मज चंद्र हवा

डॉ. के. सिवन यांच्यावर माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रभाव होता. म्हणूनच ते १९८२ मध्ये इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. इस्त्रोने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी एकाच रॉकेटच्या साहाय्याने १०४ उपग्रह अवकाशात सोडले होते. त्यामध्ये डॉ. सिवन यांचा फार मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना ‘रॉकेट मॅन’ म्हणूनही ओळखले जाते.
संपादकीय.
संपादकीय.

स्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १ वाजून ५० मिनिटे आणि त्यानंतरचा चंद्राच्या पृष्ठाभागापासून ३३५ मीटर उंचीवरचा, २९ सेकंदाचा थरार. प्रत्येक सेकंद हृदयाच्या ठोक्यासारखा, शास्त्रज्ञांचे लक्ष भल्या मोठ्या स्क्रीनवरच्या हळूहळू पुढे सरकणाऱ्या हिरव्या ठिपक्याकडे. चांद्रयान-२ चा २२ जुलैपासूनचा हा ४७ दिवसांचा चार लाख किमी लांबीचा अचूक प्रवास चंद्राच्या शीतल मातीला स्पर्श करण्यास आतूर झाला होता. क्षणार्धात तो हिरवा ठिपका अदृश्य झाला आणि शेकडो वैज्ञानिकांच्या काळजाचा ठोका चुकला. ९५ टक्के यशाला ५ टक्क्याचे अपयश भारतीय शास्त्रज्ञांना खूप काही शिकवून गेले.

शेतकऱ्‍याने उत्कृष्टपणे जमीन तयार करावी, जातिवंत बियाणे निवडावे, १०० टक्के उगवण, पिकाची निरोगी वाढ, वेळेवर पडलेला पाऊस तसेच योग्यवेळी दिलेले आणि पिकाला मानवलेले खतपाणी, पीक फुलोऱ्‍यामधून काढणीला आले आणि मध्यरात्री अचानक आलेल्या टोळधाडीने ते सर्व उद्‌ध्वस्त झाले हे पाहून शेतकऱ्याची झालेली अवस्था मला इस्त्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांच्या बाबतीत अनुभवण्यास मिळाली. फरक एवढाच होता की त्यांचे अश्रू थांबविण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांचा खांदा आणि पाठीवर विश्वासाचा हात होता. पिकाचा ओठापर्यंत आलेला घास काढून घेणे, उद्ध्वस्त पीक कोरड्या डोळ्यांनी काढून टाकावयाचे आणि पुन्हा नव्याने सुरवात करावयाची हे शेतकऱ्यांसाठी नवीन नाही.

डॉ. सिवन या धक्क्यामधून सावरत आहेत. राष्ट्राची क्षमा मागताना त्यांचे डोळे पुसण्यासाठी कोट्यवधी हात पुढे आले आणि पुन्हा चांद्रयानाच्या प्रयोगासाठी इस्त्रो सज्ज झाली आहे. संपर्क तुटला पण संकल्प तुटला नाही, हे विधान बरेच काही सांगून जाते. हे सर्व एका कष्टाळू शेतकऱ्याच्या आदर्शामधून साध्य झाले आहे. डॉ. सिवन हे एका गरीब शेतकऱ्‍याचे पुत्र आहेत. कन्याकुमारी जवळच्या एका लहान खेड्यात राहणाऱ्‍या त्यांच्या पित्याच्या शेतीमध्ये नेहमीच अपयशाचे चढउतार असत. नकोच ती शेती असे म्हणून त्यांच्या वडलांनी दुसरा व्यवसाय निवडला असता तर असा भारतमातेचा सुपुत्र त्यांना तयार करता आला असता का?

इस्त्रोची चांद्रयान-२ मोहीम पूर्णत्वास गेली नाही याची हुरहूर प्रत्येक भारतीयांच्या मनात, हदयात आहे. इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. सिवन जेव्हा पंतप्रधानांना निरोप देत होते तेव्हा त्यांना रडू कोसळले. या शेतकऱ्‍याच्या मुलाला लहानपणापासून फक्त कष्ट आणि गरिबीच माहीत होती. नुकसानीत जात असलेल्या शेतीसाठी वडलांनी त्यांना अश्रूपर्यंत कधीच पोचू दिले नव्हते. जमिनीचा एक तुकडा विकून त्यांना शिकविले. कठोर मेहनत आणि दृढ निश्चयाच्या बळावर ते एवढ्या मोठ्या पदावर पोचले. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण गावामधील सरकारी शाळेत तमीळ माध्यमात झाले. शिक्षण सुरू असताना दररोज ते शेतावर जाऊन वडलांना मदत करत आणि याच करता शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी गावाजवळच्या विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दोन वेळचे जेवण आणि घर चालविण्यासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून त्यांचे वडील उन्हाळयात आंबे विक्रीचा व्यवसाय करत. डॉ. सिवन त्यांना बागेमधील आंबे तोडून बाजारात आणून देत. वडलांकडून त्यांना प्रत्येक पाटीमागे एक रुपया बक्षीस मिळत असे. ते पैसे एकत्र साठवून त्यांनी त्यांच्या कॉलेजची फीस भरली होती.

