निराशेचे ढग होताहेत अधिक गडद

मृग नक्षत्राचा पाऊस बरसत असतानाच नंतर आठ-दहा दिवसांचा पावसाचा खंड आहे, असे स्पष्ट केले असते, तर राज्यात एवढ्या पेरण्या झाल्याच नसत्या. अन् संभाव्य दुबार पेरणीबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली नसती.
संपादकीय
संपादकीय

७  ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस   बरसला. नाला, नदीपात्रे भरून वाहू लागले. पावसामुळे आनंदीत झालेला शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला. कापूस, मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी जोरात सुरू झाली. ११ जूनच्या सायंकाळी शेतामध्ये पेरणीची तयारी करत होतो. या परिसरात राहणारे जाणते व वयोवृद्ध शेतकरी सहज भेटायला आले. पेरणीची तयारी पाहून ते म्हणाले, ‘‘घाई करू नका. आज दुपारपासून वाऱ्याची दिशा बदलली आहे. आभाळ गेले आहे. आता या वाऱ्याची दिशा पुन्हा बदलल्याशिवाय पाऊस येणार नाही.’’ त्यानंतर १३ - १४ जूनला शासनाकडून पेरणीची घाई करू नका, असे आवाहन झाले. जी गोष्ट एका जुन्या जाणत्या शेतकऱ्याला जाणविली ती आमच्या अत्याधुनिक हवामान खात्याला कळायला थोडा उशीरच लागला. 

शेतकऱ्यांना चिंता दुबार पेरणीची यावर्षी मॉन्सून चांगला बरसणार, तो लवकर येणार, अशी भाकीते एप्रिल-मे पासून येत आहेत. नंतर त्यात सुधारणा झाली. मृग लागताच मॉन्सूनचा पाऊस सुरु झाला. कृषी खात्याने सांगितले ६५ मि .मी. पाऊस झाला तर पेरण्या करा. बहुतांश भागात पेरण्या सुरु झाल्या. कापूस, मूग, उडीद, तूर, सोयाबीन पेरण्यांना गती आली. नंतर मात्र ११ जून पासून पाऊस गायब झाला. हवामान खात्याचा अंदाज आला. एक आठवड्यात (२० जूनपासून) परिस्थिती  सुधारेल. नंतर ही तारीख २३ - २४ जून झाली. हवामान खात्याचा ताजा अंदाज आहे, २८ जूनपर्यंत मुंबई - कोकण वगळता पावसाची शक्यता कमी आहे. यापुढे काय होईल, याबद्दल कोणीच सांगत नाही. इकडे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरलेली पिके शेतात कोंब धरून आहेत, तर कुठे दोन-चार पानांवर आहेत. उष्णतामान ३८ अंश ते ४० अंशाला गेले आहे. पिके माना टाकत आहेत. आज एका वृत्तपत्रात हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आपल्या ओंजळीने पिकाला पाणी घालत असल्याचे छायाचित्र आले. हे विदारक दृश्य आहे. संपूर्ण देशाचे अर्थकारण मॉन्सूनवरच अवलंबून आहे. अशा या मॉन्सूनच्या अंदाजाबाबत अधिक अचूकता आणि पावसाचे मोठे खंड, अतिवृष्टी याबाबत थोडी लवकर सूचना मिळायला हवी. मृग नक्षत्राचा पाऊस बरसत असतानाच नंतर आठ-दहा दिवसांचा पावसाचा खंड आहे, असे स्पष्ट केले असते तर राज्यात एवढ्या पेरण्या झाल्याच नसत्या. अन् संभाव्य दुबार पेरणीबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली नसती. दोन वर्षांपूर्वी हवामान खात्याचे असेच अंदाज आले. पहिली पेरणी वाया गेली. नंतर दुसरी व कांही ठिकाणी तिसरी पेरणी झाली. गेल्या वर्षीही असेच झाले. दुबार पेरणीने अनेक शेतकरी अडचणीत आले. 

