ठिबक संच वितरक व्हावेत शेतकरी मित्र

खऱ्या अर्थाने शेतात विविध पिकांमध्ये ठिबक सिंचन यशस्वी होऊन जास्तीत जास्त कालावधीसाठी त्याचा शेतकऱ्यांना लाभ व्हावयाचा असेल, तर ठिबक सिंचन वितरकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
संपादकीय
संपादकीय

महाराष्ट्र राज्यातील ३०८ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी २४० लाख हेक्टर क्षेत्र पीक लागवडीखाली असून, यापैकी फक्त १८ टक्के क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील सध्याच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीचा विचार करता उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा व पाण्याबरोबरच दिल्या जाणाऱ्या अन्नद्रव्यांचा अतिशय कार्यक्षमपणे वापर होऊन पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. केंद्र व राज्य शासन सर्वच पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब वाढविण्याबाबत आग्रही असून, शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. फक्त अनुदान मिळते म्हणून नव्हे तर ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा पाणी बचतीबरोबरच उत्पादनवाढीचे प्रभावी साधन म्हणून वापर होणे ही काळाची गरज आहे. 

राज्यामध्ये सर्वच ठिबक सिंचन उत्पादक विभागनिहाय नेमलेल्या वितरकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचा पुरवठा करतात. वितरक शेतकऱ्यांच्या शेतावर विविध पिकांमध्ये ठिबक संचाची उभारणी करतात व त्यांना विक्रीपश्चात सेवा पुरवितात. शेतकरीवर्ग हा ठिबक सिंचन खरेदी, त्याची उभारणी, तांत्रिक मार्गदर्शन, पिकांना ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाचे पाणी व खते, ठिबक सिंचनाची निगा व देखभाल या सर्वच बाबींसाठी संपूर्णपणे ठिबक सिंचन वितरकावर अवलंबून असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतात विविध पिकांमध्ये ठिबक सिंचन यशस्वी होऊन जास्तीत जास्त कालावधीसाठी त्याचा शेतकऱ्यांना लाभ व्हावयाचा असेल, तर ठिबक सिंचन वितरकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच ठिबक सिंचन वितरक खरे शेतकरी मित्र व राज्यातील शेतीच्या उत्पादन वाढ कार्यक्रमातील मुख्य दूत व्हावेत.  ठिबक सिंचन यशस्वी करण्यासाठी वितरकांनी खालील बाबींवर प्रामुख्याने भर देणे गरजेचे आहे.  ठिबक सिंचन क्षेत्राचे सर्वेक्षण ः ज्याही शेतकऱ्याला ठिबक सिंचन करावयाचे आहे त्याच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन त्या क्षेत्राचे जीपीएसद्वारे सर्वेक्षण करून त्याच्याकडे असणारे पाण्याचे साधन, पाणी उचलण्यासाठीच्या पंपाची संपूर्ण तांत्रिक माहिती (अश्वशक्ती, दाब व प्रवाह क्षमता), उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असणारे पाणी, त्याला कोणते पीक, कोणत्या हंगामात व किती अंतरावर घ्यावयाचे आहे, याबाबत तपशीलवार माहिती घ्यावी.

योग्य आराखडा/डिझाइन ः शेत, जमिनीचा प्रकार, पीक व उपलब्ध पाणी, पाण्याची गुणवत्ता, पिकाची पाण्याची उच्चतम गरज लक्षात घेऊन अचूक व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असा आराखडा तयार करावा. क्षेत्र मोठे असेल तर वितरकाने योग्य डिझाइन कंपनीच्या तज्ज्ञ अभियंत्याकडून करून घ्यावे.  योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड ः सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध माहिती, जमीन, पाणी व पीकपद्धती आणि प्रामुख्याने शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन योग्य अशा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचन साहित्यामध्ये वापरले जाणारे सर्वच घटक आयएसआय प्रमाणित असावेत. गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड स्वीकारू नये, कारण त्यावरच सिस्टिमचे आयुष्यमान व शेतातील कामगिरी अवलंबून असते. 

कृषी विद्याविषयक मार्गदर्शन ः ठिबक सिंचन तज्ज्ञांच्या मदतीने शेतकऱ्याला पिकांच्या निवडीपासून संपूर्ण लागवड मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. यात जमिनीच्या मशागतीपासून पीक निघेपर्यंतच्या संपूर्ण कृषिविद्या विधींचा समावेश असावा. महत्त्वाचे म्हणजे पीकवाढीच्या अवस्थेनुसार व हंगामनिहाय वातावरणातील बाष्पीभवनाप्रमाणे व पीक गुणांकानुसार प्रत्येक शेतकऱ्याला ठिबक सिंचनाद्वारे दररोज द्यावयाच्या पाण्याचे वेळापत्रक तयार करून देणे महत्त्वाचे आहे. खत नियोजन हा उत्पादनवाढीतील महत्त्वाचा घटक असल्याने शेतकऱ्याला ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचेही वेळापत्रक तज्ज्ञांच्या मदतीने तयार करून द्यावे. सिंचन व खत वेळापत्रक हे प्रत्येक ठिबक बसविणाऱ्या शेतकऱ्यास मिळालेच पाहिजे. 

