जलसाक्षरतेतून करूया दुष्काळावर मात

आजच्या दुष्काळाचे स्वरूप लक्षात घेता तो प्रामुख्याने मानवनिर्मित आहे ही बाब लक्षात येते. त्यामुळे शासन, पाटबंधारे खाते, स्वयंसेवी संघटना आणि शेतकऱ्यांनी एकदिलाने प्रयत्न केले तर आपल्याला या दुष्काळावर सहज मात करता येईल.
संपादकीय
संपादकीय

ओझर परिसरातील २१ गावांमध्ये वाघाड धरणाच्या पाण्याचे विस्तृत प्रमाणावर वाटप सुरू झाल्यावर तेथील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले. तेथील काही उद्यमशील शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत. शेतीला सिंचनाची जोड मिळाली की शेती व शेतकरी यांचा कसा कायापालट होतो हे आपल्याला ओझर परिसरातील परिवर्तनाने दाखविले आहे. सर्वसाधारण वर्षात नव्हे तर अगदी दुष्काळाच्या वर्षातही राज्यातील शेतकऱ्यांना कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यासाठी आणि इतर लोकांना घरगुती वापरासाठी पुरेसे पाणी धरणे व बंधारे यामधून उपलब्ध होईल. परंतु असे होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे हे लक्षात घेऊन पीक रचना निश्‍चित करायला हवी.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील कच्चा दुवा म्हणजे या कामांमुळे भूगर्भात पाण्याचा जो भरणा होतो ते पाणी विहिरी असणारे शेतकरी उपसा करून शेतीसाठी वापरतात. सर्वसाधारणपणे गावामध्ये विहिर असणारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीतील असतात. गावातील नाले खोल व रुंद केल्यामुळे वा जलसंधारणाची कामे केल्यामुळे भूजलाच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या विहिरीत जे जास्तीचे पाणी येते त्यावर मालकी हक्क कोणाचा हा एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आताच्या नवीन योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या विहिरी भरतात त्यातील पाणी हे विहिरीचा मालक असणाऱ्या शेतकऱ्याचे मानले जाते. स्वाभाविक असा शेतकरी आपल्या विहिरीतील पाणी वापरुन पाण्याची अधिक गरज असणारी ऊस व केळी यांसारखी पिके घेण्यास प्रवृत्त होताना दिसतात. आदर्श गाव योजना किंवा तत्सम काही योजनांद्वारे जी जलसंधारणाची कामे झाली त्या गावांमध्ये विहीर खासगी मालकीच्या असल्या तरी त्यात आलेले पाणी सर्वांच्या जलसंधारण कार्यक्रमामुळे आले आहे, हे वास्तव मान्य करून ते पाणी सर्वांच्या मालकीचे आहे असे मानले जाते. त्यामुळे अशा गावातील एका खासगी विहिरीवर आठ दहा शेतकऱ्यांची शिवारे भिजतात.

राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, कडवंची, जांभरुण महाली, साखर अशा गावांमध्ये एका विहिरीचे पाणी शेतकरी शेतीसाठी पुरवून पुरवून वापरताना दिसतात. स्वाभाविकच अशा गावांतील शेतकऱ्यांना पाण्याची उधळमाधळ करणारी पिके घेता येत नाहीत. खासगी विहिरीमधील पाण्यावर इतर शेतकऱ्यांचा हक्क मान्य केला आणि विहिरीतील पाणी गावातील बहुतांशी शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळत असले की जलसंधारणांच्या कामाची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी गाव आपल्या शिरावर घेतो. जलसंधारणाची कामे करण्यासाठी सरकार सुरवातीला अनुदान देत असले तरी त्यानंतरच्या काळात देखभाल दुरुस्तीसाठी सरकारकडून एक छदामही अनुदान मिळणार नसल्यामुळे अशा कामांची जबाबदारी गावालाच सामूहिकरीतीने उचलावी लागते. ही जबाबदारी गावाला कळावी आणि गावकऱ्यांनी देखभाल दुरुस्तीच्या कामात सहभागी व्हावे, यासाठी जलसंधारणाचे काम सुरू करण्यापूर्वी लोकजागृतीचे काम करण्यासाठी किमान चार ते पाच वर्षांचा काळ खर्ची पडतो. अशाप्रकारचे लोकजागृतीचे काम शासनासह मृद-जलसंधारणाची कामे केलेल्या संस्थांनी केलेले नाही. 

