agriculture news in marathi agrowon special article on dryland farming. | Agrowon

उत्पन्न दुपटीसाठी हवा कोरडवाहू शेतीवर भर
DR. LALASAHEB TAMBADE
मंगळवार, 15 मे 2018

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर निविष्ठांचा सुयोग्य वापर करून, उत्पादन खर्च कमी करणे, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान वापर, शेतीपूरक व्यवसायावर भर आणि एकात्मिक जैव शेतीपद्धतीवर लक्ष देणे आदी बाबींचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरते.

भा रत सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे कार्य महत्प्रयासाचे असले तरी अशक्‍य नाही. मागील प्रगतीच्या अभ्यासावरून असे दिसते, की २००४-०५ पासून ते २०११-१२ पर्यंत शेती आणि पूरक व्यवसायापासून प्रति माणशी उत्पन्नात ६४ टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. तसेच ‘एनएसएसओ’च्या आकडेवारीवरून २००२-०३ ते २०१२-१३ या कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पन्न ३४ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. या बाबींचे सुलभ विवेचन या लेखात केले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उपलब्ध साधन सामुग्रीचा नियोजनबद्ध व शास्त्रशुद्ध उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. तसेच देशामधील कमी उत्पन्न असणाऱ्या भागामधील शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्या भागांमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे, त्याची कारणे अनेक असली तरी प्रामुख्याने बाजारपेठ, पतपुरवठा, तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञता, माहिती आणि मूलभूत सुविधांचा अभाव याचा उल्लेख करावा लागेल. भारतामधील ७० टक्के शेतकऱ्यांचे वार्षिक प्रतिमाणशी उत्पन्न हे रुपये १५००० पेक्षा कमी आहे. फक्त १० टक्के शेतकरी कुटुंबामध्ये प्रतिमाणशी वार्षिक उत्पन्न रुपये ३०००० पेक्षा जास्त आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या ७० टक्के शेतकऱ्यांकडे जमीनधारणा एक हेक्‍टरपेक्षा कमी आहे. फक्त ७ टक्के सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न तीस हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. कारण त्यांच्याकडे एकापेक्षा अनेक पिकांमधून उत्पन्न घेण्याचे तसेच जास्त उत्पन्न देणारी पिके घेण्याचे कौशल्य आहे. तसेच उत्पन्नांचे स्रोत हे फक्त शेती नसून, शेतीपूरक व्यवसाय पण आहेत. जे शेतकरी काटेकोरपणे नियोजन करून शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित उच्च उत्पन्न देणारी पिके घेतात, त्यांचे उत्पन्न तीन पटीने वाढल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यावरून असे दिसते, की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारचे जे धोरण आहे, त्यामध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या विशेषतः कोरडवाहू व सीमांत शेतकऱ्यांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. भारताच्या निती आयोगाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी चार मुद्दे सुचविलेले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य आधारभूत किंमत देणे, पिकांची उत्पादकता वाढविणे, शेतकरी व शेती बाबतच्या धोरणामध्ये अमूलाग्र बदल करणे आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी कार्यवाही आदी बाबींचा समावेश आहे.

शेतीमालास आधारभूत किंमत
शेतीमालास आधारभूत किमतीमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये बाजारपेठांमध्ये सुधारणा आणि किमान आधारभूत किंमत देण्यासाठीच्या सुधारणा याचा समावेश आहे. बाजारपेठांमधील सुधारणेमध्ये कृषी उत्पन्न बाजारपेठांचे आधुनिकीकरण, मध्यस्थांची संख्या कमी करणे, स्थानिक बाजारपेठांमध्ये सोयीसुविधा पुरविणे तसेच बाजारपेठांमध्ये पारदर्शकता आणणे यांचा समावेश आहे. म्हणूनच भारत सरकारने २००३ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मॉडेल ॲक्‍ट पास केलेला आहे. परंतु, बाजारपेठेमध्ये पाहिजे तेवढा बदल झालेला नाही. सध्या ई-नाम हे सर्व बाजार समित्यांना बंधनकारक करण्यात येत आहे. ई-नाम हे ऑस्ट्रेलियामधील इकेए प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर विकसित केलेले आहे. ज्यामध्ये ८५ टक्के मालाचा लिलाव होतो. ई-नाम पद्धतीच्या वापरामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कोणालाही विकता येईल. त्यांच्या मालाचा दर ही स्पर्धात्मक असेल, ज्यामध्ये अनेक खरेदीदार सहभागी असतील. ज्यामुळे एकाधिकारशाही कमी होईल.
किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच मागणी आणि पुरवठाच्या विचार करून जास्तीचा साठा होणार नाही, याची काळजीपण घेणे गरजेचे आहे.

पिकांची उत्पादकता वाढविणे
भारत देशामध्ये कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच नैसर्गिक साधनसामग्री ज्यामध्ये जमीन व पाणी यांची उपलब्धता कमी कमी होत चाललेली आहे. यावर मात करायची असेल तर सूक्ष्म सिंचन, सुधारित बियाणे व इतर निविष्ठांचा वापर शास्त्रशुद्धपणे होणे व उच्च उत्पन्न देणारी पिके घेणे अनिवार्य आहे. याचबरोबर शेतीमध्ये गरजेवर आधारित कृषी यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणे, जी एम पिकांची लागवड, एकात्मिक शेती पद्धतींचा वापर आदी गोष्टींवर भर द्यावा.         

शेतीविषयक धोरणे व शेतकऱ्यांना मदत
सध्याचे जग हे जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोबाईल पोचलेला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती विशेषतः बाजारपेठ, हवामान सल्ला सेवा, कार्यक्रम, सरकारची धोरणे, कृषी तंत्रज्ञान आदी बाबतची माहिती तंतोतंत आणि वेळेला पोचविणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर बाजारपेठांवर आधारित कृषी उत्पादन निविष्ठांचा सुयोग्य वापर करून, उत्पादन खर्च कमी करणे, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान वापर, शेतीपूरक व्यवसायावर भर आणि एकात्मिक जैव शेतीपद्धतीवर लक्ष देणे आदी बाबींचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरते.शेतकऱ्यंचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एका अभियानाच्या धरतीवर प्रयत्न झाल्यास यश संपादन करणे शक्‍य आहे.
DR. LALASAHEB TAMBADE ः lrtambade@gmail.com
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.) 

इतर अॅग्रो विशेष
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...