तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा

भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख या महान व्यक्तिमत्त्वाने हिमालयाच्या उंचीचे कार्य करून ठेवले आहे. त्यांची दूरदृष्टी वर्तमानाचे वास्तव जाणून घेणारी आणि भविष्याचा वेध घेणारी होती, याची जाणीव आपल्याला होते. निश्चित ध्येयाने प्रेरित झालेले ते व्यक्तिमत्त्व होते. आज त्यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश....
agrowon editorial article
agrowon editorial article

डॉ. पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक म्हणून महाराष्ट्रात नव्हे; तर संपूर्ण भारतात नावाजलेले एक मोठे नाव आणि शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थानांच्या माध्यमातून आज दिसत आहे. पण, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते, अस्पृश्य, गरीब व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी झटणारे नेते म्हणूनही ते ओळखले जातात. भाऊसाहेबांचा जन्म वडील श्‍यामराव व आई राधाबाई यांच्या पोटी २७ डिसेंबर १८९८ या दिवशी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी त्यांचे बालपणीचे शिक्षण आणि मॅट्रिकही ते तेथेच उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. पण, पदवी घेण्यापूर्वीच त्यांना शिक्षणासाठी इंग्लडला जायची संधी मिळाली. परदेशातच त्यांनी एम.ए., एम.फिल, पीएच.डी. अशा उच्च शिक्षणासह ‘बार अॅट लॉ’ची पदवीही मिळवली.

जातिभेद पुरा, सेवाभाव धरा ‘‘तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा, तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा...’’ या ओळीप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करता येईल. भाऊसाहेबांनी १९५५ ला ‘भारत कृषक समाज’ची स्थापना करून त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली. विदर्भात खऱ्या अर्थाने सहकारी चळवळ चालवण्याचे श्रेय हे भाऊसाहेबांनाच दिले जाते. १९५६ ला अखिल भारतीय दलित संघाची स्थापना करून ‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ हा महत्त्वाचा नारा त्यांनी दिला. १८ ऑगस्ट १९२८ ला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेत सर्वांत आधी अमरावतीत अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह करणारे विदर्भातील एकमेव समाजसुधारक म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख हेच आहेत. १९३० ला प्रांतिक कायदेमंडळावर निवड होऊन शिक्षण, कृषी आणि सहकार या तीनही महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळून तीनही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे भारताचे केंद्रीय मंत्री म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख. १९५२ ते १९६२ मध्ये भाऊसाहेब भारताचे प्रथम केंद्रीय कृषिमंत्री होते. 

कास्तकार शिकला पाहिजे भाऊसाहेबांनी त्यांच्या संस्थेची उभारणीच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केली. त्यांचे स्वप्न होते, की कास्तकार शिकला पाहिजे. त्यांच्या प्रयत्नाने शिक्षण खेड्यापर्यंत पोचले. शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षित झाली आणि होत आहेत. आज आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जी साक्षरता आपल्याला पाहावयास मिळते त्याची मुळे डॉ. पंजाबराव देशमुखांच्या कृतीत रुजलेली आहेत. शेतकरी व्यवसायात व्यापारात फार उंचीवर पोचला नसला, तरीदेखील लहान, मोठे व्यापार करण्याची तो हिंमत करताना दिसतो आहे. शेतकरी गावाच्या आर्थिक विकासात सहभागी झाला आहे. कृषी महाविद्यालयाचे आणि कृषी विद्यापीठांचे संशोधन गाव खेड्यांपर्यंत पोचते आहे. त्या संशोधनातून शेतकरी नवनवे प्रयोग करण्यास पुढाकार घेताना दिसतो आहे. अधिक उत्पादनाकरता शेतकरी बांधव नवनव्या तंत्रज्ञानाचा आणि बियाण्यांचा उपयोग करताहेत. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची सेवासुविधा ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