कामाचे स्वरूप असे बदलले तर अशा कामांपासून दीर्घकाळ लाभ मिळण्याची शक्‍यता आहे. राज्यात दुष्काळ निर्मूलनाचे वा शेती क्षेत्राच्या विकासाचे काम सुरू करायचे असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांची जलसाक्षरता वाढविण्यासाठी काम करायला हवे. या जलसाक्षरतेची पहिली पायरी म्हणजे शेतकऱ्यांना कळले पाहिजे की आपल्या राज्यात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे त्यांनी कमी पाण्यावर घेता येतील अशी ज्वारी, बाजरी, कडधान्ये वा तेलबिया यांसारखी पिके घेण्यावर भर द्यायला हवा. सरकारने अशा पिकांसाठी शेतकऱ्यांना जाहीर केलेला हमीभाव मिळेल याची खातरजमा करायला हवी. अशा पिकांसाठी संरक्षक सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यात सरकार यशस्वी झाले तर अशा पिकांची उत्पादकता दुप्पट होईल. शेतकऱ्यांना अशा पिकांचे इष्टतम उत्पादकता मिळू लागली की अशी पिके लाभदायक ठरतील. तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेरा करू लागलीत. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीक रचनेकडे आकृष्ट करणारी नाही हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राज्याच्या शेती क्षेत्राच्या विकासासाठी आणि दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे असे म्हणता येणार नाही. 

२०१३ मध्ये आम्ही जानेवारी महिन्यात कडवंची गावाला भेट दिली तेव्हा एका शेतकऱ्याने त्याच्या शेततळ्यातील पाणी त्याच्या द्राक्षाच्या बागेला आणि सिमला मिरचीच्या शेतीला मोसमी पाऊस सुरू होईपर्यंत तो कसे वापरणार आहे आणि ते कसे पुरेल हे हिशोब मांडून दाखविले. त्याचप्रमाणे हिवरे बाजार गावातील शेतकरी पावसाळा संपल्यानंतर त्यांच्या विहिरीतील पाण्याच्या साठ्याचा अंदाज घेऊन रब्बी हंगामात पेरा किती क्षेत्रावर करावा आणि पेरा गव्हाचा करावा की ज्वारीचा करावा हे ठरवितात. असे केल्यामुळे पिकासाठी पाणी अपुरे पडून पिकाच्या उत्पादनात घट येत नाही. शासन, स्वयंसेवी संघटना आणि शेतकऱ्यांच्या मित्रांनी शेतकऱ्यांमधील अशी जलसाक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्नशील होण्याची गरज अधोरेखित करायला हवी. राज्यातील दुष्काळ आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात निर्माण झालेली तीव्र टंचाई विचारात घेता राज्यांच्या पाटबंधारे खात्याने या अभूतपूर्व संकटाशी सामना करायला कंबर कसली पाहिजे. राज्यातील धरणे व बंधारे यातील पाणी निगुतीने वापरले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. धरणातून कालव्यात सोडलेल्या पाण्यापैकी केवळ २० ते २५ टक्के पिकांच्या मुळाशी पोचते अशी स्थिती आहे, असे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे सांगतात. पाण्याची अशी गळती थांबवली तर पिकांसाठी आणि घरगुती वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. याच्याच जोडीने शेतकऱ्यांनी भरमसाट पाणी लागणारी पिके घेण्याचा अट्टाहास सोडला तर राज्यातील शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. शेतकरी पाण्याचा निगुतीने वापर करायला शिकले तर दुष्काळाच्या झळा त्यांच्यापर्यंत पोचणार नाहीत. 

थोडक्‍यात आजच्या भीषण परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर शेतकऱ्यांनी उसासारखे पीक घेणे तात्काळ थांबवायला हवे. पाटबंधारे खात्याने कालव्यामधून पाण्याची होणारी गळती लवकरात लवकर थांबवायला हवी. राज्यातील धरणे व बंधारे यातील पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे. शासन, स्वयंसेवी संघटना आणि शेतकऱ्यांचे मित्र यांनी जलसाक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. सरकारने कमी पाण्यावर घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी हमीभाव मिळण्याची खातरजमा करायला हवी. आज पडलेला दुष्काळ आणि घरगुती वापरासाठी पाण्याची निर्माण झालेली टंचाई यांच्याशी मुकाबला करण्यासाठी शासन, पाटबंधारे खाते, स्वयंसेवी संघटना आणि शेतकऱ्यांनी कंबर कसायला हवी. आजच्या दुष्काळाचे स्वरूप लक्षात घेता तो प्रामुख्याने मानवनिर्मित आहे ही बाब लक्षात येते. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केले तर आपल्याला त्यावर सहज मात करता येईल.

रमेश पाध्ये ः ९९६९११३०२९ (लेखक शेतीप्रश्‍नांचे  अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com