि त्यांच्या शेतीचे दृश्‍य त्यांनी स्वत: पाहिले होते. ‘टेफ’ ही एक प्रकारची गवत प्रजाती इथिओपियामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकवितात. या तृणवर्गीय पिकांचे दाणे लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून दिले जातात. युद्धामधील बाँबहल्ल्यात हे गवतवर्गीय पीक सहजपणे जळून जात असे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांची हजारो बालके अन्नावाचून उपाशी राहत. शांतता करारामुळे या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या हजारो हेक्टर क्षेत्रावर हे गवत आता फुलले आहे. सोबत बालकांच्या चेहऱ्‍यावरील हास्यसुद्धा.

पंतप्रधान होण्यापूर्वी डॉ अबीय यांनी इथिओपियामधील प्रमुख स्थानिक आदिवासींच्या शेतजमिनी लॅन्ड माफियांच्या तावडीतून सोडविल्या. या आदिवासींचे होणारे स्थालांतर तसेच त्यांची उपसमार थांबविली. अदिस अब्बाबा हे इथिओपियाचे राजधानीचे शहर. शहरासभोवती जंगल आणि हजारो हेक्टरवर भाजीपाल्याचे मळे हे या शहराचे सौदर्य मी दोन वेळा पाहिले होते. शहराचा बाहेर विकास होऊ लागला आणि विकसकांनी या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन त्याजागी टोलेजंग इमारती उभारणे सुरू केले.

डॉ. अबीय यांनी खासदार या नात्याने या राजधानीच्या शहरात शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन उभे करून धनदांडग्यांना जमिनी परत करावयास लावल्या. शांततेने चाललेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पूर्वीचे २८ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ २० वर आणले. त्यामध्ये दहा महिलांना बरोबरीचे स्थान दिले. केंद्रीय मंत्रिमंडळात ५० टक्के महिला प्रतिनिधित्व असणारा पृथ्वीच्या पाठीवर हा एकमेव देश आहे. यामध्ये सुद्धा शेतकऱ्यां‍ना महत्त्वाचे स्थान आहे हे विशेष! 

शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी स्वत: शेतकरी असावयास हवेच असे नाही, फक्त तुमचे मन त्यांच्यासाठी संवेदनशील हवे. मुस्लिम धर्म उपासक आणि ख्रिश्‍चन आईच्या पोटी जन्मलेले अबीय अहमद स्वत: शेतकरी नसले, तरी त्यांनी इथिओपियामधील गरीब आदिवासी शेतकऱ्यांची पिळवणूक जवळून पाहिली, अनुभवली. या शांततेच्या प्रयत्नात राष्ट्रामधील नागरिकाबरोबर येथील शेतकरीसुद्धा कसा आनंदी राहील यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. म्हणूनच पंतप्रधान डॉ. अबीय यांना मिळालेल्या या वर्षीचे शांतता नोबेल पुरस्काराकडे मी इथिओपियामधील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांच्या चेहऱ्‍यावर फुललेला हास्यातून एक सुखद आनंद अनुभवत आहे.

डॉ. नागेश टेकाळे  : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com