सुलतानी संकटांची मालिका सुरूच  यावर्षी शेतीक्षेत्रावर अनेक संकटे आली. शेतीमालाचे बाजारभाव निम्म्यांपेक्षा कमी झाले. भाजीपाला मातीमोल झाला. फळांचे भाव तर काढणीलाही पुरले नाही. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतो तर दुधाचे भाव एवढे खाली आले की, जनावरांचा चाराही त्यातून परवडत नाही. दरम्यान शासनाने तूर व हरभरा खरेदी संबंधी घोषणा केली. शेतकरी आशेने चार दिवस, एक आठवडा आपले काम सोडून उन्हातान्हात खरेदी केंद्रावर उभा राहिला. कशीबशी खरेदी झाली. परंतु अद्याप हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे बाकी आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक सरकारने शेतमालाचे भाव पडलेले असताना बाजारभाव व आधारभूत किंमतीतील फरक शेतकऱ्यांना दिला. आपण हे का करू शकत नाही, हा प्रश्नच आहे.  गेल्या कांही वर्षांत शासनाने वेळोवेळी अतिवृष्टी, गारपीट इत्यादीसाठी मदतीचे आकडे जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा झाली. यापैकी  शेतकऱ्याला अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. पंतप्रधान विमा योजनेचा प्रचंड गाजावाजा करत ही योजना लागू झाली.  शेतकरी सुखावला. त्यातील अनेक गोष्टी हिताच्या होत्या पण गेल्या दोन वर्षात या योजनेची वाट लागली. विमा जाहीर होतो, एका तालुक्याला १०० ते १५० कोटी मिळतात. त्याच्याच जवळच्या तालुक्याला जिथे पावसाचे प्रमाण सारखे, पीकसारखे, जमिनीची प्रत सारखी, झालेले नुकसान सारखे अशा तालुक्याला मात्र केवळ ३ ते ४ कोटी मिळतात. तेव्हा असे वाटते विम्याचे निकष म्हणजे, यंत्रणा राबविणाऱ्याची मर्जी? हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे शेतकरी अनेक बाजूने त्रस्त  झाला आहे. बँक कर्जाची अवस्था हीच आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्याला उभे राहू देत नाहीत. कागदोपत्री टार्गेट पूर्ण करून दाखविले जाते. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले. त्यांचे परिणाम म्हणून या बँकांतून शासनाची खाती काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घेतला. असे कोठेच घडत नाही. कांही दिवसांपूर्वी  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने हवामान खात्याचे अंदाज चुकले म्हणून शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले, अशी तक्रार करून हवामान खात्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. यावर्षीही असेच घडत आहे.

हवामान अंदाज हवेत अधिक अचूक  प्रगत राज्यात हवामान खात्याने खूप प्रगती केली आहे. रशिया, चीन इ. राष्ट्रांत अत्यंत अचूक हवामान अंदाज दिले जातात. अंदाज चुकला तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते. पगारवाढ रोखणे, निलंबित करणे व असाच अपराध व निष्काळजीपणा केला तर तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. अमेरिका, युरोपीय राष्ट्रे इतकेच काय आफ्रिका खंडातील राष्ट्रांनीदेखील यात प्रगत तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रत्येक तासाला हवामानाची माहिती नागरिकांच्या मोबाईलवर दिली जाते. व ही माहिती अचूक असते. आज भारताकडे साधने आहेत. भारतातील शास्त्रज्ञांचा हवामान क्षेत्रांत केलेल्या संशोधनाबद्दल परदेशात गौरव करण्यात येतो. पण त्यांचा उपयोग भारतात होताना दिसत नाही. यात परिवर्तनाची गरज आहे.  आज भारतीय उपखंडातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करीत आहे. निसर्ग सारखा कोपत आहे व राज्यकर्ते या परिस्थितीबाबत असंवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवरील निराशेचे ढग अधिक गडद होणारच! त्र्यंबकदास झंवर : ९८८१५१५१११ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com