परजीवी निर्मूलनासाठी हवी राष्ट्रीय मोहीम

गेल्या पाच वर्षांपासून ‘स्वच्छ भारत अभियान’ राष्ट्रीय योजना म्हणून केंद्र शासन राबवत आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे भारतात राहणाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे, त्यांची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकावी. एक आरोग्यदायी, बलशाली, संपन्न राष्ट्र म्हणून जगामध्ये आपली ओळख व्हावी. मग पशुधनाबाबत असा सकारात्मक विचार का होत नाही?
agrowon editorial article
agrowon editorial article

केंद्रात पुन्हा सत्ता आल्यानंतर मोदी सरकारने पशुधन   संपत्तीचे संसर्गजन्य आजारापासून खासकरून लाळ खुरकत या रोगापासून) संरक्षण व्हावे म्हणून लाळ खुरकत रोगप्रतिबंधक लसनिर्मितीसाठी १३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. ११ सप्टेंबर २०१९ रोजी या अत्यंत महत्त्वाकांक्षी देशव्यापी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात करण्यात आला. परंतु, येथे खेदाने म्हणावेसे वाटते की अशाच प्रकारचा विचार परोपजीवी, गोचीड, डास, गोमाशा, जंत यांच्यापासून पशुधन संपत्तीचे संरक्षण व्हावे म्हणून राष्ट्रीय, राज्यस्तरीय, गावपातळीवर यांच्या निर्मूलनासाठी अशी योजना का राबविली जात नाही? त्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ तरतूद का उपलब्ध करून दिली जात नाही? गेल्या पाच वर्षांपासून ‘स्वच्छ भारत अभियान’ राष्ट्रीय योजना म्हणून केंद्र शासन राबवत आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे भारतात राहणाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे, त्यांची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकावी. एक आरोग्यदायी, बलशाली, संपन्न राष्ट्र म्हणून जगामध्ये आपली ओळख व्हावी. मग पशुधनाबाबत असा सकारात्मक विचार का होत नाही? भारतात ज्याच्याकडे पशुधन आहे ते जवळपास सर्वच अल्प, अत्यल्प शेतकरी, भूमिहीन शेतमजूर आहेत. हे सर्व दारिद्ररेषेखालील जीवन कंठणारे आहेत. अनियमित पावसामुळे अशाश्‍वत शेती व्यवसायातील आर्थिक उत्पन्न, त्यांचा संसार कसा तरी पशुसंवर्धनातील विविध व्यवसायांवरच चालतो. हे ग्रामीण भागातील सत्य का स्वीकारले जात नाही? वास्तविक पाहता गोचीड, डास, गोमाश्या, जंत निर्मूलन ही योजना गावपातळीवर राष्ट्रीय योजना म्हणून राबवली गेली पाहिजे. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद उपलब्ध केली पाहिजे. 

 पशुसंवर्धनातील विविध व्यवसायामध्ये परोपजीवींची समस्या फार गंभीर स्वरूपाची आहे. पशुधनाची योग्य वाढ, स्वास्थ्य आणि रोगप्रतिकारशक्ती, उत्पादनक्षमता टिकून राहण्यासाठी सकस, समतोल, संतुलित आहार आणि पशुधनाचे उत्तम व्यवस्थापन असणे अत्यंत गरजेचे असते. खाल्लेला संतुलित, सकस आहार संपूर्णपणे अंगी लागून त्याचे रूपांतर दुग्ध उत्पादनात, मांस उत्पादनात होण्यासाठी आहारातील पोषक घटक योग्य प्रमाणात शोषला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी पशुधनाची पचनक्रिया निर्दोष आणि सशक्त असली पाहिजे. त्याचप्रमाणे पोटात जंताचा प्रादुर्भाव नसला पाहिजे. मग ते जंतू गोलकृमी, पट्टकृमी किंवा पर्णकृमी कोणतेही का असत नाहीत. या सर्व जंतांचे एकच कार्य म्हणजे पचनक्रियेत बाधा आणणे. हे सर्व जंत बाधीत झालेल्या पशुधनाचे रक्त शोषण करतात. त्यावर जगतात, वाढतात. या सर्व प्रक्रियेतून पशुधनास पोषण द्रव्याची कमतरता निर्माण होते. जंताने बाधित पशुधन अशक्त बनतात. रक्तक्षय होतो. त्याची रोगप्रतिकारशक्ती क्षीण होत जाते. उत्पादनात घट येते. 