लहानपणापासून अत्यंत हुशार असलेले सिवन गणितामध्ये नेहमीच १०० टक्के गुण मिळवत. गरिबीमुळे त्यांना शाळेत जाताना पायात घालावयास चप्पलसुद्धा नव्हती. असेच एकदा कॉलेजच्या परीक्षेत त्यांना पूर्ण मार्क्स मिळाले म्हणून त्यांचा सत्कार झाला. त्या वेळी मिळालेल्या पैशामधून त्यांनी एक चप्पल विकत घेतली होती. शाळा, कॉलेजमध्ये असताना ते नेहमी धोतर कुडताच घालत असत. जेव्हा त्यांना मद्रास आयआयटीमध्ये हवाई अभियांत्रिकी विषयास प्रवेश मिळाला तेव्हा त्यांनी प्रथमच पँट आणि शर्ट घातला होता. सर्व शिक्षण शिष्यवृत्तीवर पूर्ण करणाऱ्‍या या शेतकऱ्‍याच्या मुलाला वडलांचा शेतामधील गणवेशच जास्त प्रिय होता. १९८० मध्ये आयआयटी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचा आनंद त्यांनी वडलांबरोबर शेतात साजरा केला होता.

१९८२ मध्ये त्यांनी बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेमधून अंतराळ विज्ञानात एम. टेक ही पदवी प्राप्त करून त्याच विषयात २००६ मध्ये मुंबई आयआयटीची डॉक्टरेट पदवीसुद्धा मिळविली. डॉ. सिवन यांच्यावर माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रभाव होता. म्हणूनच ते १९८२ मध्ये इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. त्यांनी अनेक उपग्रह मोहिमेत सहभाग घेतला. इस्त्रोने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी एकाच रॉकेटच्या साहाय्याने १०४ उपग्रह अवकाशात सोडले होते. त्यामध्ये डॉ. सिवन यांचा फार मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना ‘रॉकेट मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. 

इस्त्रो म्हणजे फक्त चांद्रयान मोहिमा नव्हे, तर या संशोधन संस्थेने भारतीय शेती आणि ती कसणऱ्‍या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आतापर्यंत फार मोठे योगदान दिले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात देशामध्ये भात, गहू, ज्वारी, मका, कापूस, ज्युट, ऊस, मोहरी या मुख्य पिकांचे मोठे उत्पादन होते. या पिकांचे किती उत्पादन होणार, त्यांना साठवून ठेवण्यासाठी लागणारी गोदामे, त्यांचा हमीभाव, खरेदी या बद्दलचे निर्णय केंद्र सरकारचा कृषी विभाग घेत असतो. यासाठी इस्त्रोने उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला जातो. एवढेच काय पण जंगल, जमिनीची अवस्था, पीकविमा योजना व त्यासंबंधीचे शासनाचे धोरण, हवामानाचा अंदाज, मॉन्सूनचा पडणारा पाऊस, दुष्काळ आणि यानुसार शासनाचे निर्णय या सर्वांचा इस्त्रो व उपग्रहाशी आणि त्याने पाठविलेल्या छायाचित्रांबरोबरच तज्ज्ञाकडून त्याचा अभ्यासाचा जवळून संबंध आहे. शेतकऱ्यांची ही सर्व सेवा इस्त्रो ही संस्था डॉ. सिवन यांच्या अध्यक्षतेखाली दिवस रात्र करत असते. 

रामायणामधील एक बोधकथा आठवते. रांगणाऱ्‍या श्रीरामाने चंद्र हवा म्हणून हट्ठ धरला, त्याचे त्यासाठी रडणे थांबत नव्हते. शेवटी कौशल्यामातेने दुधाच्या वाटीत आकाशामधील चंद्र प्रतिमेच्या माध्यमातून पकडून श्रीरामाला दिला. बालहट्ट पूर्ण झाला. चंद्राची हिच भासमान प्रतिमा डॉ. सिवन विज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष धरण्याचा प्रयत्न करत होते. आज त्यांना अपयश आले आहे पण ज्या शेतकऱ्‍याच्या मुलाच्या मागे अवघे राष्ट्र उभे राहते त्याला अशक्य असे काहीही नाही. मला खात्री आहे हा शास्त्रज्ञ एक दिवस चांद्रयानाच्या साहाय्याने चंद्र जिंकल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com