विक्रीपश्चात सेवा ः बहुतांश शेतकऱ्यांना ठिबक सिंचन चालविणे, त्यतून खते देणे, त्याची देखभाल व निगा ठेवणे याबाबत पुरेशी माहिती नसते. यासाठी ते वितरकावरच अवलंबून असतात. वितरकांनी ठिबक खरेदी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ठिबक सिंचन प्रणाली शास्त्रीयदृष्ट्या कशी चालवावी, पीकनिहाय किती पाणी द्यावे, खते कोणती, कधी व किती प्रमाणात द्यावीत, तसेच ठिबक सिंचनाची निगा कशी राखावी याबद्दल प्रशिक्षण देणे जरुरीचे आहे. गाळण यंत्रणा साफ करण्यापासून व्हेंचुरीच्याद्वारे खते कशी द्यावीत याबद्दल तपशीलवार मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. यासाठी ते कंपनीचे अभियंते व ठिबक सिंचन तज्ज्ञ यांची मदत घेऊ शकतात. राज्यातील ठिबक सिंचनाखालचे वाढत असलेले क्षेत्र विचारात घेता विभागनिहाय ठिबक निगा व देखभाल दुरुस्तीसाठी सेवा केंद्रेही उभी राहिल्यास शेतकरी आवश्यक ती फी भरून तत्काळ सेवा उपलब्ध करून घेऊ शकतात. 

शेतकऱ्यांशी संबंध प्रस्थापित करणे ः वितरक हे त्या त्या भागातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांचा पूर्ण परिचय असतो तरी त्यांनी सतत त्यांचेशी संपर्क ठेऊन, त्यांना आवश्यक व त्यांच्या गरजेप्रमाणे मार्गदर्शन करून चांगले कायमस्वरूपी संबंध प्रस्थापित केल्यास त्यांना त्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन ठिबक बसविणारे शेतकरी मिळू शकतात. 

ठिबक सिंचन तसा तांत्रिक विषय असल्याने कंपनीने वितरक नेमताना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत एवढेच न पाहता त्यांना अपेक्षित ज्ञान आहे व आवश्यक ते ठिबक संचांचे तांत्रिक व कृषिविद्याविषयक प्रशिक्षण देऊनच नेमणूक करावी. शक्यतो कृषी अभियंते, कृषी पदवी अथवा पदविकाधारक यांना प्राधान्य द्यावे.  ठिबक सिंचन व्यवसाय हा वितरकांच्या मार्फत होत असल्याने वितरक हा एक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून, खरा मित्र होऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंभीरपणे उभे राहायला हवे. फारच अधिकची तांत्रिक माहिती अथवा मार्गदर्शन हवे असल्यास ठिबक सिंचन उत्पादक कंपनीचे सर्व अधिकारी त्यांना पाठिंबा देण्यास तत्पर असतातच. सध्या स्वयंचलित ठिंबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापरही शेतकरी करू राहिले आहेत. त्यामाध्यमातून उपसा जल सिंचन योजना स्वयंचलित ठिबक मध्ये येऊ लागल्या आहेत. यातून सर्व लाभधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पीकनिहाय समान पाणीवाटप उत्तमपणे करता येते. उदाहरणादाखल महादेव पाणीपुरवठा संस्था, गोटखिंडी, तालुका वाळवा जिल्हा सांगली व डॉ. जी. डी. बापू लाड क्रांती पाणीपुरवठा संस्था, बांबवडे, तालुका पलूस जिल्हा सांगली यांचा उल्लेख करता येईल. तरी उपसा जल सिंचन योजना ठिबकखाली आणण्यासाठीही वितरकांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सेवा पुरविणे अपेक्षित आहे. 

या सर्व परिस्थितीत ठिबक सिंचन संच वितरक ठिबक तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रचार व अंमलबजावणी करणारा महत्त्वाचा घटक आहे. आपल्याच भागातील शेतकरी हा घराजवळचा माणूस व खरा मित्र म्हणून यापुढच्या काळात त्याला उतमोत्तम ठिबक सिंचन साहित्य पुरवून योग्य ते मार्गदर्शन देत राहिल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्याच्या शेतात व गावातच सुटतील आणि त्यातून ठिबक सिंचन वितरक व शेतकऱ्यांचे नाते अधिकच दृढ होऊन शेती विकासात व उत्पादनवाढीत मोलाची भर पडेल. राज्य व देश कृषी विकासात झपाट्याने प्रगतिपथावर येईल, यात शंकाच नाही. 

अरुण देशमुख : ९५४५४५६९०२ (लेखक ठिबक सिंचन तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com