शरीरावर वाढणाऱ्या परजीवींमध्ये गोचीड, गोमाश्या, डास हे पशुधनाचे रक्त शोषण करतात. त्यावर जगतात, वाढतात. पशुधनाचे रक्त शोषण करताना रोगकारक जंतू शरीरात सोडतात. गोचिडामुळे थायलेरीयासीस, बॅबेसियासीस अशा जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. हे सर्व बाह्य परोपजीव रोगवाहक आहेत. गोचीड मादी हजारो अंडी घालते. एक गोचीड दिवसाला एक ते दोन मिली रक्त शोषण करतात. गोचिडाचे रक्तशोषण चालूच राहते. हे करताना पशुधनाच्या शरीरात रोगकारक एक पेशिय जंतू सोडतात. ते रोगकारक रक्तात भिनतात आणि तांबड्या रक्त पेशीवर वाढतात, त्यांचा नाश करतात. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. शरीरात रोगकारक जंतूंचे प्रमाण सतत वाढत राहते. रोगकारक जंतूमुळे शरीरात विष तयार होते. पंडुरोगाची लक्षणे दिसतात. दोन ते तीन दिवसांत पशुधन मृत्युमुखी पडू शकते. रोगकारक जंतूंचा यकृतावर हल्ला झाल्यास पशुधनास कावीळ होऊ शकतो. रोगजंतूचा मेंदूवर परिणाम झाल्यास पशुधनास चालता येत नाही. पशुधनास झटके येतात. वेड्यासारखी लक्षणे दिसून येतात. काही वेळेस बेशुद्ध पडून मरतात. परोपजीवी जसे गोचीड, डास, गोमाश्या, चिरटे, जंत यांचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये सातत्याने होतच असतो. कारण सभोवतीचे अस्वच्छ वातावरण की जे परोपजीवीच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. या परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येते. परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरे त्वरित मृत्युमुखी पडत नसतील तरी ही त्याचा प्रवास क्षणाक्षणाला मृत्युकडे सुरू झालेला असतो. योग्य वेळी योग्य औषधोपचार न झाल्यास मृत्यु अटळ असतो हे लक्षात घेतले पाहिजे.  

परोपजीवीचा प्रादुर्भाव हा पशू संवर्धानातील व्यवसायांना मिळालेला शाप आहे. पशुपालकांना परोपजीवीचे गांभीर्य पशुधन मेल्याशिवाय कळत नाही हे दुर्दैव आहे. वास्तविक पाहता परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे पशुपालकांचे कळत, नकळत फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतच असते. मग ते आर्थिक नुकसान वासरांच्या, करडांच्या शारीरिक वाढीच्या स्वरूपात असो, कालवडी, वगारी, करडे गाभण न राहण्याच्या स्वरूपात असो, कमी वेत, त्या वेतातील बुडालेले दूध उत्पादनाच्या स्वरूपात असो, पैदा होणाऱ्या वासरांच्या स्वरूपात असो, कमी दुग्ध उत्पादनाच्या स्वरूपात असो किंवा पशुधनाच्या मृत्युच्या स्वरूपात असो. होणारे आर्थिक नुकसान हे कोणत्याही पशुपालक शेतकरी यांना परवडणारे नसते. पशुसंवर्धनातील व्यवसाय करणारे बहुतांशी अल्प, अत्यंत अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतमजूर आहेत की जे स्वतः दारिद्र रेषेखालील जीवन कंठणार आहेत. हे ग्रामीण भागातील वास्तव्य आहे. त्याचा संसाराचा गाडा चालतोच मुळी शेती आणि पशू संवर्धातील विविध व्यवसायावरच! पशुसंवर्धनात परोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे होणारे आर्थिक नुकसान हे वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील असते हे लक्षात घेऊन शासनाने प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये, गावपातळीवर गोचीड, डास, माश्या, जंत निर्मूलन ही राष्ट्रीय मोहीम म्हणून राबवावी. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ तरतूद उपलब्ध करून द्यावी.

श्रीकांत सरदेशपांडे : ९६५७२५७८०४ (लेखक निवृत्त पशुधन विकास अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com