नागरिकत्वाबाबत भाऊसाहेबांचे मत नुकतेच काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये नागरिकत्व बिल पास झाले आहे. त्यातून देशभर आंदोलन पेटले आहे. त्या नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदीविषयीची भाऊसाहेबांची मते अशी आहेत. १) ज्या दिवशी संविधान अमलात येईल त्या दिवशी भारताचे अधिवासी (डोमिसाइल) असलेल्या आणि भारतात जन्मलेल्या व्यक्ती भारतीय प्रजासत्ताकचे नागरिक बनतील. २) भारतात ज्यांचा जन्म झाला; पण ज्या व्यक्ती अनेक वर्षांपासून येथील अधिवासी आहेत, अशा व्यक्तींना मग त्या भारतातील पोर्तुगीजांच्या किंवा फ्रेंचाच्या वसाहतीत राहणाऱ्या असोत, अगर भारताबाहेर जन्मलेले; किंवा अनेक वर्षे भारताचे रहिवासी असलेले इराणी असोत, त्यांना भारतीय नागरिक होता येईल. ३) भारताचे रहिवासी असूनही फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींना किंवा पाकिस्तानात राहणाऱ्या; पण फाळणीनंतर भारतात आलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिक होता येईल. ४) ज्या व्यक्तींचा किंवा त्यांच्या माता-पित्यांचा जन्म भारतात झाला असेल; पण ज्यांचे वास्तव्य परदेशांमध्ये असेल त्यांनाही भारतीय नागरिकत्व दिले जाईल. 

भारताचे नागरिकत्व इतके स्वस्त नको नागरिकत्वाबाबतच्या तत्कालीन सुधारित कलमांवर भाऊसाहेबांनी टीका केली होती. ते म्हणाले, ‘नव्या पाचव्या कलमानुसार व्यक्तीच्या अधिवासाला प्रथम स्थान देण्यात आले आहे. अधिवासी व्यक्ती भारतात जन्मलेली असली, तरी पुरेसे आहे. तिच्या माता-पित्याशी असलेला संबंध महत्त्वाचा नाही, एखादे परदेशी दांपत्य विमानाने प्रवास करीत असेल आणि ते विमान काही तासांसाठी मुंबई विमानतळावर थांबलेले असताना, त्या दांपत्यांपैकी गरोदर महिला विमानातच प्रसूत होऊन तिने अपत्याला जन्म दिला, तर केवळ जन्म भारतात झाल्यामुळे ते अपत्य भारताचे नागरिक बनेल. भारताचे नागरिकत्व इतक्या स्वस्तात व सहजासहजी मिळेल अशी तरतूद करू नये.’ सामान्यत: किमान पाच वर्षे भारतात राहिलेल्या व्यक्तीस नागरिकत्व देण्याची तरतूद भाऊसाहेबांना आवडली नव्हती. अशा व्यक्तीच्या माता-पित्याचे राष्ट्रीयत्व किंवा त्यांचा देश कोणता याचा जसा उल्लेख कलमात नव्हता, तसाच कोणत्या हेतूने पाच वर्षे व्यक्ती भारतात राहत होती याची सखोल चौकशी करण्याची भाऊसाहेबांना गरज वाटत होती. भारताच्या स्वातंत्र्याला घातपात करण्याच्या उद्देशाने हेरगिरीसारख्या कारवाया करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती भारतात राहण्याची शक्यता पंजाबरावांनी बोलून दाखवली. म्हणून त्यांनी पाच वर्षांच्या वास्तव्याच्या अटीऐवजी किमान बारा वर्षांच्या वास्तव्याची अट असावी असे सुचवले व अन्य कोणत्याही देशाचा नागरिक नसलेल्या प्रत्येक हिंदूला व शिखाला भारतीय नागरिकत्व हक्काने मिळाले पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला.  शिक्षणा व्यतिरिक्त कृषी आणि सहकार क्षेत्रातदेखील भाऊसाहेबांनी क्रांती घडवून आणली होती. त्यामुळे गाडगे बाबांच्या हृदयात त्यांच्याविषयी अपार प्रेम होते. शिक्षणाचे मूल्य समजण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वांची आवश्यकता आहे.

स्वप्नील साखऱे ः ९४२०२४५०४५ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com